अंकुर स्पोर्टस क्लब अाणि डाॅ. शिरोडकर विचार अमृतधारा यांच्या विद्यमाने अायोजित करण्यात अालेल्या जिल्हास्तरीय विशेष व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मध्य रेल्वे अाणि यूनियन बँक या संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. कुमार गटात अशोक मंडळ अाणि एचजीएस या संघांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. लालबागच्या गणेश गल्लीत सुरू असलेल्या या स्पर्धेत मध्य रेल्वेने न्यू इंडिया इन्श्युरन्सचा प्रतिकार २७-२४ असा मोडून काढला अाणि गटात अव्वल येत बाद फेरीत मजल मारली.
श्रीकांत जाधव मयुर शिवतरकर यांच्या झंझावाती चढाया आणि विराज लांडगेचा भक्कम बचाव याच्या बळावर रेल्वेने पहिल्या डावात दोन लोण देत २१-०८ अशी भक्कम आघाडी घेतली. पण दुसऱ्या डावात न्यु इंडियाच्या सुदर्शन किर्वे, अविनाश पाटील यांनी तुफानी खेळ करीत रेल्वेला जेरीस आणले. शेवटी अनुभवाच्या जोरावर रेल्वेने ३ गुणांनी बाजी मारली.
यूनियन बँकेने चुरशीच्या लढतीत सेंट्रल बँकेला २७-२७ असे बरोबरीत रोखले. रोहित अधटराव, आकाश अडसूळ यांच्या चढाई-पकडीच्या चतुरस्त्र खेळामुळे सेंट्रल बँकेने मध्यंतराला १६-९ अशी अाघाडी घेतली होती. मात्र त्यांना ही आघाडी टिकविणे जमले नाही. उत्तरार्धात यूनियन बॅँकेच्या अजिंक्य कापरे, संतोष वारकरी यांनी आपला खेळ उंचावत संघाला बरोबरी साधून दिली. एक विजय व एक बरोबरी यामुळे यूनियन बॅँकेने ब गटातून बाद फेरी गाठली.
कुमार गटात अशोक मंडळाने चुरशीच्या लढतीत एस. एस. जी. फाउंडेशनचा ४९-४३ असा पाडाव करीत दुसरी फेरी गाठली. मध्यंतराला २५-२३ अशी अशोक मंडळाकडे आघाडी होती. अशोक मंडळाच्या विजयात ओमकार कामतेकरने एकाच चढाईत ५ गडी टिपत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याला चढाईत सुरज सुतारने , तर पकडीत शुभम आंग्रेने मोलाची साथ दिली.
हेही वाचा -
अंकुर व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत मध्य रेल्वे, यूनियन बँकेची विजयी सलामी