महामुंबई कबड्डी लीगमध्ये डी अँड डी टायटन्सचा थरारक विजय


  • महामुंबई कबड्डी लीगमध्ये डी अँड डी टायटन्सचा थरारक विजय
SHARE

क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या एकापेक्षा सरस चढाया, मध्यंतरापासून बरोबरीची न फुटलेली कोंडी अाणि शेवटच्या मिनिटाला हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या चढाया-पकडींचा खेळ, शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना ६ गुणांनी अाघाडीवर असतानाही जावळी टायगर्सने सामना कसा गमवावा, याचं प्रात्यक्षिकच दाखवत अापल्या पदरात पराभव पाडून घेतला. कांदिवलीतील चारकोप येथे सुरू असलेल्या महामुंबई कबड्डी लीगमध्ये निनाद तावडेने शेवटच्या चढाईत मिळवलेला लाखमोलाचा गुण डी अँड डी टायटन्सच्या विजयात निर्णायक ठरला. डी अँड डी टायटन्सने जावळी टायगर्सचे कडवे अाव्हान ३६-३४ असे मोडून काढले.


स्पर्धेची दमदार सुरुवात

महामुंबई कबड्डी लीगचा सोहळा हा प्रो-कबड्डीला साजेसा असाच धमाकेदार झाला. खच्चाखच भरलेल्या नामदेवराव कदम क्रीडानगरीत तब्बल दोन तास अखंडपणे कबड्डीचा जयघोष सुरू होता. सलामीच्या सामन्यातच कबड्डीचा खरा थरार प्रेक्षकांना अनुभवता अाला. रोहित जाधवने गुणांचे खाते उघडून जावळी टायगर्सला भन्नाट सुरुवात करून दिली. १९व्या मिनिटापर्यंत बरोबरीचा सिलसिला कायम होता. धीरज अाणि अामीर धुमाळ यांनी डी अँड डीला १६-१३ अशी अाघाडी मिळवून दिली. मात्र रोहित जाधवच्या भन्नाट चढायांमुळे जावळी टायर्गसने २९-२३ अशी दमदार मजल मारली. अखेरच्या क्षणी निनाद तावडेने खोलवर चढाया मारून मिळवलेले दोन गुण डी अँड डी टायटन्ससाठी मोलाचे ठरले.कुर्ला किंग्सचा एकतर्फी विजय

कुर्ला किंग्स आणि लालबाग लायन्स यांच्यात झालेला सामना अपेक्षेप्रमाणे रंगला नाही. कुर्ला किंग्सच्या आकाश कदमने सुसाट खेळ करीत पूर्वार्धात मिळवून दिलेली अाघाडी उत्तरार्धातही टिकवत अापल्या संघाला ३१-२० असा सहज विजय मिळवून दिला. अाकाशने १४ चढायांत ११ गुण पटकावत कुर्ला किंग्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


हेही वाचा - 

कांदिवलीत रंगणार महामुंबई कबड्डी लीगचा धमाका

महाराष्ट्रानं पटकावलं ११ वर्षानंतर राष्ट्रीय कबड्डीचं जेतेपद


संबंधित विषय
ताज्या बातम्या