Advertisement

बाल उत्कर्ष कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी, महिंद्राला जेतेपद


बाल उत्कर्ष कबड्डी स्पर्धेत महात्मा गांधी, महिंद्राला जेतेपद
SHARES

बाल उत्कर्ष क्रीडा मंडळातर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त अायोजित करण्यात अालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिंद्रा अाणि महात्मा गांधी स्पोर्टस क्लब या संघांनी अनुक्रमे पुरुष अाणि महिला गटाचे विजेतेपद संपादन केलं. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या अाणखी एका राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. लालबाग येथील गणेश गल्ली मैदानावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने अापला पारंपरिक प्रतिस्पर्धी एअर इंडियाचे अाव्हान ३९-२३ असे सहज परतवून लावत बाल उत्कर्ष चषक अाणि एक लाख रुपयांच्या पुरस्कारावर नाव कोरले. महिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधीने संघर्षचा दुबळा प्रतिकार ३६-१८ असा संपुष्टात अाणत चषक अाणि ७१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. महिंद्राचा अानंद पाटील अाणि महात्मा गांधीची पूजा किणी हे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.


अानंद, अजिंक्यच्या भेदक चढाया

सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत महिंद्राने मध्यंतराला २३-१० अशी भक्कम अाघाडी घेतली होती. त्यानंतर महिंद्राने एअर इंडियाला जवळपास येण्याची संधी दिली नाही. आनंद पाटील, अजिंक्य पवार यांच्या भेदक चढाया थोपविणे एअर इंडियाला जमले नाही. त्याचबरोबर महिंद्राचे क्षेत्ररक्षण भेदणेही एअर इंडियाच्या चढाईपटूंना जड जात होते. महिंद्राच्या स्वप्नील शिंदेचा बचाव उत्तम होता. एअर इंडियाच्या उमेश म्हात्रे, आशिष मोहिते यांना अखेरपर्यंत सूर गवसला नाही.


पूजा, सायली जाधवची धमाल

नुकत्याच झालेल्या महापौर चषकावर नाव कोरल्यानं अात्मविश्वास दुणावलेल्या महात्मा गांधीने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत हा सामना सहज खिशात टाकला. पूर्वार्धात २०-१० अशी आघाडी घेणाऱ्या महात्मा गांधीने उत्तरार्धात त्याच तडफेने खेळ करी हा सामना १८ गुणांनी जिंकला. पूजा किणी, सायली जाधव यांच्या झंझावाती चढायांना संघर्षकडे उत्तर नव्हते. तसेच सृष्टी चाळके, तेजस्वी पाटेकर यांचं अभेद्य क्षेत्ररक्षण कोमल देवकर, निखिता यांना भेदता अाले नाही.


हेही वाचा -

राष्ट्रीय बीच कबड्डीसाठी उपनगरच्या कोमल देवकरकडे महाराष्ट्राचे नेतृत्व

कबड्डीपटू सायली जाधवला मिळणार शासकीय नोकरी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा