Advertisement

महानगरपालिका, पोलीस संघ विजयी


महानगरपालिका, पोलीस संघ विजयी
SHARES

अखिल भारतीय आंतर इन्स्टिट्युशनल कबड्डी स्पर्धेत मुंबई महानगरपालिका संघाने परमाणु ऊर्जा विभाग (डी.ए.इ.) कबड्डी संघाचा 7 गुणांनी दणदणीत पराभव केला. या विजयात चढाईपटू आशिष मिटकर आणि बचावपटू परेश लाड यांची कामगिरी मोलाची ठरली. तर अणुशक्ती क्रीडा नगरीमधील दुसऱ्या साखळी सामन्यात मुंबई पोलीस संघाने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा पराभव करत 6 गुणांनी विजय मिळवला. ही स्पर्धा अणुशक्ती नगर येथे संपन्न झाली.

मुंबई महानगरपालिका संघाचे चढाईपटू आशिष मिटकर आणि बचावपटू परेश लाड विरुद्ध परमाणू उर्जा विभागाचे चढाईपटू एस. पी. मोकल व बचावपटू एन. बी. पाटील यांच्या उत्कृष्ट खेळाने साखळी सामना रंगला. पहिल्या डावामधील 17-12 अशा आघाडीचा फायदा घेत मुंबई महानगरपालिका संघाने अखेर 31-24 असा विजय मिळविला. मुंबई पोलीस संघाला पहिल्या डावात 8-8 अशा बरोबरीत रोखताना महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या चढाईपटू अलदर आणि धीरज राठोड यांनी सुंदर खेळ केला. पण उत्तरार्धातील चढाईपटू अनिकेत पाटीलचे आक्रमण आणि जितेंद्र पाटील, विपुल मोकल यांच्या पकडीचा खेळ भारी ठरल्यामुळे मुंबई पोलिसांनी 24-18 असा साखळी विजय नोंदविला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा