Advertisement

नितीन देशमुख ठरला महिंद्रावर भारी, देना बँक बाद फेरीत


नितीन देशमुख ठरला महिंद्रावर भारी, देना बँक बाद फेरीत
SHARES

बलाढ्य महिंद्र अाणि महिंद्रविरुद्धच्या सामन्यात एकटा नितीन देशमुख वाघासारखा लढला अाणि सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवत देना बँकेला आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत स्थान मिळवून दिले. देना बँक आणि महिंद्रला एकही विजय मिळविता आला नसला तरी सरस गुणांच्या आधारे देना बँकेने गटात दुसरे स्थान मिळवत बाद फेरी गाठली तर महिंद्रचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.


असे रंगतील बाद फेरीचे सामने

भारत पेट्रोलियम आणि महाराष्ट्र पोलिसांनी दोन्ही साखळी सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र एअर इंडियाला पहिल्याच सामन्यात हरवणाऱ्या मुंबई बंदरलाही सरस गुणांमध्ये मागे पडल्यामुळे बाद व्हावे लागले आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत मध्य रेल्वेची गाठ आयकराशी पडेल तर आर्मी विरूद्ध महाराष्ट्र पोलीस असे द्वंद्व रंगेल. पुण्याच्या बीईजीशी एअर इंडिया भिडेल तर देना बँकेला बलाढ्य भारत पेट्रोलियमशी लढावे लागणार आहे.


नितीनने मने जिंकली

धिप्पाड अाणि भीमकाय देहयष्टीच्या नितीन देशमुखने केलेल्या चढायांनी अाजचा दिवस गाजवला. आघाडी-पिछाडीच्या या खेळात कधी महिंद्र आघाडीवर होता तर कधी देना बँक. सामन्याच्या सुरुवातीलाच ओमकार जाधव, स्वप्निल शिंदे आणि अजिंक्य पवार यांनी महिंद्रला १०-५ असे आघाडीवर अाणले. नितीनने एकापाठोपाठ गुणांचा सपाटा लावत देना बँकेला सामन्यात पुनरागमन करून दिले. महिंद्र ३४-३१ अशा स्थितीत असताना शेवटच्या चढाईत नितीनने तीन गडी बाद करत हा सामना ३४-३४ असा बरोबरीत सोडवला.


नाशिक अार्मीचा पराभव

मोनू गोयत अाणि दिग्गज खेळाडूंचा समावेश असूनही नाशिक अार्मीला पराभवाचा सामना करावा लागला. विकास काळेच्या सुसाट चढायांमुळे एअर इंडियाने ५२-३५ असा विजय साकारला. नितीन मदनेच्या एकापेक्षा एक चढायांच्या जोरावर भारत पेट्रोलियमने सलग दुसरा विजय नोंदवताना २४-१९ अशी बाजी मारली. दुसरीकडे महाराष्ट्र पोलिसांनीही सलग दुसरा विजय नोंदविताना बीईजीचा ३७-३१ असा पराभव केला. पोलिसांकडून महेश मकदूमने भन्नाट खेळ केला. या विजयात त्याला साथ लाभली ती बाजीराव होडगे, महेंद्र राजपूतची.


हेही वाचा -

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत एअर इंडिया सलामीलाच कोलमडली

प्रभादेवीत आमदार चषक कबड्डीसाठी आंतरराष्ट्रीय थाट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा