व्हिबग्यॉर, शिवसह्याद्री, निमसाई संघ विजयी

  Mumbai
  व्हिबग्यॉर, शिवसह्याद्री, निमसाई संघ विजयी
  मुंबई  -  

  मुंबई सुपर लीग शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सुपर-स्विस लीगमध्ये व्हिबग्यॉर सेव्हन आणि शिवसह्याद्री पतपेढी कव्हर्स संघांनी सलग दुसरा विजय तर निमसाई लायटर्स आणि सहकारी भांडार अचिव्हर्स संघांनी पहिला विजय मिळवला. व्हिबग्यॉर सेव्हनने संकल्प प्रतिष्ठान टायगर्सचा 56-24, शिवसह्याद्री पतपेढी कव्हर्सने आंबेकर प्रतिष्ठान फायटर्सचा 54-41, निमसाई लायटर्सने अंबा शिपिंग लोडर्सचा 54-47 असा आणि सहकारी भांडार अचिव्हर्सने अपना बँक मास्टर्सचा 56-26 ने पराभव केला.

  दरम्यान, मुंबई शारिरीक शिक्षण मंडळ आणि आयडियल स्पोर्टस् अॅकॅडेमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेच्या मुख्य लढतीत व्हिबग्यॉर सेव्हनने अपराजित संकल्प प्रतिष्ठानचा पराभव करत एकमेव अपराजित संघाची बिरुदावली स्वत:कडे राखली. सूरज सुतारच्या अष्टपैलू कामगिरीमुळे संकल्प प्रतिष्ठान विरुद्धच्या सामन्यात व्हिबग्यॉर सेव्हनने 19 गुणांची आघाडी घेत 56-24 अशी बाजी मारली.

  चढाईपटू प्रतिक जाधवने 9 बोनससह एकूण 22 गुणांच्या आक्रमक खेळामुळे शिवसह्याद्री पतपेढी कव्हर्सने मध्यंतराची एका गुणाची आघाडी नंतर वाढविली आणि आंबेकर प्रतिष्ठान फायटर्सवर 54-41 असा विजय मिळविला. शतकी गुणांची नोंद झालेल्या सामन्यात निमसाई लायटर्सने अंबा शिपिंग लोडर्सवर 54-47 अशी मात केली. तर पहिल्या डावात एका गुणाने पिछाडीवर राहिलेल्या निमसाईला विजय मिळवून देताना सुजित रामबाडेच्या चढाया महत्त्वपूर्ण ठरल्या. सहकारी भांडार अचिव्हर्सने अपना बँक मास्टर्सचा 56-26 असा पराभव करताना मध्यंतरालाच 34-17 असा विजयी पाया रचला होता. तसेच, सहकारी भांडारचा चढाईपटू सुरज मिश्राने 15 गुण मिळविले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.