Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत रंगला ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा

५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत पार पडला. विनोद तावडे यांनी पुढाकार घेत पार पाडलेल्या या सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली आणि संकलक कॅरॉल लिटलटन विशेष पाहुणे म्हणून लाभले होते.

मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत रंगला  ५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा
SHARES

५६ वा मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीत पार पडला. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेत पार पाडलेल्या या सोहळ्याला ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली आणि संकलक कॅरॉल लिटलटन हॅालिवुडचे मान्यवर विशेष पाहुणे म्हणून लाभले होते.


जॉन बेली उपस्थित

मुंबईतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या या सोहळ्याला जॉन बेली, कॅरॉल लिटलटन, विनोद तावडे, उज्ज्वल निरगुडकर, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या पत्नी वर्षा तावडे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात ज्येष्ठ संकलक वामन भोसले यांना २०१९ च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आलं. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेते भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आले. 


मराठी आॅस्कर 

जॉन बेली, विनोद तावडे, कॅरॉल लिटलटन, गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेते विक्रम गोखले आणि अरुण नलावडे यांच्या हस्ते या वर्षीचे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. मराठीसोबतच बऱ्याच गाजलेल्या हिंदी चित्रपटांचं संकलन करणाऱ्या वामन भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आणि सर्वांचे आभार मानले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना भरत म्हणाला की, ज्या राजकमल चाळीत मी वाढलो तिच्या मालकांच्या नावे म्हणजे व्ही. शांताराम यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं याचा आनंद खूप मोठा आहे. आॅस्करवाले इकडे आलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या हातून मला मराठी आॅस्कर मिळाला असं वाटतं. मी तिथे जाईन की नाही हे माहित नाही, पण ते इथे येऊन मला पुरस्कार देताहेत याचाही आनंद आहे.


मराठीकडून तीन अॅवॅार्डस

परेश रावल यांनी आपलं मत व्यक्त करताना मराठीकडून मिळालेल्या पुरस्कारांचा विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की, मला मराठीकडून तीन अॅवॅार्डस मिळाले आहेत ज्याचा खूप आनंद आहे. पहिला लतादीदींकडून दीनानाथ मंगेशकर अॅवॅार्ड मिळाला होता. हा अॅवॅार्ड स्वीकारण्यासाठी मी सिंगापूरहून भारतात आलो होतो. त्यानंतर मला पुण्यामध्ये पु. ल. देशपांडे अॅवॅार्ड मिळाला होता. त्यासाठी मी मुंबईहून पुण्याला गेलो होतो आाणि हा अॅवॅार्ड देण्यासाठी हॅालिवुडमधून काही लोक आहेत. खूप खूप आभारी आहे. व्ही. शांताराम आणि राज कपूर हे दोन्हीही समाजाभिमुख चित्रपट बनवत होते. त्यामुळे अशा व्यक्तींच्या नावाचे पुरस्कार जेव्हा मिळतात तेव्हा खूप आनंद होतो.


सुषमा शिरोमणींची खंत

सुषमा शिरोमणी यांनी उशीरा पुरस्कार मिळाल्याची खंत व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की, आज खूप आनंद होत आहे. उशीरा का होईना, पण आज मला हा पुरस्कार मिळतो आहे. सर्वांना आभार आणि धन्यवाद. हा प्रवास खूप कष्टाचा आणि मेहनतीचा होता. त्या मेहनतीचं मो मला मराठी प्रेक्षकांमुळे मिळालं आहे. आज इम्पाचे, वॅालिवुडचे आणि मराठी प्रेक्षकांचेही आभार. आॅस्कर अकादमीचे अध्यक्ष बेली यांच्या हातून हा पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी आॅस्करपेक्षाही खूप मोठा आहे.


जागतिक सिनेमाचे म्युझियम

पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. तावडे म्हणाले कीअॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर ॲवॉर्डस) कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत  आवश्यक ती सर्व मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. आज भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच या बॉलिवूड नगरी असलेल्या भारतात बेली हे पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहेत. मात्र मुंबईत कार्यालय सुरु केल्यास येथे आशियातले एक केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहता येईल.

के. के. मेनन सर्वोत्कृष्ट अभिनेता

हिंदीकडून मराठीकडे वळत 'एक सांगायचंय' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या के. के. मेनन यांनी यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. 'बंदिशाळा' या चित्रपटासाठी मुक्ता बर्वेला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शिवाजी लोटण पाटील यांनी दिग्दर्शित केलेला 'भोंगा' सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर 'बंदिशाळा'ला द्वितीय आणि 'तेंडल्या' चित्रपटाला तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले. सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट म्हणून 'एक सांगायचंय - अन्सेड हार्मनी' आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट 'भोंगा' ठरले. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर ( तेंडल्या)यांना देण्यात आला.


यांना मिळाले पुरस्कार

इतर पुरस्कारांमध्ये सहायक अभिनेता - स्वानंद किरकिरे ( चुंबक ), सहायक अभिनेत्री - छाया क़दम ( न्यूड ), कथा - सुधाकर रेडी (नाळ), पटकथा - शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे ( भोंगा ), संवाद - विवेक बेळे (आपला माणूस), गीत - संजय पाटील (बंदिशाळा), संगीत - राजेश सरकाटे ( मेनका उर्वशी),  पार्श्वसंगीत - विजय गवंडे (बंदिशाळा), पार्श्वगायक - ऋषिकेश रानडे ( व्हॉट्सअप लग्न), पार्श्वगायिका -प्रियंका बर्वे (बंदिशाळा) , नृत्य दिग्दर्शक - उमेश जाधव ( मेनका उर्वशी), प्रथम पदार्पण - फिरोज शेख ( तेंडल्या), सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण - गौरी कोठवदे (पुष्पक विमान),  चित्रपट निर्मिती - शांताई मोशन पिक्चर्स ( बंदीशाळा)यांना गौरविण्यात आलं. स्पृहा जोशी आणि समीर चौघुले यांनी या सोहळयाचं सूत्रसंचालन केलं.



हेही वाचा -

ऑस्कर अॅकॅडमीचं कार्यालय मुंबईत होणार - जॉन बेली




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा