Advertisement

‘जजमेंट’साठी प्रतिक देशमुखनं घटवलं वजन

पदार्पणात चाकलेट हिरो म्हणून समोर आलेल्या प्रतिक देशमुखनंही करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात वजन घटवण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.

‘जजमेंट’साठी प्रतिक देशमुखनं घटवलं वजन
SHARES

बरेच कलाकार अभिनयाचा कस लावणाऱ्या भूमिकांसोबतच शारीरिक मेहनत घ्यायला लावणाऱ्या व्यक्तिरेखांच्याही शोधात असतात. एखाद्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी वजन वाढवणं असो, वा घटवणं हा त्याचाच एक भाग आहे. पदार्पणात चाकलेट हिरो म्हणून समोर आलेल्या प्रतिक देशमुखनंही करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळात वजन घटवण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.


वेगळ्याच लुकमध्ये

प्रतिकनं ‘शुभ लग्न सावधान’ या मराठी सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यात त्यानं एनआरआय रोहनची भूमिका साकारली होती. त्यात चॉकलेटी भूमिकेत दिसलेला प्रतिक आपल्या आगामी सिनेमात वेगळ्याच लूकमध्ये दिसणार आहे. ‘जजमेंट’ या आगमी मराठी सिनेमात त्यानं यदुनाथ साटम नावाच्या निराशेच्या गर्तेत अडकलेल्या तरूणाची भूमिका साकारली आहे.


फक्त एकच साम्य

खरं तर प्रतिकला पहिला सिनेमा सुरू असतानाच ‘जजमेंट’चीही ऑफर आली होती. याविषयी प्रतिक म्हणाला की, रोहन आणि यदुनाथ दोघेही अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परतलेले तरूण आहेत. एवढंच दोघांमधलं साम्य अहे. बाकी कौटुंबिक, मानसिक, आर्थिक पातळीवर दोन्हीही भूमिका खूप भिन्न आहेत. ‘शुभलग्न…’मधला रोहन खूप फंकी होता. ‘यो’ टाइपचा होता. तो खूप एनर्जेटिक, बबली आणि हॅप्पी गो लकी तरुण होता. रोहन काहीसा बहिर्मुख, तर ‘जजमेंट’मधला यदुनाथ अतिशय अंतर्मुख मुलगा आहे.


क्लीन शेव्ह असणार यदुनाथ

‘जजमेंट’ या सिनेमाची कथा प्रसिद्ध लेखिका नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’ या कादंबरीवर आधारित आहे. समीर सुर्वेनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या दोन तगड्या कलाकारांसोबत काम करण्याबाबत सांगताना आपल्या भूमिकेच्या तयारीविषयी प्रतिक म्हणाला की, ‘शुभलग्न’चा रोहन सुखवस्तू मुलगा होता, पण यदुनाथची मानसिक अवस्था पाहता त्याला बारीक असणं गरजेचं होतं. त्यामुळं ‘शुभलग्न’ संपल्यावर मला लगेच वजन कमी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. या भूमिकेसाठी केसही मोठे आणि फंकी चालणार नव्हते. त्यामुळं व्यवस्थित भांग पाडणारा, क्लीन शेव्ह असलेला यदुनाथ मी साकारला. मंगेश आणि तेजश्रीसह सिनेमातील इतर सर्वच कलाकारांची मोलाची साथ लाभल्यानं हे शिवधनुष्य पेलू शकलो.


परस्पर विरोधी भूमिका

करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यातील दुसऱ्याच चित्रपटात अशाप्रकारे आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळणं हे प्रतिकमधील कलागुण सर्वार्थानं समोर आणणारं ठरणार आहे. याबाबत प्रतिक म्हणाला की, सर्वसाधारणपणे करीयरच्या सुरूवातीला बऱ्याच नवोदित अभिनेत्यांना कॉलेज गोइंग तरूणांच्या भूमिका मिळतात. मात्र ‘शुभलग्न’मधील रोहन पाहून मला ‘जजमेंट’च्या फिल्ममेकर्सनी यदुनाथची भूमिका ऑफर दिल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कारण दोन्ही भूमिका एकमेकांपेक्षा परस्पर विरोधी आहेत. त्यामुळं ही भूमिका साकारताना माझ्यासमोर दुहेरी आव्हान होतं. ते लुक आणि अभिनयाच्या बळावर स्वीकारलं.



हेही वाचा -

जमली रे जमली सोनाक्षी-नवाजची जोडी

अमिताभ थेट 'झुंड'च्या सेटवरून..



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा