Advertisement

विजय पाटकरांची चक्रम मास्तरकी!

मेंढे मास्तरचं वेगळेपण सांगताना पाटकर म्हणाले की, ''ही भूमिका तशी लांबीने छोटी असली तरी महत्त्वपूर्ण असून काहीशा विनोदी अंगाने जाणारी आहे. या व्यक्तीरेखेत दोन रंग आहेत. हा दिवसा वेगळा असतो आणि रात्री वेगळा. दिवसा लोकांना उपदेशाचे डोस पाजतो. दिवसा मद्यपान करणाऱ्याच्या सावलीलाही उभा राहात नाही, पण संध्याकाळनंतर यांचं काय होतं ते त्यालाच समजत नाही आणि फूल तर्राट असतो.

विजय पाटकरांची चक्रम मास्तरकी!
SHARES

शब्दांविना अभिनय करण्याची कला फार मोजक्या कलाकारांच्या अंगी भिनलेली असते. मराठमोळे अभिनेते विजय पाटकर त्यापैकीच एक आहेत. मराठीसोबत हिंदीतील दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करणारे पाटकर आता एक अशी भूमिका साकारताना दिसणार आहेत जी पाहून भलेभले चक्रावून जातील.


कुठला सिनेमा?

'तू तिथे असावे' हा चित्रपट ७ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. संतोष गायकवाड यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. या चित्रपटात संतोष यांनी एका अशा तरुणाची कथा रेखाटली आहे, जो गायक होण्याचं स्वप्न पाहत असतो. तरुणाच्या या ध्येयवेड्या प्रवासातच प्रेक्षकांना पाटकरांची चक्रम मास्तरकी पाहायला मिळणार आहे.


मेंढे मास्तर

या अनोख्या मास्तरकीबाबत 'मुंबई लाइव्ह'शी बातचीत करताना पाटकर म्हणाले की, ''मी नेहमीच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत आलो आहे. प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या चित्रपटात मी साकारलेल्या व्यक्तीरेखेचं नाव आहे मेंढे मास्तर. हे काहीसं अजब रसायन आहे. हा काहीसा चक्रम आहे. हा नायकाच्या प्रवासात त्याला मदत करणारा आहे.''


विनोदी व्यक्तीरेखा

मेंढे मास्तरचं वेगळेपण सांगताना पाटकर म्हणाले की, ''ही भूमिका तशी लांबीने छोटी असली तरी महत्त्वपूर्ण असून काहीशा विनोदी अंगाने जाणारी आहे. या व्यक्तीरेखेत दोन रंग आहेत. हा दिवसा वेगळा असतो आणि रात्री वेगळा. दिवसा लोकांना उपदेशाचे डोस पाजतो. दिवसा मद्यपान करणाऱ्याच्या सावलीलाही उभा राहात नाही, पण संध्याकाळनंतर यांचं काय होतं ते त्यालाच समजत नाही आणि फूल तर्राट असतो. अशी काहीशी वेगळी गंमत या व्यक्तिरेखेत असल्याने ती साकारतानाही मजा आली. चित्रपटाची कथा प्रेरणादायी असून, थकलेल्या मनाला उभारी देणारी असल्याचंही'' पाटकर म्हणाले.


संगीतमय प्रवास

गाण्याची आवड असणाऱ्या एका छोट्या खेड्यातून आलेल्या मल्हार या युवकाचा प्रसिद्ध गायक होण्यापर्यंतचा प्रवास या संगीतमय चित्रपटातून उलगडणार आहे. भूषण प्रधान, पल्लवी पाटील या जोडीसोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील, श्रीकांत वट्टमवार, अभिलाषा पाटील, विशाखा घुबे हे कलाकार या चित्रपटात आहेत. आदर्श शिंदे, नेहा राजपाल, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, धनश्री बुरबुरे या गायकांनी या चित्रपटातली गाणी गायली आहेत. मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव यांनी गीतं लिहिली आहेत. दिनेश अर्जुना यांनी गीतं संगीतबध्द केली असून, समीर फातर्फेकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे.



हेही वाचा-

भाग्यश्री झळकणार बॉलीवूडमध्ये!

'जमलंय बघा' म्हणत 'माऊली'साठी संयमी बनली रेणुका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा