Advertisement

‘सलमान सोसायटी’मध्ये नम्रता आवटेची ‘पार्टी’


‘सलमान सोसायटी’मध्ये नम्रता आवटेची ‘पार्टी’
SHARES

‘सलमान सोसायटी’ या चित्रपटातील एका गाण्याचं चित्रीकरण नुकतंच नवीन मुंबईतील कळंबोली येथे करण्यात आलं. ‘पार्टी दणाणली...’ असे या गाण्याचे बोल असून, चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे, विनायक पोतदार आणि ‘गावठी’ व ‘संजू’ चित्रपट फेम गौरव मोरे या कलाकारांवर हे विशेष गाणं चित्रीत करण्यात आलं.

Namrata Awate 1.JPG

पार्टी दणाणली

रिअॅलिटी शोजच्या माध्यमातून विनोदी अभिनय करून नावारूपाला आलेली नम्रता आवटेही या गाण्यात नृत्य करताना दिसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण ‘सलमान सोसायटी’मध्ये नम्रतासुद्धा आहे हे अद्याप कुणालाच ठाऊक नव्हतं. त्यामुळे ती नेमकी कोणत्या भूमिकेत दिसणार हे रहस्य अद्याप कायमच आहे, पण एकूणच सर्व कलाकारांसोबत नम्रतानेही ‘पार्टी दणाणली...’ या गाण्यावर ठेका धरत खरोखर ‘सलमान सोसायटी’मधील ही पार्टी दणाणून सोडली.


बालशिक्षणावर आधारित सिनेमा

‘सलमान सोसायटी’ हा चित्रपट बालशिक्षणावर आधारित असून ‘पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया’ या मोहिमेवर प्रकाश टाकणारा आहे. ‘संजू’ या सिनेमामध्ये आपल्या अभिनयाने प्रभावित करणारा गौरव मोरे या सिनेमात पुन्हा एका वेगळ्याच पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार हे त्रिकूट या सिनेमात धमाल करणार आहेत.


डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार

नम्रतासह ‘सलमान सोसायटी’मधील बऱ्याच कलाकारांवर चित्रीत झालेलं ‘पार्टी दणाणली...’ हे गाणं गीतकार-संगीतकार श्रेयस आंगणेनं संगीतबद्ध केलं असून, नागेश मोरवेकरनं गायलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबई, नवी मुंबईच्या जवळील भागात होणार आहे. डिसेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा