Advertisement

‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

डॅा. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. टीझरपासूनच चर्चेत असलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!
SHARES

रंगभूमीवरील पहिला सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॅा. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर कलाकार-तंत्रज्ञांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. टीझरपासूनच चर्चेत असलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास घाणेकरांच्या बायोपिकच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मराठीमध्ये पहिल्यांदाच डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यावर सिनेमा येत असल्याने या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाचा विषय आणि तगडे कलाकार यामुळे चित्रपट चर्चेत राहिला असून, प्रेक्षकांमध्ये आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरला आहे. सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन, वैदेही परशुरामी यांच्या उपस्थित नुकताच ट्रेलरही काहीशा अनोख्या शैलीत प्रदर्शित करण्यात आला आहे.


'या' कलाकारांच्या भूमिका 

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात मुख्य म्हणजेच घाणेकरांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात सुबोधसोबत सोनाली कुलकर्णी (सुलोचनादीदी), सुमित राघवन (डॉ.श्रीराम लागू), मोहन जोशी (भालजी पेंढारकर), आनंद इंगळे (प्रा.वसंत कानेटकर), प्रसाद ओक (प्रभाकर पणशीकर), वैदेही परशुरामी (कांचन घाणेकर), नंदिता धुरी (ईरावती घाणेकर) आदी कलाकारांनी जुन्या काळातील दिग्गजांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या दोन्ही टीझरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.


असे होते घाणेकर

मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं अतुलनीय योगदान आहे, त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले. त्यांची प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि बोलण्याची विशिष्ट शैली अद्वितीय होती. मराठी थिएटरमध्ये पहिली शिट्टी वाजली ती डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यासाठी... कधी लाल्या म्हणून, तर कधी संभाजी म्हणून प्रेक्षकांच्या मनात ज्यांनी अढळ स्थान निर्माण केलं, ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते असे डॉ. काशिनाथ घाणेकर... स्वत:चं नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरू केली तेसुद्धा काशिनाथ घाणेकरच.


'ही' अतिशय भाग्याची गोष्ट

घाणेकरांसारख्या मातब्बर अभिनेत्याची भूमिका साकारण्याबद्दल सुबोध भावे म्हणाला, मराठी रंगभूमीवर उभं रहाण्याची थोडीशी धडपड करणाऱ्या माझ्यासारख्या कलावंताच्या आयुष्यात मराठी रंगभूमीच्या पहिल्या सुपरस्टारची व्यक्तिरेखा येणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून घाणेकर यांचं चरित्र आभ्यासायला मिळालं, त्यांच्या विषयी ऐकायला मिळालं, त्यांचं रूप पहायला मिळालं, त्यांनी केलेल्या नाटकातली स्वगतं सादर करायला मिळाली, त्यांना जवळून स्पर्श करू शकलो, हा चित्रपट म्हणजे आम्ही रंगभूमीवरच्या या सर्व मानाच्या शिलेदारांना दिलेली आदरांजली आणि त्यांना केलेला सलाम आहे.


कधी होणार प्रदर्शित?

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सोनाली कुलकर्णीनेही आपल्या भूमिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली की, ८ नोव्हेंबरला ‘आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा आमचा चित्रपट येतो आहे.

या नावात जी जादू आहे, ती प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आम्ही सगळे चित्रपटामध्ये कसे दिसत आहोत ते प्रेक्षकांनी बघितलं आहे. प्रेक्षकांच्या मनात चित्रपट पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली असेल. या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरचा सुवर्णकाळ प्रेक्षकांसमोर सादर करताना खूप आनंद होत आहे.


मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांची भूमिका चित्रपटामध्ये सुमित राघवनने साकारली असून, या अनुभवाबद्दल तो म्हणला, अशा मोठ्या चित्रपटाचा भाग होणं ही माझ्यासाठी अभिमानाचा बाब आहे.

मराठी नाट्यप्रेमींना मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास, तो सुवर्णकाळ तसंच ते सुवर्णक्षण पुन्हा एकदा अनुभवता येतील. याचबरोबर नवीन पिढीला त्याकाळातील दमदार अभिनेते आणि वैभवशाली रंगभूमीची परंपरा जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. मी स्वत: नाटक आणि रंगभूमीचा चाहता असल्याने मला ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांची भूमिका साकारण्याची संधी मिळल्याने स्वत:ला खूप भाग्यवान समजतो.


हेही वाचा - 

मी शिवाजी पार्क: ज्वलंत विषयाला फॅण्टॅसीची जोड

सोशल मीडियावर अवतरली ‘माधुरी’

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा