Advertisement

मी शिवाजी पार्क: ज्वलंत विषयाला फॅण्टॅसीची जोड

शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, हे न्यायव्यवस्थेचं तत्त्व कित्येकदा गुन्हेगारांसाठी पळवाट मोकळी करतं आणि सर्वसामान्य माणूस न्यायाच्या प्रतिक्षेतच राहतो. पण जेव्हा हाच सर्वसामान्य माणूस आपल्या न्यायहक्कासाठी उभा ठाकतो, तेव्हा काय होऊ शकतं याची झलक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात दाखवली आहे.

मी शिवाजी पार्क: ज्वलंत विषयाला फॅण्टॅसीची जोड
SHARES

‘पैसा फेक, तमाशा देख’ हा फाॅर्म्युला आजच्या प्रगत युगातही प्रभावीपणे काम करत आहे. न्यायव्यवस्था, न्यायप्रक्रिया, तपास यंत्रणा आणि न्यायनिवाडा यांच्यामध्ये आजही सर्वसामान्यच भरडला जातो आहे. पैशांच्या बळावर श्रीमंत व्यावसायिक, तर साम, दाम, दंड, भेद यांच्या बळावर राजकारणी आजही न्यायव्यवस्थेच्या डोळ्यात धूळफेक करीत असल्यामुळेही सामान्य माणूसच बरबाद होतो आहे. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये, हे न्यायव्यवस्थेचं तत्त्व कित्येकदा गुन्हेगारांसाठी पळवाट मोकळी करतं आणि सर्वसामान्य माणूस न्यायाच्या प्रतिक्षेतच राहतो. पण जेव्हा हाच सर्वसामान्य माणूस आपल्या न्यायहक्कासाठी उभा ठाकतो, तेव्हा काय होऊ शकतं याची झलक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटात दाखवली आहे.


वास्तवतेला फॅण्टॅसीची जोड

खरं तर असं वास्तवात घडणं शक्य नाही, पण भविष्यातील शक्यताही नाकारता येणार नाही. सर्वसामान्य माणूस आज इतका पिचला आहे की, तो जीवावर उदार होऊन काहीही करू शकतो. समाजातील वास्तव चित्र अद्याप बदललेलं नसल्यामुळेच या चित्रपटात मांजरेकरांनी समाजातील वास्तवतेला फॅण्टॅसीची जोड देत एक असं नाट्य घडवलं आहे, जे कदाचित भविष्यात वास्तवातही घडू शकतं. सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांच्या जुगलबंदीने या नाट्यात सुरेख रंग भरला असला तरी चित्रपटातील काही उणीवा मारक ठरणाऱ्या आहेत.




काय आहे कथा?

दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर दररोज भेटणाऱ्या सतीश जोशी (सतीश आळेकर), निवृत्त न्यायाधीश विक्रम राजाध्यक्ष (विक्रम गोखले), निवृत्त इन्स्पेक्टर दिगंबर सावंत (अशोक सराफ), प्रोफेसर दिलीप प्रधान (दिलीप प्रभावळकर), डॅा. रुस्तम मेस्त्री (शिवाजी साटम) या ५ जीवलग मित्रांची ही कथा आहे. यांच्यातील सतीश जोशी अचानक पार्कमध्ये येण्याचं बंद करतात. त्यामुळे चिंताग्रस्त झालेले इतर चौघे त्यांना भेटण्यासाठी घरी जातात तेव्हा त्यांना एक धक्कादायक घटना समजते.

दुसरीकडे बलवा शेट (उदय टिकेकर) नावाच्या एका उद्योगपतीचे ऐश्वर्या नायर (मंजिरी फडणीस) या मॅाडेलशी अफेयर असतं. ऐश्वर्या गरोदर असल्याचं समजताच बलवा तिची हत्या करतो आणि या प्रकरणातून निर्दोष मुक्तही होतो. जोशींचं पार्कात न येणं आणि बलवाचं निर्दोष मुक्त होणं या दोन घटनांची सांगड घातलेली कथा पुढे पाहायला मिळते.


ज्वलंत प्रश्नावर भाष्य

चित्रपटाचा विषय वास्तववादी असून, एका ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारा आहे. न्यायव्यवस्था आणि त्यातील उणिवांवर भाष्य करणारे बरेच चित्रपट यापूर्वी आले असल्यामुळे विषय जरी वास्तवदर्शी असला तरी त्यात नावीन्य नाही. नावीन्य फॅण्टॅसीमध्ये आहे. ४ ज्येष्ठ नागरिक आपल्या हक्कासाठी कशा प्रकारे लढा उभारतात हे पाहण्यासारखं आहे.

जिथे त्यांच्यासाठी काहीच गमावण्यासारखं नसतं, तिथे ते समाजाला एक संदेश देण्यासाठी पुढाकार घेतात. हे सर्व ठीक असलं तरी पटकथेची मांडणी काहीशी सैल झाल्याने या सर्वांचा प्रभाव कमी होतो. मध्यंतरापूर्वीच सस्पेंस ओपन केल्याने गंमत निघून जाते. पटकथेच्या मांडणीत किंवा संकलनात बदल करून शेवटपर्यंत उत्सुकता ताणण्याची गरज होती.




फ्लॅशबॅकमध्ये खूप वेळ

मध्यंतरानंतर दिगंबर सावंत यांच्या फ्लॅशबॅकमध्ये खूप वेळ गेला आहे. फ्लॅशबॅक खूप लांबल्याने पुढे काय घडणार? काय पाहायला मिळणार? हे प्रश्न पडण्याऐवजी आता लवकर आवरा असं म्हणावंसं वाटतं. सुरुवातीपासूनच चित्रपटाची गती थोडीशी मंदावलेली आहे, दुसऱ्या भागात ती आणखी मंद होते. त्यातच आयटम साँगसारखी लावणीही आहे, जी कश्मिरा शाहने आपल्या मादक अदांच्या अतिशयोक्तीने प्रभावहीन बनवली आहे. ‘सोनू...’चं विडंबन गीत चांगलं असलं तरी संगीत आणि बोल स्मॅश झाल्याने नीट समजत नाहीत. संकलनाची बाजू कमकुवत आहे. याखेरीज इतर तांत्रिक बाजू ठीक आहेत. संवाद चांगले आहेत.


अभिनय मोठा यूएसपी

अभिनय हा या चित्रपटाचा सर्वात मोठा यूएसपी आहे. विक्रम गोखले, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर, सतीश आळेकर या सर्वच कलाकारांनी ‘जुनं ते सोनं’ ही म्हण खरी केली आहे. दिग्गज कलावंतांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात आहे. त्यात साटम यांनी साकारलेला पारशी बावाजी छान जमला आहे.

विक्रम गोखले न्यायाधीशाच्या भूमिकेत शोभतात. अशोक सराफ यांच्या अभिनयाला तोडच नाही. सतीश आळेकर यांनी साकारलेला कुणाच्या अध्यात-मध्यात नसलेला सर्वसामान्य माणूस आणि दिलीप प्रभावळकरांचा गांधीवादी प्रोफेसरही लक्ष वेधून घेतात. एसीपीच्या छोट्याशा भूमिकेत अभिजीत साटम यशस्वी ठरला आहे. इतर सर्वच कलाकारांनी लहानसहान भूमिकाही प्रमाणिकपणे साकारल्या आहेत.

सर्वसामान्य माणूस आज सिस्टीमपुढे कशाप्रकारे हतबल झाला आहे आणि तो जर पेटून उठला तर कशाप्रकारे रण माजवू शकतो याची झलक पाहायची असेल तर या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर अवतरलेल्या शिवाजी पार्कचा फेरफटका मारायला हरकत नाही.

दर्जा : ***

.......................................................

चित्रपट- मी शिवाजी पार्क

निर्माते- दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन

कथा-पटकथा, दिग्दर्शन- महेश मांजरेकर

कलाकार- विक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर 



हेही वाचा-

सोशल मीडियावर अवतरली ‘माधुरी’

सलीम-सुलेमानचा मराठी चित्रपटसृष्टीतील ‘प्रवास’ सुरू



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा