Advertisement

आता के. के. मेनन मराठीत पदार्पण करणार!

अभिनेता लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय...UNSAID HARMONY' या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेता के. के. मेनन मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. नुकतंच या चित्रपटाचं टायटल लाँच करण्यात आलं.

आता के. के. मेनन मराठीत पदार्पण करणार!
SHARES

हिंदी चित्रपटांप्रमाणेच आता मराठी चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दादागिरी करत आहेत. या सगळ्या कारणांमुळेच हिंदीतील मातब्बर कलाकार मराठी चित्रपटांमध्ये काम करायला उत्सुक असतात. देवी सातेरी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या आणि अभिनेता लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय...UNSAID HARMONY' या चित्रपटातून सुप्रसिद्ध अभिनेता के. के. मेनन मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. नुकतंच या चित्रपटाचं टायटल लाँच करण्यात आलं.



अभिनेता लोकेश विजय गुप्तेनं मराठी रंगभूमी, टीव्ही मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांतून स्वतःचा ठसा उमवटला आहे. या सर्व माध्यमातून बरीच वर्ष काम केल्यानंतर आता लोकेश चित्रपट दिग्दर्शनाकडे वळला आहे. आपल्या पहिल्या चित्रपटासाठी त्यानं एका संवेदनशील विषयाची निवड केली असून या चित्रपटासाठी त्यानं के. के. मेननसारख्या मातब्बर अभिनेत्याची निवड केली आहे. या चित्रपटाची निर्मितीपूर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून ९ मार्चला चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.


मराठी चित्रपट मी पाहतो. मराठी चित्रपटाच्या कथा माझ्या मनाला भिडतात. चित्रपटाची कथा मला लोकेशने ऐकवली तेव्हा माझ्या मनाला ती भिडली आणि मी लगेच होकार दिला. महाराष्ट्रात राहत असल्याने मला मराठी भाषा समजते. या चित्रपटासाठी मी मराठीचे धडे गिरवणार आहे.


के. के. मेनन, अभिनेता



चित्रपटाची कथा

हा चित्रपट पालक आणि मुलं यांच्या मधल्या न बोलल्या गेलेल्या सुसंवादाबद्दल आहे. बदलत चाललेली जीवनशैली, पालकांचं व्यग्र शेड्युल, मुलांकडून असलेल्या अपेक्षा, दिवसागणिक बदलत जाणारं जग, जीवघेणी स्पर्धा, मुलांची आणि पालकांची बदलत जाणारी मानसिकता, त्याचे पालक आणि मुलं या दोघांवरही होणारे बरे-वाईट परिणाम या चित्रपटाद्वारे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी एक उत्तम संवेदनशील नट, उत्तम व्यक्तिमत्व आणि विषय समजून तो तितक्याच ताकदीने मांडणारा कलाकार मला हवा होता. तो अभिनेता मला के. के. मेननच्या रुपानं मिळाला.


लोकेश गुप्ते, दिग्दर्शक

'एक सांगायचंय... UNSAID HARMONY' हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा