Advertisement

ओळखलंत का? कोण आहेत हे?

'Once मोअर' या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्तानं शेफ विष्णू मनोहर अभिनय क्षेत्रात पदार्पण करताहेत. याशिवाय त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही सांभाळली आहे.

ओळखलंत का? कोण आहेत हे?
SHARES

काही चित्रपट खऱ्या अर्थानं आपलं अनोखेपण जपत असतात. 'Once मोअर' हा आगामी मराठी चित्रपटही त्याच वाटेवर मार्गक्रमण करत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना चक्क आजोबांच्या रूपात सादर करणाऱ्या या चित्रपटातील या ऐतिहासिक वेशभूषेत कोण आहे ओळखलंत का? हे आहेत बल्लवाचार्य म्हणजेच शेफ विष्णू मनोहर. बसला ना आश्चर्याचा धक्का. होय, हे शेफ विष्णू मनोहरच आहेत. 'Once मोअर' या चित्रपटात विष्णू यांचा डबल धमाका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.


अभिनय क्षेत्रात पदार्पण

विष्णू मनोहर हे नाव केवळ भारतातीलच नव्हे तर भारताबाहेरील खवय्यांच्या चांगलंच परिचयाचं असेल. खाद्यक्षेत्रात मुशाफिरी करत महाराष्ट्रातील पारंपरिक पाककृतींना जागतिक व्यासपीठ मिळवून देणारे ज्येष्ठ शेफ विष्णू मनोहर हे नाव आज घराघरांत परीचयाचं आहे. आपल्या हातच्या चवीनं सगळ्यांची मनं तृप्त करत स्वयंपाकाला ग्लॅमर मिळवून देणारे विष्णू मनोहर आता चित्रपटाच्या चंदेरी दुनियेत आपली कमाल दाखवायला सज्ज झाले आहेत. 'Once मोअर' या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्तानं ते अभिनय क्षेत्रात पदार्पण करताहेत. याशिवाय त्यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुराही सांभाळली आहे. 


१ ऑगस्टला प्रदर्शित

१ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या 'Once मोअर'च्या निमित्तानं चित्रपटसृष्टीत एक नवी इनिंग्ज सुरू करण्याबाबत विष्णू म्हणाले की, मी खाद्यप्रांतात रमलो असलो तरी मला अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा होती. इच्छा दांडगी असेल तर ती पूर्ण होतेच. माझी अभिनयाची ओढ आता 'Once मोअर' चित्रपटाच्या निमित्तानं पूर्ण होणार आहे. या चित्रपटात मी एका राजाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या भूमिकेसाठी मी राजाच्या देहबोलीचा अभ्यास केला, त्यासोबत दिग्दर्शक नरेश बिडकर व सहकलाकार यांचं खास मार्गदर्शन मला या भूमिकेसाठी मिळालं. 


डबल धमाका

'Once मोअर'मध्ये अभिनय करण्याच्या अनुभव कलाकार आणि माणूस म्हणूनही समृद्ध करणारा असल्याची प्रतिक्रिया देत विष्णू म्हणाले की, या चित्रपटाच्या टीममधील प्रत्येक सहकलाकारानं मला सांभाळून घेतलं. माझ्या प्रत्येक सीननंतर मी सेटवर बसून चित्रीकरण बघायचो. त्यातील बारकावे जाणून घ्यायचे. या चित्रपटाचे व्हीएफएक्सही कमाल झाले आहेत. दिग्दर्शक नरेश बिडकर आणि मी एकमेकांना आधीपासून ओळखत होतो. आमचं खास असं 'नागपूरी कनेक्शन' आहे. हे क्षेत्र मला जरी नवखं नसलं तरी अभिनय करणं हा पूर्णपणे वेगळा भाग आहे. 'Once मोअर' चित्रपटाच्या निमित्तानं हा वेगळा अनुभव घेण्याची संधी लाभली. या चित्रपटाची निर्मितीही केल्यानं माझ्यासाठी हा डबल धमाकाच आहे.

या चित्रपटात विष्णू यांच्यासोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, नरेश बीडकर आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन श्वेता बिडकर यांनी केले आहे. धनश्री विनोद पाटील, सुहास जहागीरदार, निलेश लवंदे, विष्णू मनोहर आणि डॉ. विनित बांदिवडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभय ठाकूर, सुदिप नाईक, संपदा नाईक आणि व्ही.टी एच.एटंरटेन्मेंट सहनिर्माते आहेत.



हेही वाचा -

मेलबर्नला पोहोचला मुक्ता-ललितचा 'स्माईल प्लीज'

कोण बनणार कॅप्टन? रुपाली की वीणा?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा