Advertisement

दादा कोंडकेंची आॅनस्क्रीन आई बनली वैभवची आजी!


दादा कोंडकेंची आॅनस्क्रीन आई बनली वैभवची आजी!
SHARES

दिवंगत अभिनेते दादा कोंडके, त्यांचा अभिनय आणि त्यांची सिनेमा बनवण्याची शैली सर्वांनाच परिचीत आहेत. दादांप्रमाणेच त्यांच्या चित्रपटातील कलाकारही सर्वांच्या चांगलेच परिचयाचे आहेत. आशा पाटीलही त्यापैकीच एक. आजही त्या नावाने नव्हे तर दादांच्या आॅनस्क्रीन आई म्हणून लोकप्रिय आहेत. दादांची हिच आॅनस्क्रीन आई आता अभिनेता वैभव तत्त्ववादीची आजी बनली आहे.


८ फेब्रुवारीला प्रदर्शित

मराठी चित्रपटांमधून खानदानी मराठमोळ्या स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आशा पाटील यांनी जवळजवळ दादांच्या सर्वच सिनेमात त्यांच्या आईची भूमिका साकारली आहे. मराठी सिनेसृष्टीत चतुरस्र अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या आशा पाटील यांचा 'रेडीमिक्स' हा अखेरचा चित्रपट ८ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या वैभवची आजी आशा पाटील यांनी साकारली आहे.


खानदानी मराठमोळ्या व्यक्तिरेखा

आशाताईंबाबत सांगायचं तर ‘सामना’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बन्याबापू’, ‘माहेरची साडी’, अशा जवळपास दिडशेहून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका साकारली आहेत. सालस आणि सरळ स्वभावाच्या आशाताईंनी अनेक चित्रपटांमध्ये साकारलेल्या खानदानी मराठमोळ्या महिलेच्या व्यक्तिरेखा अजरामर झाल्या आहेत. अस्सल बावन्नखणी अभिनयासोबतच रुबाबदार व्यक्तिमत्वामुळे उठून दिसणाऱ्या आशाताईंचा जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘रेडीमिक्स’ हा अखेरचा चित्रपट आहे.


८० व्या वर्षी अभिनय

'रेडीमिक्स' या सिनेमासाठी त्यांनी वयाच्या ८० व्या वर्षी कॅमेरा फेस केला. १९६० मध्ये माधव शिंदे दिग्दर्शित ‘अंतरिचा दिवा’ या चित्रपटातील भूमिकेने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आशाताईंनी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण केलं. मूळच्या रुकडी (ता. हातकणंगले) येथील आशाताईंनी दादांसोबातच डॉ. काशीनाथ घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, विक्रम गोखले, अलका कुबल, प्रिया अरुण, वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबतही काम केलं होतं. ‘रेडीमिक्स’मुळे त्यांना आजच्या पिढीतील वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी या कलावंतांसोबातही काम करता आलं.


दीड वर्षे वृद्धाश्रमात

‘रेडीमिक्स’मधील आशाताईंच्या निवडीसाठी चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. वानखेडे त्यांच्याशी कायम संपर्कात होते. हालाखीच्या परिस्थितीमुळे आशाताई कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात राहत होत्या. त्यांना आपल्या घरात राहता यावे याकरिता काही मंडळी प्रयत्न करीत होती त्यात वानखेडेही होते. आशाताईंना अखेरची दीड वर्षे वृद्धाश्रमात राहावं लागलं होतं. मणका आणि किडनीच्या त्रासानं त्रस्त असल्यामुळं इच्छा असूनही त्या चित्रपटांमध्ये काम करू शकत नव्हत्या.


लक्ष्यवेधी संवादफेक

आशाताई अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीत आई म्हणूनच ओळखल्या जात होत्या. ‘रेडीमिक्स’मधील भूमिकेमुळे त्या आजी म्हणूनही लक्षात राहतील. उत्स्फूर्त अभिनय आणि लक्ष्यवेधी संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका सहजसुंदर वाटायच्या. ज्या पद्धतीने त्या चित्रपटात सोज्वळ आणि प्रेमळ आईची भूमिका साकारच्या त्याच पद्धतीने त्या वैयक्तिक आयुष्यही जगल्या.



हेही वाचा -

'भाई'मधील पुलंसाठी तिरुपतीहून आले केस!

एसएससीचं टेन्शन दूर करणार '१० वी'?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा