Advertisement

EXCLUSIVE : … तर ‘टकाटक’साठी मिलिंद चढणार कोर्टाची पायरी!

‘टकाटक’ हा चित्रपट तर सेक्स काॅमेडी प्रकारात मोडणारा असल्यानं हा चित्रपट सेन्सारच्या कात्रीत अडकणारच याची खात्री आहे, पण ‘टकाटक’ला कात्री न लावण्याचा पवित्रा मिलिंदनं घेतला आहे.

EXCLUSIVE :  … तर ‘टकाटक’साठी मिलिंद चढणार कोर्टाची पायरी!
SHARES

हिंदीपेक्षा मराठी चित्रपटाला सेन्साॅर सर्टिफिकेट देताना सेन्साॅर बोर्डाच्या कात्रीची धार अधिक तीव्र होत असल्याचं म्हणत यावेळी माघार न घेता वेळप्रसंगी कोर्टाची पायरी चढायलाही मागं पुढं बघणार नसल्याची भूमिका ‘टकाटक’ चित्रपटाचा दिग्दर्शक मिलिंद कवडेनं घेतली आहे.


सेक्स काॅमेडी

दिग्दर्शक मिलिंद कवडे यानं आजवर बऱ्याचदा समाजातील एखादा गंभीर विषय मनोरंजक तसंच विनोदी पद्धतीनं रुपेरी पडद्यावर मांडला आहे. ‘टकाटक’ या आगामी मराठी चित्रपटात मिलिंदनं सेक्स काॅमेडी हा बोल्ड जानर हाताळला आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, रितीका श्रोत्री, अभिजीत आमकर, प्रणाली भालेराव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. मिलिंदनं दिग्दर्शित केलेल्या यापूर्वीच्या चित्रपटांनाही सेन्सारनं कात्री लावली आहे. ‘टकाटक’ हा चित्रपट तर सेक्स काॅमेडी प्रकारात मोडणारा असल्यानं हा चित्रपट सेन्सारच्या कात्रीत अडकणारच याची खात्री आहे, पण ‘टकाटक’ला कात्री न लावण्याचा पवित्रा मिलिंदनं घेतला आहे. सेन्सारचं म्हणणं ऐकून सिनेमाला कात्री लावण्यापेक्षा गरज भासली तर कोर्टाची पायरीही चढेन, असं मत मिलिंदनं ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना व्यक्त केलं आहे.


२८ जूनला प्रदर्शित

मिलिंदच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘टकाटक’ हा मराठी चित्रपट २८ जून रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला अद्याप सेन्साॅर सर्टिफिकेट मिळालेलं नाही. चित्रपटाचा विषय बोल्ड असल्यानं सेन्साॅरच्या वतीनं यात कट्स सुचवले जाणार याची मिलिंदला १०० टक्के खात्री आहे, पण यावेळेस माघार न घेण्याची भूमिका मिलिंद आणि ‘टकाटक’च्या निर्मात्यांनी घेतली आहे. याबाबत मिलिंद म्हणाला की, ‘येड्यांची जत्रा’ या पहिल्या चित्रपटापासून लहानसहान गोष्टींसाठी मला सेन्सारसोबत भांडावं लागलं आहे.

आता ‘टकाटक’साठी सेन्साॅरसोबत लढाई चालू होईल. यावेळी आम्ही ओपन आहोत. कोणतंही सर्टिफिकेट द्या, आम्ही ते स्वीकारू, पण कंटेंट कुठंही चित्रपट कट करणार नाही. चित्रपटाचा इसेन्स आम्हाला लूझ करायचा नाही. आज फ्री डेटा आल्यानंतर युथ ज्या फेजमधून जात आहे, जी त्यांची लँग्वेज आहे, जी त्यांची जीवनशैली आहे, त्याच लाईनवर हा चित्रपट आहे. ते कट करून जमणार नाही.


४२ कट्स 

 ‘येड्यंची जत्रा’ या आपल्या पहिल्या चित्रपटापासून मिलिंदनं कायम सेन्सारशी झुंज दिली आहे. याबाबत तो म्हणाला की, माझ्या ‘१२३४’ या चित्रपटाला सेन्साॅरनं ४२ कट्स सुचवले होते. ‘शिनमा’मधील ‘तुझी चिमणी उडाली…’ हे गाणं सेन्सारच्या कचाट्यात अडकलं होतं. ‘शिनमा’मध्ये जवळजवळ ३० कट्स केले. ‘येड्यांची जत्रा’मध्ये जवळजवळ २५ कट्स केले. ‘जस्ट गंमत’मध्येही चार-पाच कट्स केले. ‘टकाटक’मधील ‘आपला हात जगन्नाथ…’ या गाण्याच्या ट्रेलरला प्राॅब्लेम झाला होता. हे गाणंच सेन्साॅर करायला सदस्य तयार नव्हते, पण मी त्यांना समजावून सांगितलं.

प्रथमेश परब काॅलेजच्या इलेक्शनला उभा आहे आणि त्याचं चिन्ह हाताची मूठ आहे. त्यासाठी हे गाणं चित्रपटात असल्याचं सांगितलं. ‘जगन्नाथ’ या शब्दावर त्यांचा आक्षेप होता. पर्यायी शब्द द्या असं त्यांना सांगितलं, पण त्यांच्याकडे पर्यायी शब्द नसल्यानं त्यांनी गाणं पास केलं. ‘ये चंद्राला…’ या गाण्यात जवळजवळ २५ कट्स केले आहेत. चॅनलसाठी आम्ही ते कट केले आहेत, पण युट्युब वगैरेला अनसेन्सार गाणं पहायला मिळेल.


कुठंही तडजोड नाही

आजवर खूप सहन केलं, पण आता नाही, असं म्हणत ‘टकाटक’साठी मिलिंद कोर्टाची पायरीही चढायला तयार आहे. याबाबत मिलिंद म्हणाला की, आजवर प्रत्येक चित्रपटासाठी सेन्सारशी भांडलो आहे. वेळप्रसंगी समजावूनही सांगितलं आहे, पण या चित्रपटासाठी मात्र कुठंही तडजोड केली जाणार नाही. त्यामुळं ‘उडता पंजाब’नं जशी सेन्सारसोबत लढाई केली, तशी सध्या ‘टकाटक’साठी आमची लढाई सुरू आहे. सेन्सारनं जर आॅब्जेक्शन घेतलं, तर आम्ही हायकोर्टात जाऊ, सुप्रीम कोर्टात जाऊ… पण आम्ही कंटेंटला कात्री लावणार नाही. यावेळी माघार घेणार नाही. आम्ही जे काही चित्रपटात दाखवलं त्यामागं काहीतरी कारण आहे. ते उगाच नसल्याची खात्री प्रेक्षकांनाही चित्रपट पाहिल्यावर पटेल.


मराठीला सावत्र वागणूक

सेन्सारनं नेहमीच मराठीला सावत्र वागणूक दिल्याचा थेट आरोप मिलिंदनं केला आहे. याबाबत मिलिंद म्हणाला की, सेन्साॅरचा व्यवहार दुतोंडी आहे. ‘असं मराठीत चालत नाही’, हे त्यांचं एक वाह्यात स्टेटमेंट नेहमी असतं. मराठी प्रेक्षकच हिंदीतील ‘डर्टी पिक्चर’, ‘क्या कूल है हम’ आणि ‘ग्रँड मस्ती’सारखे बोल्ड चित्रपट बघतो. मग मराठी प्रेक्षकांना हे चालू शकत नाही, हे ठरवणारे तुम्ही कोण? मराठीत चालत नाही, पण हिंदीमध्ये चालतं असा दुजाभाव का केला जातो? हा मुख्य मुद्दा आहे. मराठीबाबत सेन्सारची अशी मानसिकता का आहे? हे चित्र बदलणं खूप गरजेचं आहे. मराठी चित्रपटांसाठीही आणि प्रेक्षकांसाठीही.



हेही वाचा -

वीणा-शिव यांच्यात ‘आंखों की गुस्ताखियां…’

ईशा लावणार अपहरण केसचा छडा


    संबंधित विषय
    Advertisement
    ‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा