Advertisement

'रेडू'चा दिग्दर्शक सागर वंजारी 'अरविंदन' पुरस्काराने सन्मानित!


'रेडू'चा दिग्दर्शक सागर वंजारी 'अरविंदन' पुरस्काराने सन्मानित!
SHARES

कैरो, इफ्फी, कोलकाता अशा मानाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये गौरवलेल्या 'रेडू' या चित्रपटाचा दिग्दर्शक सागर वंजारीला अजून एक सन्मान प्राप्त झाला आहे. मल्याळम भाषेतील श्रेष्ठ दिग्दर्शक जी. अरविंदन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा अरविंदन पुरस्कार यंदा सागर वंजारीला जाहीर झाला आहे. १५ मार्चला अरविंदन यांच्या स्मृतीदिनी तिरुअनंतपुरम येथे होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 

तब्बल दहा वर्षांनी हा पुरस्कार एका मराठी चित्रपट दिग्दर्शकाला मिळणार आहे. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला केरळ चलतचित्र अकॅडेमीतर्फे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराचं २७ वं वर्ष आहे.



यापूर्वी पुरस्कार मिळालेले दिग्दर्शक

  • १९९६ मध्ये 'दोघी' या चित्रपटासाठी सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर
  •  २००८ मध्ये 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' या चित्रपटासाठी परेश मोकाशी 

हा पुरस्कार मिळवणारा सागर वंजारी हा तिसरा मराठी दिग्दर्शक आहे. सागरला मिळालेल्या पुरस्कारासह 'रेडू' चित्रपटाचीही सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी निवड झाली आहे.

मूळचा संकलक असलेल्या सागर वंजारीनं आतापर्यंत १५० हून अधिक शॉर्टफिल्म्सचं संकलन केलं आहे. तर जवळपास १२ हून अधिक चित्रपटांचं संकलन त्याने केलं आहे. त्यात इन्व्हेस्टमेंट, रंगा पतंगा, घाट अशा मराठी चित्रपटांसह मैथिली, इंग्रजी, तेलुगू आदी विविध भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे. 'रेडू' हा त्याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचं संकलनही त्यानंच केलं आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, छाया कदम, गौरी कोंगे, विनम्र भाबल आदींच्या भूमिका आहेत. महत्त्वाचं म्हणजे, रेडू हा मालवणी बोलीभाषेतला चित्रपट आहे.


महान दिग्दर्शक अरविंदन यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हे माझं भाग्य आहे. या पुरस्काराचा आनंद शब्दांत मांडता येण्यासारखा नाही. या पुरस्काराच्या रुपाने मराठी चित्रपट, मराठी-मालवणी भाषा यांचा सन्मान झाला आहे.

सागर वंजारी, दिग्दर्शक



हेही वाचा

राक्षस...जंगलातल्या कोड्यांचं रहस्य!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा