Advertisement

संदीपने काढलं 'डोंबिवली रिटर्न' तिकीट!

संदीप कुलकर्णी म्हटलं की, सर्वप्रथम आठवण येते ती 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटाची... हा चित्रपट आणि त्यातील संदीपने साकारलेली व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. आता या चित्रपटाच्या स्मृती जागवत संदीपने 'डोंबिवली रिटर्न' तिकीट काढलं आहे.

संदीपने काढलं 'डोंबिवली रिटर्न' तिकीट!
SHARES

काही कलाकारांचा उल्लेख येताच त्यांच्या कारकिर्दीतील माइलस्टोन ठरलेल्या चित्रपटांची आठवण अनाहुतपणे होते. संदीप कुलकर्णी म्हटलं की, सर्वप्रथम आठवण येते ती 'डोंबिवली फास्ट' या चित्रपटाची... हा चित्रपट आणि त्यातील संदीपने साकारलेली व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या मनावर कायमची कोरली गेली आहे. आता या चित्रपटाच्या स्मृती जागवत संदीपने 'डोंबिवली रिटर्न' तिकीट काढलं आहे. संदीपने निर्मिती क्षेत्रात उतरत 'डोंबिवली रिटर्न' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


वेगवान आणि लक्षवेधी टीझर

लोकलचे खडखडणारे रूळ, मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी, त्याबरोबरीनं येणारे प्रश्न आणि मनातला कोलाहल... दाखवत 'डोंबिवली रिटर्न - जे जातं... तेच परत येतं?' या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. त्यामुळे स्वाभाविकच या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.


संदीपसोबत राजेश्वरी सचदेव

कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीपने महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांच्या साथीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात संदीपसोबत राजेश्वरी सचदेव मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय हृषिकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्निका शिंदे, सिया पाटील आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. संदीपने साकारलेल्या अनंत वेलणकर या व्यक्तिरेखेभोवती हा चित्रपट फिरतो.


सर्वसामान्यांच आयुष्य

सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या अनंत वेलणकरच्या आयुष्यात असं काय घडतं की त्याचं आयुष्य बदलून जातं याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. चित्रपटाचा वेगवान टीजर मुंबईच्या लोकलमध्ये धक्के खात प्रवास करणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला आपलासा वाटेल असा आहे. २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उदयसिंग मोहिते यांनी केली असून, योगेश गोगटे यांनी संकलन केलं आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे, तर ध्वनी रेखांकन राष्ट्रीय पारितोषिक विजेते अनमोल भावे यांचं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा