Advertisement

फिल्म रिव्ह्यू - हलका फुलका वाघेऱ्या!

वाघेऱ्या हा एक धम्माल विनोदी चित्रपट आहे. शेवट थोडा ताणला गेलाय किंवा तुम्हाला तो पटणार नाही. पण मध्यंतरापर्यंत तुम्ही चित्रपट मस्त एन्जॉय कराल.

फिल्म रिव्ह्यू - हलका फुलका वाघेऱ्या!
SHARES

नुसतं वाघाचं नाव जरी घेतलं तरी आपली भितीने गाळण उडते. आणि त्यात तो समोर आला तर? तर काय अवस्था होईल ते तुम्हाला वाघेऱ्यात बघायला मिळेल. वाघेऱ्या हा एक धम्माल विनोदी चित्रपट आहे. शेवट थोडा ताणला गेलाय किंवा तुम्हाला तो पटणार नाही. पण मध्यंतरापर्यंत तुम्ही चित्रपट मस्त एन्जॉय कराल.



ज्या गावाला पूर्वी वाघाने घेरलं होतं ते म्हणजे वाघेऱ्या. मात्र, जरी गावाच्या अवतीभवती जंगलं शिल्लक राहिली नसली, तरी वाघाची दहशत गावात कायम आहे. गावातील झोटिंग अण्णा (भारत गणेशपुरे) शांतारामच्या (किशोर चौघुले) शेतात वाघ बघतो आणि गावात वाघ आला, वाघ आला अशी बोंबाबोंब करतो. त्या वाघाला बघायला संपूर्ण गाव गोळा होतं. आता वाघाला पकडायचं कसं? यावर चर्चा सुरू होते. प्रत्येक जण नवनवीन आयडिया गावाच्या सरपंच (किशोर कदम) यांच्या समोर मांडतो. त्यानंतर गावात वनअधिकाऱ्याला बोलवायचं यावर शिकामोर्तब केलं जातं. वनअधिकारी वाघमारे (ऋषिकेश जोशी) आपलं लग्न झालेल्या दिवशीच गावात वाघ पकडण्यासाठी हजर राहतो आणि सुरू होते वाघाला पकडण्यासाठीची धावपळ! आता गावकरी वाघाला पकडणार की नाही हे कळण्यासाठी तुम्हाला वाघेऱ्या बघावा लागेल.

वाघाला पकडण्यासाठीच्या प्रयत्नात अनेक गमती जमती गावात घडतात. वाघ पकडण्यासाठी गावात तयार केलेली तरूण मुलांची टीम, गावात वृद्धाचं निधन झाल्यानंतर केवळ वाघाच्या भितीमुळे त्याचे थांबलेले अंत्यसंस्कार, लग्नाच्या पहिल्या रात्री वनअधिकाऱ्याला गावात राहायला लागल्यामुळे त्याची झालेली अवस्था तुम्हाला पोट धरून हसायला लावते.



वाघेऱ्या ही एक सत्य घटना आहे. गावात घडलेली ही गंमत लेखक-दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी प्रेक्षकांपर्यंत गमतीदार पद्धतीने पोहोचवली आहे. गावातील प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, लोकांचे स्वभाव, त्यातून तयार होणारे विनोद प्रेक्षकांपर्यंत पटकन पोहोचतात. मात्र वाघेऱ्याचा शेवट तुम्हाला खटकू शकतो. सत्य घटनेवर आधारीत हा चित्रपट असला तरी असा अट्टहास का? असंच मनात येतं. शेवट फारसा मनाला पटत नाही. नेमकं लेखकाला यातून काय सांगायचं आहे, त्या मागचा उद्देश काय आहे? तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाही. गेले दोन तास तुम्ही पोटभर हसत असताना शेवटच्या १५ मिनिटांमुळे तुमचा हिरमोड होतो. त्याचप्रमाणे मध्यंतरानंतर चित्रपट थोडा ताणला गेला आहे.

चित्रपटात असणारं एकमेव 'उनाड पोरं…' हे गाणं चांगलं असलं, तरी चित्रपटात मध्येच उगवल्या सारखं वाटतं. वास्तविक चित्रपटात या गाण्याची गरजच वाटत नाही. मात्र, गाण्यात डीजे वाला म्हणून मिलींद शिंदे दिसतो आणि पुन्हा एकदा हसू अनावर होतं.



शेवटाकडे चित्रपट गोंधळला असला, तरी सगळ्यांचीच कामं उत्तम झाली आहेत. लग्नानंतर बायकोला सोडून आलेला वाघमारे साकारतानाचा ऋषिकेश जोशीचा वेगळा अंदाज प्रेक्षकांसमोर येतो. त्याचप्रमाणे या आधी कधीही न पाहलेल्या अंदाज किशोर कदम दिसणार आहेत. त्यांनी सरपचांची भूमिका मस्त केली आहे. तर झोटिंग अण्णा यांची भूमिका साकारणारे भारत गणेशपुरेही लक्षात राहतात.

शेवट जरी रुचत नसला, तरी संपूर्ण चित्रपट तुमचं मनोरंजनच करतो. एक वेगळी कथा, उत्कृष्ट व्यक्तीरेखा आणि रूटिनमधून ब्रेक घेऊन विनोदी मराठी चित्रपट बघायचा असेल तरच वाघेऱ्या बघा.





Movie - Wagherya

Actors - Bharat Ganeshpure, Kishor Kadam, Suhas Palshikar, Kishor Chaughule, Leena Bhagwat

Ratings - 2.5/5


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा