Advertisement

कैलास वाघमारेची ‘हिरवी’गार शिक्षकी भूमिका

७०० प्रयोगांचा टप्पा ओलांडणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या बहुचर्चित नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत ‘मनातल्या उन्हात’ या चित्रपटानंतर लहानसहान भूमिकांमध्येही आपला ठसा उमटवणारा कैलास ‘हिरवी’ या आगामी चित्रपटात पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

कैलास वाघमारेची ‘हिरवी’गार शिक्षकी भूमिका
SHARES

‘जो थांबला, तो संपला’, हा सिद्धांत सर्वांनाच लागू पडतो. मग तो सर्वसामान्य माणूस असो वा कलाकार... कलाकारांना तर थांबून जमतच नाही. माध्यमांमध्ये घडणाऱ्या बदलांचा स्वीकार करत त्यांना पुढे वाटचाल करतच रहावं लागतं. कैलास वाघमारे हा चळवळीतील कलाकारही याला अपवाद नाही. हिरोसारखा चॅाकलेटी लुक नसला तरी अभिनयात मात्र ‘हिरोपंती’ करण्याची धमक असल्याने ‘मनातल्या उन्हात’ या चित्रपटात नायक साकारणारा कैलास वाघमारे पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत झळकणार आहे.


मुख्य भूमिकेत 

७०० प्रयोगांचा टप्पा ओलांडणाऱ्या ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या बहुचर्चित नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत ‘मनातल्या उन्हात’ या चित्रपटानंतर लहानसहान भूमिकांमध्येही आपला ठसा उमटवणारा कैलास ‘हिरवी’ या आगामी चित्रपटात पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या चित्रपटांसोबत नाटक आणि गायनाच्या मैफलींमुळेही चर्चेत असलेल्या कैलासने ‘मुंबई लाइव्ह’ला एक्सक्लुझीव्ह मुलाखत देत ‘हिरवी’ चित्रपटाबाबत सांगितलं.

संगीतकार बनला दिग्दर्शक

‘हिरवी’ या चित्रपटाचा विषय इतका गहन आणि अंतर्मुख करणारा आहे की, याच्या दिग्दर्शनाखाली एका संगीतकाराला दिग्दर्शकाच्या खुर्चीत विराजमान व्हावं लागलं. मराठीसह हिंदीतही काम करणारे संगीतकार अॅग्नल रोमन ‘हिरवी’च्या निमित्ताने दिग्दर्शनाकडे वळले आहेत. या चित्रपटाची कथा वास्तववादी आणि त्यांच्या निकटवर्तीयांसोबत घडलेली असल्याने त्यांनी स्वत:च दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला.


आई-वडील, मुलीची गोष्ट

या चित्रपटाची कथा आई-वडील आणि मुलगी यांच्याभोवती गुंफण्यात आली आहे. झाडं लावा, झाडं जगवा असं आज सरकार ओरडून सांगत आहे, पण फार कमी जण याची अंमलबजावणी करतात. ‘हिरवी’मधील हे कुटुंब झाडांवरती माणसासारखं प्रेम करणारं आहे. वृक्ष संवर्धनासाठी आग्रह धरणारं आहे. यामुळेच या दाम्पत्याने आपल्या मुलीचं नावही ‘हिरवी’ ठेवलं आहे.


तत्त्वनिष्ठ शिक्षक 

‘हिरवी’मध्ये मी शिक्षक साकारला आहे. माझ्या मुलीचंच नाव हिरवी आहे. हा मुलांना शिकवतो, त्यांच्यावर संस्कार करतो. पण त्याच्या बाबतीत जेव्हा एक घटना घडते, तेव्हा मात्र तो हतबल होतो. त्याला प्रतिकार करणं जमत नाही. भ्रष्टाचारविरोधी असल्याने याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तत्त्वनिष्ठ असल्याने तो अवैध मार्गाचा अवलंब करत नाही.


दुसऱ्यांदा मुख्य भूमिकेत

‘मनातल्या उन्हात’ या चित्रपटाने मला रुपेरी पडद्यावर सर्वप्रथम नायकाची भूमिका साकारण्याची संधी दिली. मध्यंतरीच्या काळात काही सिनेमांमध्ये लांबीने लहान असलेल्या, परंतु महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यानंतर ‘हिरवी’ या चित्रपटात दुसऱ्यांदा नायक साकारला आहे. ‘हिरवी’ची कथा सोलापूरमध्ये घडणारी असल्याने या चित्रपटाच्या निमित्ताने सोलापूरी लहेजा शिकण्याची संधी मिळाली. यासाठी काही दिवस सोलापूरमध्ये मुक्काम ठोकला. तिथल्या रिक्षाचालकांच्या बोलीभाषेतून सोलापूरी बोलीभाषेचा हेल शिकलो.


पत्नीसोबत दिसणार

वास्तव जीवनातील माझी जोडीदारीण मिनाक्षी राठोड या चित्रपटात माझी पत्नी बनली आहे. यापूर्वी ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकातही तिच्यासोबत काम केलं आहे. याशिवाय मुलीच्या भूमिकेत बाल अभिनेत्री क्रितिना आहे. सोलापूरमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे. आधी फेस्टिव्हल आणि सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे. अॅग्नल रोमन यांनीच या चित्रपटाची निर्मितीही केली आहे.



हेही वाचा -

Exclusive : मृणाल कुलकर्णी पुन्हा ठरणार सरप्राइज पॅकेज!

'बघा' यामी गौतमचा 'बोल्ड अँड ब्युटीफूल' लूक!



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा