Advertisement

Exclusive : मृणाल कुलकर्णी पुन्हा ठरणार सरप्राइज पॅकेज!

मी जरी अभिनेत्री असले तरी मागील काही वर्षांपासून चित्रपटांचं दिग्दर्शनही करत आहे. लवकरच माझा ‘ती अँड ती’ हा महत्त्वपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे दिग्दर्शिकेच्या नजरेतूनही मी या संधीकडे पाहिलं आणि होकार दिला

Exclusive : मृणाल कुलकर्णी पुन्हा ठरणार सरप्राइज पॅकेज!
SHARES

या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ‘येरे येरे पैसा’ या मराठी सिनेमानं रसिकांचं तूफान मनोरंजन करत बॅाक्स आॅफिसवरही चांगला गल्ला जमवला. पुढील वर्षी या सिनेमाचा सिक्वेलही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात सरप्राइज पॅकेज ठरल्या त्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. ‘येरे येरे पैसा २’ मध्येही मृणाल काहीशा हटके अंदाजामध्ये दिसणार आहेत. या सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण लंडनमध्ये होणार असून, लवकरच चित्रीकरणाला प्रारंभही होणार आहे.

नेहमीच संवेदनशील सिनेमांमध्ये दिसणाऱ्या मृणाल ‘येरे येरे पैसा’सारख्या धमाल कॅामेडी सिनेमात दिसल्याने खरं तर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आपण जाणूनबुजूनच या सिनेमात काम करायला होकार दिल्याचं त्या म्हणतात. ‘येरे येरे पैसा २ ’च्या चित्रीकरणासाठी लंडनच्या दिशेने उड्डाण करण्यापूर्वी मृणाल यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचीत करताना यामागील रहस्य उलगडलं.




मुद्दामच स्वीकारला

खरं पाहिलं तर कलाकाराला कोणत्याही प्रकारची भूमिका नेटकेपणाने साकारता यायला हवी. आजवर मी नेहमीच संवेदनशील चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘येरे येरे पैसा’मध्ये माझी निगेटिव्ह भूमिका होती. अशा प्रकारच्या भूमिकांचा मी कधी विचारही केला नव्हता. त्यामुळे एक वेगळा अनुभव घेता येईल म्हणून सिनेमात काम करायला होकार दिला. प्रेक्षकांना ती भूमिकाही खूप आवडली याचं समाधान आहे.


दुसरं महत्त्वाचं कारण

मी जरी अभिनेत्री असले तरी मागील काही वर्षांपासून चित्रपटांचं दिग्दर्शनही करत आहे. लवकरच माझा ‘ती अँड ती’ हा महत्त्वपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे दिग्दर्शिकेच्या नजरेतूनही मी या संधीकडे पाहिलं आणि होकार दिला. अशा सिनेमांचंही एक वेगळं पॅाकेट, वेगळा चाहतावर्ग असतो याची जाणीव ‘येरे येरे पैसा’च्या निमित्ताने झाली. ‘येरे येरे पैसा’च्या निमित्ताने आलेला अनुभव मला भविष्यात अशा प्रकारचा एखादा चित्रपट दिग्दर्शित करताना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.


पुन्हा सरप्राईज पॅकेज

‘येरे येरे पैसा’ या चित्रपटाप्रमाणेच सिक्वेलमधील माझी व्यक्तिरेखाही प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी ठरेल. याबाबत सध्या जास्त काही बोलू शकणार नाही. टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी समोर येतीलच. लवकरच चित्रीकरणाच्या तारखा फायनल होतील आणि त्यानंतर संपूर्ण टिम चित्रीकरणासाठी लंडनला रवाना होईल. पण पुन्हा एकदा ‘येरे येरे पैसा’च्या एनर्जेटिक टिमसोबत काम करण्याची उत्सुकता वाढली आहे.




तारेवरची कसरत

‘येरे येरे पैसा’मधील भूमिका माझ्यासाठी खरं तर तारेवरची कसरत करणारी ठरली होती. कारण एकीकडे या सिनेमात निगेटिव्ह भूमिका साकारत असताना त्याच सुमारास दुसऱ्या एका सिनेमात अतिशय संवेदनशील भूमिकेला न्याय देण्याचं आव्हान माझ्यासमोर होतं. एकाच वेळी दोन परस्पर भिन्न भूमिकांचा अचूक ताळमेळ साधण्याची कसरत करायची असल्यानेही हा सिनेमा कायम स्मरणात राहील.


पुन्हा पहिल्या आठवड्यातच 

‘येरे येरे पैसा’चं दिग्दर्शन संजय जाधवने केलं होतं. पण ‘येरे येरे पैसा २’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी हेमंत ढोमेकडे सोपवण्यात आली आहे. पहिल्या भागातील महत्त्वाच्या कलाकारांच्या जोडीला दुसऱ्या भागात काही नवीन कलाकारांचीही एंट्री होणार आहे. अमेय विनोद खोपकर एन्टरटेन्मेंट, पर्पल बुल एन्टरटेन्मेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज प्रा. लि. आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती ओम प्रकाश भट्ट, कुमार मंगत पाठक, स्वाती खोपकर, सुजय शंकरवार आणि राजेश बांगा करीत आहेत. ४ जानेवारी २०१९ रोजी ‘येरे येरे पैसा २’ प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा -

अभिनेता संतोष मयेकरचं आकस्मिक निधन

आठवणींच्या हिंदोळ्यावरील ‘होम स्वीट होम’




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा