Advertisement

EXCLUSIVE : नायक नहीं 'खलनायक' हूं मैं : मंगेश देसाई

जो कलावंत आलेली संधी हेरत 'खलनायक'ही तितक्याच ताकदीनं साकारतो तोच खरा 'नायक' ठरतो. अशीच संधी मराठमोळा अभिनेता मंगेश देसाईकडे आली आणि तो 'खलनायक' बनला.

EXCLUSIVE : नायक नहीं 'खलनायक' हूं मैं : मंगेश देसाई
SHARES

बॅालिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यापासून बादशाह शाहरुख खानपर्यंत सर्वच नायकांना कधी ना कधी 'खलनायक' साकारण्याचा मोह झाला आहे. आपल्यालाही नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलावंताला वाटत असतं, पण फार कमी कलावंतांकडे अशी संधी येते. जो कलावंत आलेली संधी हेरत 'खलनायक'ही तितक्याच ताकदीनं साकारतो तोच खरा 'नायक' ठरतो. अशीच संधी मराठमोळा अभिनेता मंगेश देसाईकडे आली आणि तो 'खलनायक' बनला.


खलनायक बनण्यामागचं रहस्य

प्रसिद्ध लेखिका नीला सत्यनारायण यांच्या 'ऋण' या सत्यकथेवर आधारित असलेल्या कादंबरीवरील 'जजमेंट' सिनेमात प्रेक्षकांना मंगेश देसाईचं खलनायकी रूप पाहायला मिळेल. शीर्षक जरी इंग्रजी असलं, तरी सिनेमा मात्र मराठी आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन समीर सुर्वेनं केलं आहे. या सिनेमाच्या निमित्तानं 'मुंबई लाईव्ह'शी एक्सक्लुझिव्ह बातचित करताना मंगेशने खलनायक बनण्यामागचं रहस्य उलगडलं. एक जन्म मिळाला आहे, त्यात वेगवेगळे रोल करायचे असल्यानं आजवर 'नायक' साकारल्यानंतर आता 'खलनायक' बनल्याचं मंगेश म्हणाला.

छाया - सचिन हळदे   

 

वास्तववादी परिस्थितीचं भान

मंगेश म्हणाला की, कोणत्याही कलाकाराला चांगल्या भूमिकांची प्रतिक्षा असतेच. मी विनोदी आणि गंभीर अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. या सिनेमाबाबत समीरने जेव्हा मला विचारलं, तेव्हा मी खूप खूश झालो. कोणीतरी आपल्यात खलनायकही पाहिला आहे याचा मला आनंद झाला. मग पूर्ण ताकदीनिशी ही भूमिका साकारण्याचं ठरवलं. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्यानं त्यात अतिरीक्त काही अॅड करता येणार नसल्यानं वास्तववादी परिस्थितीचं भान राखून सर्व गोष्टी करायच्या होत्या. समीरनं त्या सर्व अगदी नेटकेपणानं केल्या आहेत.


ज्येष्ठ नाटककाराचं जेश्चर 

या सिनेमातील निगेटिव्ह भूमिकेसाठी मंगेशनं काहीशी वेगळीच शैली वापरल्याचं टीझर पाहिल्यावर लक्षात येतं. याबाबत नाव न लिहिण्याच्या अटीवर मंगेश म्हणाला की, मराठी रंगभूमीवर थोर नाट्यकर्मी आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. मी यापैकीच एका ज्येष्ठ नाटककाराचं जेश्चर पकडलं आणि या सिनेमातील निगेटीव्ह भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. खरं तर ज्यांच्या शैलीचा मी आधार घेतला ते थोर नाट्यकर्मी आहेत. ते या कॅरेक्टरसारखे निगेटीव्ह नव्हे, तर पॅाझिटीव्ह आहेत. त्यांचं पाहणं, वागणं, बोलणं, व्यक्त होण्याची शैली या कॅरेक्टरला शोभणारी वाटली म्हणून त्याचा वापर केला.


अग्निवेष साटम 

'जजमेंट'मधील आपल्या खलनायकी भूमिकेबाबत मंगेश म्हणाला की, हे ६० वर्षांचं कॅरेक्टर आहे. त्यामुळे मी सांगितलं त्याप्रमाणे 'त्या' सरांच्या आताच्या वयातील सवयी आत्मसात केल्या. ते खूप स्ट्रीक आहेत आणि ते पटकन लाऊड होतात. त्यांचं हेच जेश्चर पकडलं. काहीसे वाकलेले, मागे वळताना वेगळा लुक देणारे असं सारं त्यात आणलं आहे. त्यांची शैली या कॅरेक्टरला योग्य 'जज' करून आपलं 'जजमेंट' देऊ शकेल असं वाटलं. मी साकारलेल्या व्यक्तिरेखेचं नाव अग्निवेष साटम आहे.


वेगळ्या धाटणीच्या भूमिका

मंगेशने यापूर्वी बऱ्याचदा वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्यात विजू माने दिग्दर्शित 'खेळ मांडला' या सिनेमातील दासू लक्षात राहतो. 'जजमेंट'मधील अग्निवेषची तुलना दासूशी होऊ शकत नाही असं स्पष्टपणे सांगत मंगेश म्हणाला की, दासू गरीब होता, पण कनवाळू, दयाळू होता. हा तसा नाही हा क्रुएल आहे. स्त्रीयांविषयी यांच्या मनात भयंकर राग आहे. भूतकाळात बहिणीकडून झालेल्या एका चुकीमुळे याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळं तो राग पत्नीवरही काढतो. यासाठी तो कुठल्याही लेव्हलला जाऊ शकतो. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न करतो. दुसरी पत्नी त्याला अपेक्षित असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करते, पण तरीही तो तिला धाकात ठेवण्याचा प्रयत्न करतो. स्त्री चांगली नाहीच, हा माईंड सेट झाल्याने तो क्रुएल होतो. खरं तर हा आयएएस अधिकारी आहे. याच्याकडून न्यायाची अपेक्षा असते, पण हा अपोझीट आहे.


'क्राइम पेट्रोल'मध्ये सूत्रधार

'जजमेंट'मध्ये  मंगेशच्या जोडीला तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये ,महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत. या सिनेमाची निर्मिती डॅा. प्रल्हाद खंदारे यांनी केली असून, हर्ष कृष्णात्रेय या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. या सिनेमांखेरीज मंगेश सध्या छोट्या पडद्यावर 'क्राइम पेट्रोल'मध्ये सूत्रधाराची भूमिका साकारतो आहे. त्याचा 'लाल बत्ती' हा मराठी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे, तर एका महत्त्वपूर्ण सिनेमाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे.



हेही वाचा -

'कपिल शर्मा शो'मधून सिद्धूंची हकालपट्टी

Movie Review : गोपाळरावांची जिद्द अन् आनंदीबाईंचा ध्यास



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा