Advertisement

'हे राम...नथुराम'ला पूर्णविराम, वादळ होणार शांत!


'हे राम...नथुराम'ला पूर्णविराम, वादळ होणार शांत!
SHARES

सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं 'हे राम...नथुराम' हे वादळ आता शांत होणार आहे. कारण यापुढे हे नाटक करणार नसल्याचा निर्णय अभिनेते शरद पोंक्षे यांनी घेतलाय. आपल्या फेसबुक अकाऊंटवरून त्यांनी ही माहिती प्रेक्षकांना दिली आहे. येत्या महिन्याभरात 'हे राम...नथुराम' या नाटकाचे १० शो महाराष्ट्रभर होणार असून मार्चच्या पहिल्या आठवड्यातच या नाटकाला पूर्ण विराम मिळणार आहे.

शरद पोंक्षे यांचा 'मी नथुराम गोडसे बोलतोय' आणि 'हे राम नथुराम' या दोन्ही नाटकांबरोबरचा हा २० वर्षांचा प्रवास आता संपणार आहे. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' आणि 'हे राम नथुराम' ही नाटकं गेल्या २० वर्षांपासून अविरतपणे सुरू आहेत. आता नथुरामने अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे प्रेक्षकांनाही प्रश्न पडला आहे. मात्र, प्रेक्षकांना पडलेल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शरद पोंक्षे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहेत.



काय म्हणाले शरद पोंक्षे?

'कोणत्याही कलाकृतीची एक थांबायची वेळ ठरलेली असते. एखादी कलाकृती जीर्ण होईपर्यंत वाट बघू नये. ती टवटवीत ताजी आणि लोकांना हवीहवीशी वाटत असतानाच थांबवण्यात मजा आहे. या भूमिकेनं सर्वांना आनंदच दिलाय. ज्यांनी पाहिलं त्यांना आनंदच मिळाला. नाहीतर २० वर्षे ही भूमिका मी करूच शकलो नसतो. आता हे नाटक बंद केल्यामुळेही कित्येकांना आनंदच मिळणार आहे. त्यातही मला आनंदच आहे. तेव्हा ही आनंददायी भूमिका, हे नाटक हे राम नथुराम. याला मी पूर्ण विराम देत आहे. पुन्हा या भूमिकेत मी तुम्हाला दिसणार नाही.’

याचबरोर ज्या प्रेक्षकांनी आजपर्यंत हे नाटक बघितलेलं नाही, त्या प्रेक्षकांना शरद पोंक्षे यांनी पुढील १० प्रयोगांसाठी आमंत्रणही दिलं आहे.

'ज्यांना कुणाला हे नाटक बघायचं असेल, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. खास आपल्यासाठी शेवटचे १० प्रयोग करत आहे. त्यानंतर मी नथुरामची भूमिका परत करणार नाही. लोकाग्रहास्तव असं लेबल लाऊनही नाही'.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा