Advertisement

गोट्यांचा खेळ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न

अद्याप सर्वसामान्यांचा खेळ समजला जाणाऱ्या गोट्यांच्या खेळावर कोणीही कधीही सिनेमा बनवलेला नाही. शीर्षकावरून हा सिनेमा केवळ एखाद्या मुलाची गोष्ट सांगणारा वाटत असला तरी सिनेमा मात्र त्या मुलासोबत गोट्यांच्या खेळाचीही कथा सांगतो.

गोट्यांचा खेळ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न
SHARES

आजवर खेळांवर आधारित असलेले बरेच सिनेमे बनले आहेत. यात क्रिकेटपासून हॅाकीपर्यंत आणि बॅाक्सिंगपासून धावण्यापर्यंत बऱ्याच खेळांचा समावेश आहे. पण अद्याप सर्वसामान्यांचा खेळ समजला जाणाऱ्या गोट्यांच्या खेळावर कोणीही कधीही सिनेमा बनवलेला नाही. त्यामुळे गोट्या या सिनेमात नेमकं काय पाहायला मिळणार, याबाबत कुतूहल होतं. शीर्षकावरून हा सिनेमा केवळ एखाद्या मुलाची गोष्ट सांगणारा वाटत असला तरी सिनेमा मात्र त्या मुलासोबत गोट्यांच्या खेळाचीही कथा सांगतो.

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या भगवान पाचोरे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत गोट्यांच्या खेळावर आधारित सिनेमा बनवण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी सिनेमाची पटकथा आणि संवादलेखन केलं. त्यात एका गावातील मुलाच्या अनुषंगाने गोट्यांचा डाव मांडला. लाल मातीत खेळला जाणारा हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचू शकतो, याचं चित्रीकरण करताना बऱ्याच गोष्टींची उणीव राहिल्यानं सिनेमा तितकासा प्रभावी बनू शकलेला नाही.


एका गावात राहणारा गोट्या (ऋषिकेश वानखेडे) नावाचा मुलगा आणि त्याचं गोट्या या खेळाविषयीचं प्रेम दाखवणारी ही कथा आहे. बाजीबा (कमलाकर सातपुते) आणि बायजा (सुरेखा कुडची) हे गोट्याचे आई-वडील. गोट्यानं शिकून मोठं व्हावं अशी त्यांची इच्छा, पण गोट्या मात्र गोट्या खेळण्यात रमलेला. गोट्याच्या शाळेतील विशाल सर (राजेश श्रृंगारपुरे) हे खेळाचे शिक्षक असतात. त्यांची शिकवण्याची शैली गोट्याला आवडत असते. त्यामुळे तो विशाल सरांना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोट्यांचा खेळ शिकवायला सांगतो. सुरुवातीला हे शक्य नसल्याचं उत्तर ते देतात, पण नंतर बऱ्याच घडामोडी घडतात. प्रा. गारगोटेही (आनंद इंगळे) प्रयत्न करतात. थेट दिल्लीत जाऊन चर्चा करतात. त्यानंतर खरोखर शाळेत गोट्यांचा डाव मांडला जातो.

आजच्या पिढीतील मुलांना गोट्यांचा खेळ काय आहे हे ठाऊक नाही. त्यांच्यापर्यंत हा खेळ पोहोचावा आणि पुनरुज्जीवित व्हावा, यासाठी पाचोरे यांनी मोठ्या पडद्यावर गोट्यांचा डाव मांडला आहे. हे सर्व करताना पटकथेतील मांडणी, दिग्दर्शनातील ढिलाई आणि सिनेमाची गती यांचा अचूक ताळमेळ साधता न आल्यानं एक प्रभावहीन प्रयत्न पडद्यावर पाहायला मिळतो. गोट्यांच्या डावातील कालबाह्य झालेले शब्द या सिनेमात पुन्हा ऐकताना बालपणीची आठवण होते. गोट्यांचा डाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी केलेली विविध राऊंड्सची रचनाही रोमांचक आहे.


सिनेमा सुरू झाल्यापासून मंद गतीने पुढे सरकतो. मध्यंतरानंतर थोडी गती मिळते, पण क्लायमॅक्सपूर्वी पुन्हा ताणला गेल्याने गोट्यांच्या खेळाचा हा प्रवास कंटाळवाणा वाटू लागतो. संकलनातील ढिसाळपणाही याला जबाबदार आहे. सिनेमातील गाणी चांगली झाली आहेत. कॅमेरावर्क आणि कॅास्च्यूम या गोष्टीही चांगल्या जमून आल्या आहेत.

अभिनयाबाबत बोलायचं तर प्रथमच कॅमेरा फेस करणाऱ्या ऋषिकेश वानखेडेने शीर्षक भूमिकेत चांगलं काम केलं आहे. राजेश श्रृंगारपुरेने नेहमीच्याच भारदस्त शैलीत गोट्यांचा प्रशिक्षक साकारला आहे. शरद सांखला यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. त्यांनीही चांगलं काम केलं आहे. कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, शशांक दरणे यांनीही लहान भूमिकांमध्येही रंग भरले आहेत.

गोट्यांचा हा खेळ तितकासा प्रभावी झाला नसला तरी गोट्या या खेळाच्या डॅाक्युमेंटेशनच्या रूपात या सिनेमाकडं पाहता येईल. आजच्या किंवा भावी पिढीला गोट्यांचा खेळ कसा खेळला जात होता, निदान हे तरी या सिनेमामुळे समजेल.

दर्जा : ** 

--------------------------------

निर्माते : जय केतनभाई सोमैया

लेखन आणि दिग्दर्शन : भगवान वसंतराव पाचोरे

कलाकार : ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, शशांक दरणे, शरद सांखला


हेही वाचा -

चांगलं-वाईट समजण्याच्या वयातील ‘यंग्राड’ मुलांची गोष्ट

राजेश श्रृंगारपुरे खेळणार अाता गोट्या



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा