आयफोनवर शूट होणार सई-वैभवचा ‘पाँडीचेरी’


SHARE

मागील काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये ताळमेळ साधत करियर करणारी सई ताम्हणकर सध्या ‘पाँडीचेरी’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूर्णत: आयफोनवर शूट होणाऱ्या या सिनेमात प्रथमच ती वैभव तत्त्ववादीसोबत झळकणार आहे.


पहिलं पोस्टर रिव्हील

‘पाँडीचेरी’ हा दिग्दर्शक सचिन कुंडलकरचा महत्त्वाकांक्षी सिनेमा असल्याचं मानलं जात आहे. या चित्रपटात सचिनने बरेच नवीन प्रयोगही केले आहेत. १ फेब्रुवारीपासून पाँडीचेरीमध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला आहे. चित्रीकरणाचं पहिलं शेड्युल सुरू झाल्याचं औचित्य साधत या सिनेमाचं पहिलं पोस्टरही रिव्हील करण्यात आलं आहे. ज्यात सईचा ब्लॅक एन्ड व्हाइट, नो मेकअप लूक दिसतो आहे.


नो मेकअप नो हेअरस्टाइल

या सिनेमाच्या निमित्ताने वैभवसोबत काम करणारी सई म्हणाली की, आयफोनवर शूट करण्यात येणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. माझ्या भूमिकेचा लूक खूप नॅचरल आहे. मी यात नो-मेकअप, नो-हेअरस्टाइल लूकमध्ये दिसेन. संपूर्ण चित्रपट पाँडीचेरीत चित्रीत होईल. प्रत्येक अभिनेत्रीच्या आयुष्यात असा एक सिनेमा यायला हवा, जिथे तुम्हाला तुमच्या कम्फर्टझोनमधून बाहेर पडून काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळते.


सई-वैभवचा पहिला सिनेमा

सई आणि वैभवचा हा एकत्र पहिलाच सिनेमा असला तरी यापूर्वी सचिनसोबत तिने काम केलं आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सचिनच्या ‘वजनदार’ चित्रपटामध्ये सईने प्रिया बापटसोबत शीर्षक भूमिका साकारली होती. यासाठी तिने जवळजवळ १५ किलो वजनही वाढवलं होतं. ‘पाँडीचेरी’ सिनेमाच्या निमित्ताने हे दोघे तीन वर्षांनी पुन्हा एकत्र आले आहेत.


हेही वाचा -

‘भाडिपा’च्या निशाण्यावर राजकारणी!

आऊटडोअर शूटला सिद्धार्थ-मनवाची धमाल!संबंधित विषय
ताज्या बातम्या