Advertisement

Movie Review- असे पुलं होणे नाही

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'भाई – व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. नवीन वर्षातील हा पहिला बायोपीक असून यात दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी पुलंचा जीवनप्रवास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Movie Review- असे पुलं होणे नाही
SHARES

नवीन वर्ष आलं की वेध लागतात नवीन सिनेमांचे, पण नवीन वर्षातील पहिल्या शुक्रवारी एकही मोठा हिंदी सिनेमा प्रदर्शित होत नाही. याउलट मराठीमध्ये मात्र पहिल्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणं हा शुभशकुन मानला जातो. मागील काही वर्षांपासून झी टाॅकिजने वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा जोपासली होती, पण आता हा मान वायोकाम १८ ने पटकावला आहे. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुल देशपांडे यांच्या जीवनावर आधारित 'भाई – व्यक्ती की वल्ली' हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.


अलौकीक जीवनप्रवास

नवीन वर्षातील हा पहिला बायोपीक असून यात दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी पुलंचा जीवनप्रवास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाची कथा पुलंच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांपासून सुरू होते. पुलंच्या पत्नी सुनीताबाई त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात पोहोचतात. नंतर जसजसं पुलंचे तत्कालीन मित्र, बंधू, सहकाऱ्यांचं आगमन होऊ लागतं, तसतसा सुनीताबाईंच्या आठवणींतून पुलंचा जीवनपट उलगडत जातो.

बालपण, कॅालेजमधील दिवस, पहिलं नाटक, वडिलांचं निधन, वडिलांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी केलेलं पहिलं लग्न, आठवड्याभरात पहिल्या पत्नीचं झालेलं निधन, कॅालेजमधील प्राध्यापकी, सुनीताबाईंची भेट, त्यातून फुलणारं प्रेम, त्यांच्यासोबत लग्न आणि दिग्गजांसोबतच्या मैफली यातून पुलं उलगडत जातात.


भिन्न व्यक्तिमत्वाचे कंगोरे

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी खुमासदार शैलीत या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. गणेश मतकरीने लेखन करताना ती सरळधोपटपणे न लिहिता शेवटापासून सुरूवात करत पुन्हा शेवटापर्यंत नेणारी स्क्रीप्ट लिहिली आहे. पुलं जरी थोर साहित्यिक असले तरी वैयक्तिक जीवनात ते खूपच निरागस आणि भाबडे होते. त्याउलट सुनीताबाई खूपच प्रॅक्टिकल आणि कणखर होत्या. दोघेही दोन ध्रुवांवरचे असले तरी त्यांच्यातील नातं खूप प्रेमळ होतं. सुनीताबाईंनी जेव्हा पुलंशी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी पुलंना त्यांच्या चांगल्या-वाईट गुणांसह स्वीकारलं. म्हणूनच त्यांचं प्रेम शेवटपर्यंत टिकून राहिल्याचं चित्रपट पाहिल्यावर जाणवतं.


सुरूवातीला संथ

चित्रपटाची सुरुवात ट्रेलरमधे दाखवलेल्या उत्कंठावर्धक दृश्यांपासून होते. सुनीताबाईंची एंट्री होईपर्यंत सिनेमा काहीसा संथच वाटतो, पण नंतर जो ट्रॅक पकडतो तो शेवटपर्यंत सोडत नाही. दोघांमधील संवाद आणि प्रसंग पोट धरून हसवणारे आहेत, तर पुलंच्या वडीलांच्या निधनाचं दृश्य भावूक करणारं आहे. प्रसंगानुरूप पुलंच्या जीवनात होणाऱ्या दिग्गज व्यक्तिमत्वांची एंट्री या बायोपीकमध्ये रंगत आणणारी आहे. हा चरित्रपट असल्याने पुलंच्या आयुष्यात जे घडलं त्याचंच प्रामाणिक चित्रण करणारा आहे. त्यामुळे यात अतिरिक्त मनोरंजक मसाल्यासाठी वाव नाही. तशी अपेक्षा करणंही चुकीचं ठरेल.


पुढील भागाबाबत उत्कंठा

हा चित्रपट म्हणजे गीत-संगीताची जणू एक रंगतदार मैफलच आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि पुलंचं रंगलेली मैफल या चित्रपटाचा परमोच्च बिंदू आहे. या परमोच्च बिंदूवरच महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचा शेवट करत पुढील भागाबाबत उत्कंठा वाढवली आहे. याखेरीज पुढील भागात काय पाहायला मिळणार याची झलकही शेवटी आहे. या भागात खासगी जीवनातील पुलं पाहायला मिळाले असले तरी पुढील भागात साहित्यिक विश्वात मुशाफिरी करणारे पुलं दिसणार असल्याचं जाणवतं.


संकलनाचीही जादू

गीत-संगीत ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. समीर म्हात्रेचं पार्श्वसंगीत आणि अजित परबचं संगीत या चित्रपटाचं सौंदर्य अधिक खुलवणारं आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या चेहऱ्यावरील हावभाव बारकाईने टिपणारं कॅमेरावर्क आहे. या चित्रपटातील पुलंच्या पहिल्या लग्नातील हार घालण्याच्या दृश्यात संकलनाचीही जादू पाहायला मिळते. महेश मांजरेकरांनी सर्वांकडूनच उत्तरमरीत्या काम करवून घेतलं आहे. सर्वच पातळीवर स्वत:हून लक्ष देत काम करवून घेतलं असल्यानेच पुन्हा एकदा मांजरेकर शैलीतील चित्रपट पाहायला मिळतो.


दमदार भूमिका

पुलंच्या भूमिकेतील सागर देशमुख आणि सुनीताबाई बनलेल्या इरावती हर्षे यांचा अभिनय या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पाइंट आहे. सागरच्या आजवरच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम अभिनय आहे. इरावतीनेही यापूर्वी बऱ्याच चित्रपटात कामं केलं असलं तरी तिने साकारलेल्या सुनीताबाई दीर्घ काळ स्मरणात राहणाऱ्या आहेत.


याखेरीज ज्येष्ठ सुनीताबाईंच्या भूमिकेत शुभांगी दामले यांनीही सुरेख काम केलं आहे. अश्विनी गिरीने पुन्हा एकदा एक महत्त्वाची व्यक्तिरेखा अतिशय सहजपणे साकारत लक्ष वेधून घेतलं आहे. विद्याधर जोशीने कोकणातील आण्णा कर्वे म्हणजेच अंतू बर्वा अतिशय वेगळ्या ढंगात वठवला आहे. या जोडीला मृणाल देशपांडे, सचिन खेडेकर, स्वानंद किरकिरे, अजय पूरकर, पद्मनाभ बिंड, वीणा जामकर आदी सर्वच कलाकारांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं आहे.


आपण महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाचा बायोपीक करत असून त्यासाठी १०० टक्के योगदान दिलं पाहिजे या जाणीवेतून सर्वांनीच काम केलं आहे. त्यामुळे हा सिनेमा म्हणजे पुलंच्या जीवनावर आधारित असलेली एक मैफलच बनला आहे. या मैफीलीचा आनंद प्रत्येकाने घ्यायलाच हवा. या चित्रपटाच्या शेवटी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखातील 'असे पुलं होणे नाही' हे वाक्य या चित्रपटासाठीही तंतोतंत लागू पडतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

दर्जा: ***१/२ 
.........................................................

निर्माते: महेश मांजरेकर, अविनाश आहले, वैभव पंडीत, महेश पटेल, विरेंद्र उपाध्ये

पटकथा: गणेश मतकरी

दिग्दर्शक: महेश मांजरेकर

कलाकार: सागर देशमुख, इरावती हर्षे, सचिन खेडेकर, सतीश आळेकर, विजय केंकरे, शुभांगी दामले, सक्षम कुलकर्णी, सतिश आळेकर, जयंत देशपांडे, सुनील बर्वे, अक्षय देशपांडे, अश्विनी गिरी, मृण्मयी देशपांडे, किरण यज्ञोपवित, सुनील रानडे, प्रभाकर मोरे, पद्मनाभ बिंड, अजय पूरकर, सारंग साठे, स्वानंद किरकिरे, गणेश यादव, राजन भिसे, सुजय डहाके, ऋषिकेश जोशी, उमेश जगताप, सागर कारंडे, सुहृद वराडकर



हेही वाचा-

'नशीबवान' भाऊची 'भिरभिरती नजर...'

चाॅकलेट बाॅय बनला अंडरवर्ल्ड डॉन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा