Advertisement

मूठभर ‘स्वप्न’ आणि ‘ट्रकभर’ पसारा!

मुंबईत आपलं स्वत: चं हक्काचं घर असावं... फ्लॅट नाही तर निदान झोपडं तरी असावं... अशा आशयावरचा सिनेमा तसा नवीन नाही, पण प्रत्येक सिनेमा काहीतरी वेगळं देऊन जातो. त्याप्रमाणे या सिनेमातही काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. प्रमोद पवारांसारखा दिग्गज अभिनेता जेव्हा एखादा विषय घेऊन दिग्दर्शनाकडे वळतो, तेव्हा त्याबाबत उत्सुकताही होतीच, पण हा सिनेमा मात्र या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा ठरत नाही.

मूठभर ‘स्वप्न’ आणि ‘ट्रकभर’ पसारा!
SHARES

काही सिनेमे वास्तवाचं दर्शन घडवतानाच मनोरंजन करण्याचंही काम करतात. आजवर केवळ अभिनय करणाऱ्या अभिनेते प्रमोद पवार यांनी जेव्हा दिग्दर्शकडे वळण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अशाच प्रकारचा सिनेमा बनवण्याचा निर्णय घेत सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरावा अशी कथा निवडली. पहिला प्रयत्न असूनही पवार यांनी दिग्दर्शनाची बाजू बऱ्यापैकी सांभाळली असली तरी पसारा खूप वाढवल्याने या सिनेमाची अवस्था मूठभर ‘स्वप्न’ आणि ‘ट्रकभर’ पसारा अशी वाटते.

खरं तर मुंबईत आपलं स्वत: चं हक्काचं घर असावं... फ्लॅट नाही तर निदान झोपडं तरी असावं... अशा आशयावरचा सिनेमा तसा नवीन नाही, पण प्रत्येक सिनेमा काहीतरी वेगळं देऊन जातो. त्याप्रमाणे या सिनेमातही काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. प्रमोद पवारांसारखा दिग्गज अभिनेता जेव्हा एखादा विषय घेऊन दिग्दर्शनाकडे वळतो, तेव्हा त्याबाबत उत्सुकताही होतीच, पण हा सिनेमा मात्र या सर्व अपेक्षा पूर्ण करणारा ठरत नाही.


'अशी' आहे कथा?

सिनेमाची कथा झोपडपट्टीत राहणारा टॅक्सी ड्रायव्हर राजा कदम (मकरंद देशपांडे) आणि राणी (क्रांती रेडकर) यांच्या कुटुंबाची आहे. यांना काजल (आदिती पोहनकर) आणि सनी (साहिल गिलबिले) अशी दोन मुलं आहेत. साहिल अभ्यासात हुषार, तर काजल नृत्यात तरबेज आहे. मूळचा कोकणात राहणारा राजा शिमगोत्सवासाठी सहकुटुंब आपल्या गावी जातो. तिथे राजाचा धाकटा भाऊ सहजपणे त्याला खुराड्यात राहतोस असं म्हणतो.

त्यावरून हट्टाला पेटलेला राजा आपल्या छोट्याशा झोपड्याची उंची वाढवण्याचा निर्णय घेतो. घराचं काॅन्ट्रॅक्ट तो झोपडीतील दादा आरके (मुकेश ऋषी) याला देतो. घर मोठं करण्यासाठी राजा आणि राणी या दोघांना किती संकटांना सामोरं जावं लागतं‌? आईवडीलांची धडपड पाहून काजलही वेगळ्या मार्गाने पैसे कमवते. अखेर त्यांचं स्वप्न साकार होतं का? या प्रश्नांची उत्तरं या सिनेमात आहेत.



गती संथ

सिनेमाच्या कथेचा जीव फार मोठा नाही. असं असलं तरी पटकथा लिहिताना प्रवीण तरडे यांनी मेलोड्रामा पद्धतीने त्याचा पसारा वाढला आहे. मुळात मोठ्या लांबीचा सिनेमा बनण्याऐवजी तो कमी वेळात बरंच काही सांगणारा असायला हवा होता. सुरुवातीपासूनच सिनेमाची गती संथ असल्याने स्वप्नांचा हा प्रवास काहीसा कंटाळवाणा होतो. एकाच मुद्द्यावरील मोठमोठे सीन उगाचच लांबवण्यात आले आहेत. त्यांना कैची लावण्याची गरज होती.


मार्मिक संवाद

राणीची मैत्रीण असणाऱ्या ज्योतीच्या भूमिकेतील स्मिता तांबेच्या वाट्याला काही मार्मिक संवाद आले आहेत. ‘मी शेतकरी म्हणून जन्माला आलो, पण शेतकरी म्हणून मरायचं नाही मला’ असं म्हणणारा राजा वास्तवात मात्र काही विशेष धडपड करताना दिसत नाही. यातील काही इमोशनल दृश्ये चांगली झाली आहेत, जी आणखी प्रभावी होण्याची गरज होती.

झोपडपट्टीतील दादा, त्याची वस्तीतील स्त्रियांवर असलेली वाकडी नजर, मदत करण्याच्या बहाण्याने त्याने केलेले अश्लील चाळे हे सर्व आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये आलं आहे. राजा हे व्यक्तिमत्व प्रमाणिक आहे, परंतु वाजवीपेक्षा जास्तच भाबडं दाखवलं आहे. राणी जिथे काम करते त्या मालकिणीचं तिला गरजेपेक्षा जास्त हिडीसपीडीस करणं, जेसीबी घेऊन पोलिसांच्या ताफ्यासह झोपड्या तोडायला आलेल्या पालिका अधिकाऱ्यांचं बऱ्याचदा तसंच माघारी जाणं, राजाच्या वडिलांचं ओढूनताणून गावठी बोलणं काहीसं खाटकतं.



श्रवणीय गीते

श्रेयस आंगणे या तरुण संगीतकाराने लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी चांगली झाली आहेत. मुंबईच्या गाण्यासोबतच ‘लुकलुकले स्वप्न मनाशी...’, ‘अंत का रे देवा तू पाहशी आता...’ ही गाणी सिनेमा संपला तरी स्मरणात राहतात. कॅमेरा वर्कसोबतच इतर तांत्रिक बाबीही सामान्यच आहेत.


भूमिकेत कृत्रिमपणा

मुख्य भूमिकेत असलेल्या मकरंद देशपांडेने आपल्या परीने चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही सिनेमातील राजा कदम न वाटता मकरंद देशपांडेच वाटतो. अवास्तव भाबडेपणा आणि बोलण्यातील कृत्रिमपणा यामुळे राजा ही व्यक्तिरेखा कुठेही मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एखाद्या ड्रायव्हरशी मिळतीजुळती वाटत नाही.


वास्तववादी रंग

याउलट क्रांती रेडकर आणि स्मिता तांबे यांनी सुरेख काम करत आपापल्या व्यक्तिरेखांमध्ये वास्तववादी रंग भरले आहेत. त्या जोडीला आदिती पोहनकरचं कामही चांगलं झालं आहे. मकरंद देशपांडेच्या वडिलांच्या भूमिकेत विजय कदम शोभत नाहीत. त्यांची बोलीभाषा देखील व्यक्तिरेखेशी जुळत नाही. मुकेश ऋषी यांनी पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या शैलीत खलनायक साकारला आहे. मनोज जोशी यांनी काहीसं गूढ असलेलं व्यक्तिमत्व चांगल्याप्रकारे रंगवलं आहे.

स्वप्नांचा हा प्रवास जसा सिनेमातील राजाचा आहे, तसाच तो दिग्दर्शक बनलेल्या प्रमोद पवार यांचाही आहे. स्वप्नांच्या वाटेवरील हा प्रवास दोघांसाठीही बिकटच ठरला आहे असं सिनेमा पाहिल्यावर म्हणावंसं वाटतं. त्यामुळे फार अपेक्षा न बाळगता गेलात तर या सिनेमात मनोरंजनाचे काही क्षण गवसतीलही.

दर्जा : **१/२

.........................................

सिनेमा: ट्रकभर स्वप्न

निर्माते: मीना चंद्कांत देसाई, नयना देसाई

पटकथा आणि संवाद: प्रवीण तरडे

दिग्दर्शक: प्रमोद पवार

कलाकार: मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, आदिती पोहनकर, मुकेश ऋषी, मनोज जोशी, स्मिता तांबे, विजय कदम, आशा शेलार, सुरेश भागवत, साहिल गिलबिले



हेही वाचा-

येतोय ‘अगडबम’चा सिक्वेल

‘काळजात घंटी’ वाजवणारं सुव्रत-प्राजक्ताचं गाणं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा