Movie Review : मनी, पॅावर आणि माईंडगेमचा गूढ प्रवास

'डोंबिवली फास्ट' मध्येही एका कॅामन मॅनचीच कथा होती, मात्र त्याचा पुढील भाग असलेल्या 'डोंबिवली रिटर्न'मधील सामान्य माणसाच्या कथेचा ग्राफ खूपच वेगळा आहे.

  • Movie Review : मनी, पॅावर आणि माईंडगेमचा गूढ प्रवास
  • Movie Review : मनी, पॅावर आणि माईंडगेमचा गूढ प्रवास
  • Movie Review : मनी, पॅावर आणि माईंडगेमचा गूढ प्रवास
  • Movie Review : मनी, पॅावर आणि माईंडगेमचा गूढ प्रवास
  • Movie Review : मनी, पॅावर आणि माईंडगेमचा गूढ प्रवास
SHARE

आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये सामान्य माणसाची कथा आणि त्याच्या स्वप्नांची सांगड घालण्यात आली आहे. या सिनेमाची कथाही एका सामान्य माणसाभोवती गुंफण्यात आली असली तरी यात प्रामाणिकपणा आणि वैचारीक दृष्टिकोन मुख्यत्वानं अधोरेखित करण्यात आला आहे. 'डोंबिवली फास्ट' मध्येही एका कॅामन मॅनचीच कथा होती, मात्र त्याचा पुढील भाग असलेल्या 'डोंबिवली रिटर्न'मधील सामान्य माणसाच्या कथेचा ग्राफ खूपच वेगळा आहे.


कथानकातील गूढ

सिनेमाचं लेखन करणाऱ्या महेंद्र तेरेदेसाई यांनीच दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळल्यानं कागदावर उतरवलेलं पडद्यावर रेखाटणं सोपं गेलं आहे. कागदावर कथा उतरवताना जे त्यांच्या मनात होतं, तेच त्यांनी पडद्यावरही रेखाटलं आहे. या जोडीला संदिप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव या कसलेल्या कलाकारांचा अभिनय या कथानकातील गूढ अधिकच गडद करत विचार करायला भाग पाडतं. या सिनेमातही बऱ्याच त्रुटी आहेत, पण कथेची मांडणी आणि सादरीकरणातील वेगळेपण आकर्षित करतं.


भयंकर घटनेचा उलगडा

सिनेमाची कथा अनंत वेलणकर (संदिप कुलकर्णी) आणि त्याची पत्नी उज्ज्वला (राजेश्वरी सचदेव) यांच्या कुटुंबाची आहे. डोंबिवलीत राहणारा वेलणकर मंत्रालयात जनसंपर्क विभागात नोकरीला असतो. त्या जोडीला त्याला फोटोग्राफी करण्याचाही छंद असतो. एका मित्रासाठी (ऋषिकेश जोशी) फोटोग्राफी करणाऱ्या वेलणकरला गोविंदा उत्सवाचे काढलेले फोटो पाहताना एका भयंकर घटनेचा उलगडा होतो. राजकारणातील मोठं प्रस्थ असणाऱ्या दादासाहेबांना वेलणकर खूप मानत असतो. त्या फोटोमध्ये दादासाहेबांसमोर एका व्यक्तीची हत्या केली जात असल्याचं तो पाहतो. दादासाहेबांना तुरुंगात नेणारा हा पुरावा घेऊन वेलणकर त्यांना भेटतो. ते त्याला वाट्टेल तितक्या पैशांची अॅाफर देतात, पण वेलणकर ती नाकारतो. त्यानंतर वेलणकरच्या बाबतीत बऱ्याच गूढ घटना घडतात.


भ्रष्टाचाराविरोधी लढा

या घटनांच्या माध्यमातून वेलणकर एक-एक पायरी चढत मनी आणि पॅावरच्या दिशेने वाटचाल करू लागतो. या मार्गात त्याला बरेच जण मदत करतात. ते त्याला का आणि कोणाच्या सांगण्यावरून मदत करतात? तेच या सिनेमाचं गूढ आहे. पैसे आल्यावर वेलणकरला वाईट छंद लागतात. मग भ्रष्टाचाराविरोधी लढा उभारण्यासाठी तो एक वेगळंच पाऊल उचलतो. त्याच्या परिणामांची एक झलक पाहताच तो भानावर येतो आणि आपली चूक सुधारत दादासाहेबांच्या प्रकरणाचा कसा छडा लावतो ते पाहण्याजोगं आहे.


व्यक्तिरेखांचा उलगडा नाही

महेंद्र तेरेदेसाई यांनी 'डोंबिवली रिटर्न'ची कथा एक वेगळी ट्रीटमेंट देत सादर केली आहे. गूढ कथांमध्ये आपण जे डोळ्यांनी पाहतो ते कित्येकदा खरं आहे की खोटं याचा संभ्रम पडतो. संभ्रमाचा हा गुंता अखेरीस धाग्याचं एक टोक ओढलं की क्षणार्धात सुटतो. या सिनेमाच्या बाबतीतही तेच घडतं. सिनेमा सुरू झाल्यानंतर थोड्या वेळातच हा गुंता अधिकाधिक गुंतत जातो आणि शेवटी सर्व गोष्टींचा उलगडा होता. त्यामुळेच या सिनेमाची सुरुवात म्हणजेच सुरुवातीला असलेलं 'गोविंदा...' हे गाणं चुकवाल तर 'डोंबिवली रिटर्न'ची लोकल पकडणं मुश्किल होईल. या प्रवासात वेलणकरच्या आयुष्यात गूढपणे वावरणाऱ्या काही व्यक्तिरेखांचा उलगडा मात्र होतच नाही.


गती खूप संथ

अशा कथांसाठी वेग खूप महत्वाचा असतो. सिनेमा सुरू झाल्यावर थोडा वेळ सिनेमाची गती खूप संथ वाटते. नंतर हळूहळू अपेक्षित वेगासह या लोकलचा पुढील प्रवास सुरू होतो. पडद्यावर जे घडतंय ते खरं की खोटं त्याचा उलगडा होण्यासाठी अखेरच्या दृश्यापर्यंत वाट पाहावी लागते. यात स्वप्नवत उभं राहणारं वेलणकरचं साम्राज्य, काही गूढ व्यक्तींचा सिनेमातील वावर, अडचणीच्या वेळी मित्राला मदत न करणं, कुटुंबातील अपघात, त्याचा होणारा मानसिक परिणाम, पैशांची पॅावर आल्यावर त्याला सुचलेला शहाणपणा आणि त्यातून सहिसलामत बाहेर पडत वेलणकरनं पार पाडलेलं एका सजग नागरिकाचं कर्तव्य या सर्व गोष्टी आहेत.


राजकारण्यांशी वैर नको

हा या सिनेमातील सर्वात मोठा प्लस पॅाइंट आहे. राजकारण्यांशी वैर नको असं म्हणत घडलेल्या एखाद्या गुन्ह्यामधील सत्य लपवणं चुकीचं आहे. सत्य उघडकीस आणण्याचं काम प्रत्येक नागरिकानं करायला हवं. स्वत: प्रकाशात न येता सत्य उजेडात आणण्याचे बरेच छुपे मार्ग आहेत याची जाणीव हा सिनेमा करून देतो.


निष्प्रभ गाणी

खरं तर या सिनेमाच्या कथेत गाण्यांची गरज नव्हतीच. त्यामुळं निष्प्रभ वाटणाऱ्या गाण्यांचा समावेश केवळ मनोरंजक मूल्यं वाढवण्यासाठी करण्यात आल्यासारखं वाटतं. केवळ बदललेल्या अनंत वेलणकरमधील झलक दाखवण्यासाठी असलेलं हळदीचं गाणं चांगलं झालं आहे. पार्श्वसंगीतही कथेला साजेसं आहे. यासोबतच कॅमेरावर्कही सुरेख आहे. सिनेमातील काही फ्रेम्स काहीशा वेगळ्या कलरटोनमध्ये दिसतात, ज्या लक्ष वेधून घेत उत्सुकताही वाढवतात. काही तांत्रिक बाबी चांगल्या आहेत, पण संकलनाकडे थोडं लक्ष देण्याची गरज होती. खरं तर ही कथा जगाच्या पाठीवर कुठेही घडणारी आहे. केवळ शीर्षक 'डोंबिवली रिटर्न' असल्याने वेलणकर डोंबिवलीत राहणारा दाखवण्यात आला आहे.


रोमँटिक सीन्स

एका पापभिरू, प्रामाणिक, सज्जन, नीतीमूल्यं जपणारा, नीतीनं जगणारा एक सर्वसामान्य माणूस संदीप कुलकर्णीनं अत्यंत प्रामाणिकपणं साकारला आहे. या सिनेमात संदीपची दोन रूपं पाहायला मिळतात. दोन्ही रूपं त्यानं अतिशय लीलया सादर केली आहेत. त्याला राजेश्वरी सचदेवनं अप्रतिम साथ दिली आहे. दोघांमधील रोमँटिक सीन्सही छान आहेत. या दोघांना वेलणकरच्या भावाच्या भूमिकेत अमोल पराशरनं, तर मुलगी अंतराच्या व्यक्तिरेखेत बालकलाकार त्रिश्निका शिंदेनं चांगली साथ केली आहे. या जोडीला ऋषिकेश जोशीनं आपल्या नेहमीच्या शैलीत मित्राची भूमिका साकारली आहे. सिया पाटीलची भूमिका छोटी आणि ग्लॅमरस आहे, पण तितकीशी प्रभावी नाही.


शेवट चुकवू नका

नीती-अनीती, धर्म-अधर्म, सत्य-असत्य, प्रमाणिकपणा-अप्रामाणिकपणा अशा द्विधा मन:स्थितीत जगणाऱ्या असंख्य सर्वसामान्यांची ही कथा आहे. त्यामुळंच हा सिनेमा सर्वांनी पाहायला हवा. कथानकातील गूढ जाणून घेण्यासाठी सुरुवात व सिनेमाच्या मर्मासोबतच सर्वसामान्यांचं कर्तव्य जाणून घेण्यासाठी शेवट चुकवू नका.

दर्जा : *** 

........................................................................................

निर्माते - संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी

कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन - महेंद्र तेरेदेसाई

कलाकार - संदीप कुलकर्णी, राजेश्वरी सचदेव, हृषीकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्निका शिंदे, सिया पाटीलहेही वाचा -

स्मिता तांबेवर सिनेनिर्मितीचं 'सावट'

स्वप्निलच्या नव्या लुकचा ‘मोगरा फुलला’संबंधित विषय
ताज्या बातम्या