Advertisement

Review: 'मुंबई पुणे मुंबई ३'- प्रसुतीच्या सुखद कळा!

'मुंबई पुणे मुंबई ३' या चित्रपटाचा तिसरा भाग बनवताना त्याने प्रत्येक घरात दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडी जशाच्या तशा रुपेरी पडद्यावर उतरवत पाहणाऱ्याला समोरचं चित्र आपल्याच घरातील वाटेल याची काळजी घेतली आहे.

Review: 'मुंबई पुणे मुंबई ३'- प्रसुतीच्या सुखद कळा!
SHARES

दिग्दर्शक सतीश राजवाडेने २०१० मध्ये नवीन्यपूर्ण प्रयोग करत दोन पात्री चित्रपट बनवला होता. तेव्हा मराठीत लव्ह स्टोरीच्या यशाचं प्रमाण नगण्य होतं. या पार्श्वभूमीवरही या चित्रपटाने भरघोस यश मिळवलं. त्यानंतर दुसऱ्या भागात नायक-नायिकेच्या लग्नाच्या निमित्ताने दोन्ही कुटुंब एकत्र आली आणि प्रेक्षकांना दुसरा भागही खूप भावला. आता 'मुंबई पुणे मुंबई ३'च्या रूपात मराठीत प्रथमच एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात 'मुंबई पुणे मुंबई'च्या नायक-नायिकेच्या म्हणजेच गौतम-गौरीच्या आयुष्यात नवा पाहुणा आल्याचं पाहायला मिळणार आहे.


धाडसाचं काम

या चित्रपटाची मूळ संकल्पनाच नावीन्यपूर्ण पायावर आधारलेली असल्याने त्यावर पुढील भाग बनवणं आणि ते यशस्वीपणे प्रेक्षकांच्या भेटीस आणणं हे मोठं धाडसाचं काम सतीश राजवडे समोर होतं आणि त्याने ते यशस्वीपणे केलं आहे. नवनवीन प्रयोग करत प्रेक्षकांच्या अंतर्मनात डोकाण्याचं धाडस सतीश नेहमीच करत असतो. या चित्रपटाचा तिसरा भाग बनवताना त्याने प्रत्येक घरात दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घडामोडी जशाच्या तशा रुपेरी पडद्यावर उतरवत पाहणाऱ्याला समोरचं चित्र आपल्याच घरातील वाटेल याची काळजी घेतली आहे.


नव्या पाहुण्याचं आगमन

पहिल्या भागात प्रेम आणि दुसऱ्या भागात लग्न झाल्यानंतर तिसऱ्या भागात गौतम-गौरी (स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वे) यांना बाळ होणार आहे. मुंबईची गौरी पुण्यात गेल्यावर पुणेकरांच्या रंगात रंगत ढोल-ताशाच्या पथकात परफॅार्म करताना दिसते. गौतम-गौरीच्या सुखी जीवनात अचानक एका नवीन पाहुण्याची चाहुल लागते. या पाहुण्याची बातमी ऐकून प्रथम गौतमला विश्वासच बसत नाही, पण नंतर याचं आगमन आताच गरजेचं आहे की, काही वर्षांनी यावर विचारविमर्श सुरू होतो.


निर्णयावर ठाम

त्यात दोघांचेही आई-वडील (प्रशांत दामले-मंगल केंकरे, विजय केंकरे-सविता प्रभुणे), आजी (सुहास जोशी)आणि डॅाक्टर मावशी (रोहिणी हट्टंगडी)यांचाही समावेश होतो. अखेर एका क्षणी गौरीला उपरती होते आणि बाळाला जन्म देण्याच्या निर्णयावर ती ठाम राहते. गौतमही नेहमीप्रमाणे तिच्या निर्णयाच्या मागे उभा राहतो, पण मानसिकदृष्ट्या बाळाला जन्म देण्यासाठी तो तयार नसतो. यातच काही घटना घडतात आणि अखेरीस काहीसा टेन्शन देणारा क्लायमॅक्स समोर येतो.


आनंदाचा डोह

'मुंबई पुणे मुंबई' या चित्रपटाची थीम म्हणजे एक आनंदाचा डोह असल्याचं मानलं तर त्या पुढील दोन चित्रपट हे त्यात उठणारे तरंग आहेत असं म्हणावं लागेल. कारण या चित्रपटात पुढील भाग यायलाही वाव आहे. तिसऱ्या भागाबाबत बोलायचं तर दिग्दर्शकाच्या रूपात सतीशने कुठेही घाईही केलेली नाही की दिरंगाईही केलेली नाही. हे आपलं एक खास प्राॅडक्ट असून त्याला खास ट्रीटमेंटच मिळायला हवी या अट्टाहासावर ठाम राहत तिसऱ्या भागाची रचनाही त्याने अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने केली आहे. फार मेलो ड्रामा न करता कोणाच्याही घरात लहान बाळ येणार असल्याची चाहुल लागल्यावर जे वातावरण असतं ते जसंच्या तसं सतीशने पडद्यावर उतरवलं आहे. हेच या चित्रपटाचं यश आहे.


गती थोडी मंदावते

चित्रपट सुरू झाल्यापासून गौतम-गौरीमधील लटकी भांडणं, मिश्किल संवाद आणि काही हास्यास्पद घटनांच्या माध्यमातून कथा आवश्यक त्या गतीत पुढे सरकते. ऐन वेळी मध्यंतर होतं. त्यानंतर कथेची गती थोडी मंदावल्याने किंचित कंटाळा येतो. पण पुढे पुन्हा गतीमान होते. काही प्रसंग उगाच ताणल्यासारखेही वाटतात, तर काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे होतं. त्यामुळे फार विचार करावा लागत नाही. ठराविक अंतराने पेरलेले उत्कंठावर्धक प्रसंग ही या चित्रपटाच्या साध्या सरळ कथेची खासीयत म्हणावी लागेल.


गाणंही खास

नवं रूप लेऊन आलेलं 'गं साजणी...' हे गाणं खासच आहे. त्या जोडीला 'आई तू, बाबा मी...' हे संथ लयीतील गाणंही श्रवणीय आहे. या जोडीला रोमँटिक गाण्यानेही कथेत गुलाबी रंग भरण्याचं काम केलं आहे. जाणूनबुजून केलेल्या विनोदांना या चित्रपटात जागा नाही. सर्वसामान्यांच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्याचंच प्रतिबिंब पडद्यावर उमटवत सतीशने पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचं काम केलं आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सक्षम आहे.


तेच बेअरिंग

आठ वर्षांपूर्वी साकारलेल्या व्यक्तिरेखांचं बेअरिंग पुन्हा पकडून त्या तशाच साकारणं हे मोठं आव्हान स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या समोर होतं. ते त्यांनी लीलया पार पाडलं आहे. गौतमचं हसणं, त्याच्या लकबी, वागणं, बोलणं स्वप्नीलने जसंच्या तसं या चित्रपटात सादर केलं आहे. त्याच्या जोडीला मुक्तानेही काहीशी कन्फ्युज गौरी पुन्हा एकदा यशस्वीपणे साकारली आहे. प्रशांत दामलेंची व्यक्तिरेखा मिश्किल संवादांनी भरलेली असल्याने गंमतीशीर आहे. सुहास जोशींनी मात्र प्रेमळ, तरीही तत्त्वनिष्ठ आजी अचूकपणे वठवली आहे. यांच्या जोडीला विजय केंकरे, मंगल केंकरे, सविता प्रभुणे, रोहिणी हट्टंगडी या कलाकारांनीही आपली कामं चोख बजावली आहेत.

पटकथेतील साधेपणा, दिग्दर्शकाचा प्रामाणिकपणा, संगीतातील गोडवा आणि कलाकारांचा सच्चेपणा ही 'मुंबई पुणे मुंबई' या चित्रपटाच्या मालिकेतील श्रीमंती आहे. या भागातही ती टिकून राहिल्याने 'मुंबई पुणे मुंबई' रूपी आनंदाच्या डोहात उठलेला हा तिसरा आनंदी तरंग पाहायला विसरू नका.

दर्जा : ***१/२
..............................

मराठी चित्रपट- मुंबई पुणे मुंबई ३

दिग्दर्शक- सतीश राजवाडे

कथा- पल्लवी राजवाडे

पटकथा, संवाद- अश्विनी शेंडे, पल्लवी राजवाडे

कलाकार- मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, प्रशांत दामले, विजय केंकरे, मंगल केंकरे, सविता प्रभुणे, सुहास जोशी, रोहिणी हट्टंगडी



हेही वाचा-

स्वप्नील-मुक्ताने ढोल-ताशांच्या तालावर धरला 'गं साजणी...'चा ठेका

प्रिया-उमेशची गोड बातमी काय?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा