Advertisement

लोकांनी आम्हाला विकत घेतलंय : स्वप्नील-मुक्ता


लोकांनी आम्हाला विकत घेतलंय : स्वप्नील-मुक्ता
SHARES

आठ वर्षांपूर्वी अनपेक्षितपणे पुण्यात भेटल्यानंतर विवाहबंधनात अडकलेली गौतम आणि गौरी ही जोडी 'वी आर प्रेग्नंट...' असं म्हणत 'मुंबई पुणे मुंबई ३' या चित्रपटाद्वारे पुन्हा रसिकांच्या भेटीला येत आहे. एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होणं हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक नवा विक्रम आहे. या तिन्ही भागांचं दिग्दर्शन सतीश राजवाडेने केलं असून, स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे ही प्रेक्षकांची लाडकी जोडी मुख्य भूमिकेत आहे. ७ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने स्वप्नील-मुक्ताने 'मुंबई लाइव्ह'शी केलेली एक्सक्लुझीव्ह बातचित...तिसरा भाग येतोय, काय भावना आहेत?

स्वप्नील : ओव्हर हेल्मिंग भावना आहेत. पहिल्या भागाच्या वेळी मराठीत लव्ह स्टोरीचा ट्रेंड नव्हता. हा चित्रपट लव्हस्टोरीच्या पायंड्यालाही छेद देणारा होता. हिरो काय तर अर्ध्या चड्डीतच फिरतोय, हिरोईण नकार द्यायला पुण्याला आलीय, लव्हस्टोरी असून गाणं नाही, दिवसभराची गोष्ट असल्याने कपडे बदलत नाहीत... सो, असं असूनही लोकांनी डोक्यावर घेणं ही फार मोठी गोष्ट आहे. तिथून नंतर दुसरा भाग येणं, जो दोन फॅमिली इंट्रोड्युस करतो. 

त्यावेळी जनरली सिक्वेल चालत नाही, असं लोकं म्हणत होते. दुसरा भाग रिलीजला आला तेव्हा एका बाजूला 'कट्यार काळजात घुसली'सारखा मराठीतला मोठा सिनेमा आणि दुसऱ्या बाजूला हिंदीतल्या महानायकाचा 'प्रेम रतन धन पायो' या दोन बलाढ्य चित्रपटांसमोरही 'मुंबई पुणे मुंबई २'ने तग धरला आणि पहिल्या भागापेक्षाही दस पटीने मोठा झाला. आता तिसरा भाग येतो आहे. हे सगळं स्वप्नवत आहे. परमेश्वराची कृपा आहे.मुक्ता : छान वाटतंय, भरून येतंय. मला सतिशचं यासाठी कौतुक करावंसं वाटतं, कारण हा जरी एका चित्रपटाचा तिसरा भाग असला तरी यातील प्रत्येक भाग स्वतंत्रपणे एक परीपूर्ण चित्रपट आहे. अशा प्रकारचे एकाच धाग्यात गुंफलेले तरीही परीपूर्ण असलेले चित्रपट करणं खूप अवघड काम आहे. आठ वर्षांपूर्वी पहिला भाग आला. त्यावेळी काही मुलं लहान होती असतील. ती तिसरा भाग कदाचित पहिल्यांदा बघतील, पण त्यांना आधीचे दोन भाग माहिती असण्याची तशी गरज नाही.

पुढे ते उत्सुकता म्हणून मागचे भाग बघतीलही. त्यामुळे इतकी परीपूर्ण कलाकृती करणं आणि ती एका साखळीचा भाग असणं हे फार अवघड काम आहे. अशा चित्रपटात भूमिका साकारायला मिळणं आणि तेच आयुष्य पुन: पुन्हा जगायला मिळणं ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.


प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तीन भाग...

स्वप्नील : प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्याच्या खूप प्रतिक्रीया आहेत. दुसऱ्या भागात आमच्या लग्नाचा सिक्वेन्स होता. त्या लग्नाच्या सीनसाठी जे गुरुजी आले होते त्यांना हे शूटिंग सुरू असल्याचं माहीत होतं, असं असूनही त्यांच्या डोक्यात गौतम आणि गौरी हे नवरा-बायको आहेत हे इतकं फिट बसलं होतं की, ते आमच्यासाठी आहेर घेऊन आले होते.

पॅकअप झाल्यावर ते म्हणाले, "कुठे चाललात दोघे. पाया पडा आधी..." मग त्यांनी आम्हाला आहेरही दिला. आम्ही दोघेही त्यावेळी नि:शब्द होतो. ही त्यांची भावना आहे हे आम्ही जाणलं. एक कपल म्हणून गौतम-गौरीच्या इतके प्रेमात पडलेले असंख्य चाहते आम्ही आठ वर्षांमध्ये पाहिले आहेत. हे खोटं आहे हे त्यांना माहीत आहे, पण मान्य करायला ते तयार नाहीत.


मुक्ता : मेल, ट्विट्स किंवा मेसेजेसच्या माध्यमातूनही मला खूप प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्यावरून असं कळतं की, 'मुंबई पुणे मुंबई'सोबत जीवन जगणारी काही जोडपीही या जगात आहेत. म्हणजेच तुम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलात तेव्हा आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. दुसरा पार्ट आला तेव्हा आम्ही लग्न केलं आणि आता माझी बायको प्रेग्नंट आहे. त्यामुळे तुमचे सिनेमे फार छान छान होत राहोत. कारण तुमच्यावर आमचं आयुष्य अवलंबून आहे. हे पाहिल्यावर किती हे रिलेट करत आहेत याचं आश्चर्य वाटतं. त्यांना हे खरं वाटतं. 


...ते मानायलाच तयार नाहीत

स्वप्नील : ते गौतम-गौरीसोबत आपलं वास्तव जीवनही जगत आहेत. हे सर्व कसं सांगू मी? सो, लोकांनी आम्हाला विकत घेतलंय. म्हणजे आम्ही त्यांचे आहोत आता. आम्ही सर्वांना सांगतो की 'मुंबई पुणे मुंबई'मध्ये आम्ही एकदा काम केलं आहे, सतीशने एकदा डिरेक्ट केला आहे, पण प्रेक्षकांनी तो खूप वेळा पाहिला आहे. कोणी पाचशे वेळा पाहिला आहे, तर कोणी हजारवेळा... काय म्हणायचं या प्रेमाला? शब्दच नाहीत. त्यामुळे हा चित्रपट आता आमच्यापेक्षा जास्त त्यांचा आहे.

मुक्ता : प्रेक्षक या जोडीच्या इतके प्रेमात आहेत की, यांचं छान झालं तर आपलं छान होणार आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची जेव्हा अनाऊंसमेंट झाली, तेव्हा स्पेसिफीकली सतीशला मेसेजेस आले की, आम्हाला त्यांचं दु:ख दाखवू नकोस. आम्हाला ते आनंदी हवेत कायम. यापेक्षा मोठं दुसरी काही असू शकत नाही. हे आमच्या संपूर्ण टीमचं भाग्य आहे.


केमिस्ट्रीच्या पलिकडलं रसायन...

स्वप्नील : काय बोलू? मुक्ताबद्दल को-स्टार म्हणून काय सांगू? मला असं वाटतं की, तू म्हणलंस तसं आता ती फेज निघून गेली आहे. आता मुक्ताला मी आणि मला मुक्ताने पूर्णत: अॅक्सेप्ट केलंय. आता हा आयुष्यभर माझ्याबरोबर आहे किंवा आता ही माझ्यासोबत आहे असंच वाटतं. सो, आता आम्ही केमिस्ट्रीच्या पलिकडे गेलो आहोत. आय थिंक आता काही सांगावंही लागत नाही.

आता आम्ही एकमेकांच्या नुसतं स्पेसमध्ये असलो तरी कळतं की याला काय म्हणायचं आहे, किंवा हिला काय सांगायचं आहे. हा काय करणार आहे, किंवा ही काय करणार आहे. ही केमिस्ट्री म्हणजे मी, सतिश आणि मुक्ताच्या बॉडिंगचं बायप्रोडक्ट आहे. याचा मूळ गाभा आॅफस्क्रीनचं बाँडिंग आहे. आता आम्ही एकमेकांची आयुष्य एकमेकांशिवाय इमॅजीन करू शकत नाही. हा जो विश्वास आहे तोच कदाचित लोकांना भावला असेल.

मुक्ता : माझं काहीच वेगळं उत्तर नाही. आम्ही एकमेकांविषयी बोलत नाही. कारण आता आम्ही इतके जास्त एकमेकांच्या जवळ आहोत ना की, काही बोलूच शकत नाही. कारण डोळ्यांच्या जास्त जवळ अक्षरं नेली की वाचता येत नाही थोड्या अंतरावर ठेवावी लागतात. तसंच आमचं काहीसं झालं आहे. आम्ही या चित्रपटात एकमेकांच्या इतक्या जवळ आलो आहोत की हे रसायन नेमकं असं तयार झालं हे आम्हालाही ठाऊक नाही.


आई तू बाबा मी होणार...

स्वप्नील : जसं तू म्हणलंस तसं... डोहाळे जेवण म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर काही अजरामर गाणी येतात. ती निर्विवादपणे मोठीच गाणी आहेत, पण आपण असं काहीतरी करूया का, की तेही लोकांच्या लक्षात राहिल आणि हे ही आपलंसं वाटेल? यासाठी सतीशने कन्सिव्ह केलेलं हे गाणं आहे. त्याच्या बायको पल्लवीने हे गाणं लिहिलं आहे. निलेश मोहरीरचं म्युझीक आहे. इतक्या साध्या सोप्या पद्धतीने शूट केलंय की, ते पाहताक्षणीच लोकांच्या ओठांवर चढतं.

मुक्ता : गाणं जेव्हा आलं तेव्हा ते ज्या झपाट्याने लोकांपर्यंत पोहोचलं ते पाहून आनंद झाला. कारण हे डान्स नंबर नाही, याची चालही उडती नाही, तरीही ते आपल्यातलं वाटतं. हेच या चित्रपटाचं बलस्थान आहे. हा चित्रपट पाहताना आपल्या शेजारच्या घरातलीच ही फॅमिली असल्याचा फील येतो. त्यामुळेच हे गाणंही लगेच उचललं गेलं. यावर काही कमेंट्सही आम्हाला आल्या आहेत. 'आमच्याकडे डोहाळे जेवण आहे. बरं झालं आम्हाला हे गाणं मिळालं'. हे ऐकून छान वाटतं.


विनोदांचे फटाके फुटणार!

मुक्ता : अनरिलीज विनोद सांगणार नाही, पण मी स्वत: काही सीन करताना पोट धरून हसले आहे. पहिल्या टीझरमध्ये आलेला आशा ज्ञाते यांच्या मुखातील 'आता तुमचं काम झालं आहे' असे बरेच विनोदी संवाद चित्रपटात आहेत. पॅापकॅार्न फुटावेत तशी लोकं चित्रपट पाहताना हसून फुटणार आहेत. कारण आम्ही सीन करताना शूट थांबवून हसत होतो. नुसत्या अॅक्शनवरही हसलो आहे. त्यामुळे तयार राहा, एवढंच सांगेन.


स्वप्नील : अॅबसोल्युटली... माझ्यासाठी टीझरमधला 'तुम्ही खा हो काहीपण. तुमचं काम झालं आता...' हा संवाद अक्षरश: फटाका फुटावा तसं हास्य फोडणारा आहे. हल्लीच आम्ही पोलिसांच्या एका इव्हेन्टला गेलो होतो. तिथे या चित्रपटाचा टीझर दाखवण्यात आला. 'तुमचं काम झालं आता...' हे वाक्य जेव्हा आलं तेव्हा एकाच वेळी पाच हजार लोकांचा हास्यकल्लोळ अनुभवला. तिथेच वाटलं, येस... हे पोहोचतंय आता. त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही. अशा खूप गोड मुव्हमेंट्स आहेत, ज्या तुम्हाला खूप आनंद देतील.


तरीही काही सांगायचंय...

मुक्ता : तुम्ही इतक्या विश्वासाने आमच्यावर भरभरून प्रेम करता, असंच कायम करत राहा. कारण या प्रेमामुळेच काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि काहीतरी नवीन प्रयोग करण्यासाठी शक्ती मिळते. हा साधा सोपा आणि नेहमीचा चित्रपट असला तरी यात काही वेगळे प्रयोगही करण्यात आले आहेत. तिसरा भाग येणं हाच मूळात एक एक्सप्रिमेंट आहे. एकाच जोडीची गोष्ट पुढे नेणं. त्यात काही चमत्कृती न घडवणं यासाठी खूप मोठं धाडस लागतं. सतीशच्या कन्व्हिक्शनवर संजय छाब्रिया आणि अमित भानुशाली यांचा विश्वास आहे आणि आमचा तुमच्यावर...

स्वप्नील : फार कमी वेळा असं होतं की, लोकांची इच्छा होते आणि चित्रपट निर्माण होतो. 'मुंबई पुणे मुंबई'च्या बाबतीत असं झालं आहे. लोकांना बघायचं होतं की, यांचं पुढे काय होतं? तिथून त्या कल्पनेने जोर धरला की, याच्या पुढची गोष्ट बनवली पाहिजे. ज्या कलाकृतीवर लोकांनी आमच्यापेक्षा जास्त प्रेम केलं ती जरी आमची असली तरी आता ती आमच्यापेक्षा लोकांची जास्त आहे. या कलाकृतीवर असंच भरभरून प्रेम करत राहा आणि आम्ही तुमच्या मनातले गौतम-गौरीचं आयुष्य तुमच्यासमोर सादर करण्याचं कर्तव्य पार पाडत राहू.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा