Advertisement

अशोक पत्कींच्या संगीताचा नवा जलवा

सुमधूर संगीतासाठी लोकप्रिय असलेल्या ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीताचा अनोखा जलवा लवकरच रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘बकाल’ या आगामी मराठी सिनेमात पत्कींनी आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळं संगीत देत नवा प्रयोग केला आहे.

अशोक पत्कींच्या संगीताचा नवा जलवा
SHARES

सुमधूर संगीतासाठी लोकप्रिय असलेल्या ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीताचा अनोखा जलवा लवकरच रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. ‘बकाल’ या आगामी मराठी सिनेमात पत्कींनी आपल्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळं संगीत देत नवा प्रयोग केला आहे.

पत्की यांनी वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी एक वेगळी वाट चोखाळत समीर आठल्ये दिग्दर्शित आगामी ‘बकाल’ या ॲक्शनपटासाठी एक अनोखा संगीतप्रयोग केला आहे. अवीट गोडीची, सुमधूर चालीची गाणी देणारे पत्की यांनी पाश्चिमात्य शैलीतील संगीत प्रयोग केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी परमस्नेही असलेल्या पत्कींवर सोपवली, पण चित्रपटाचा बाज तरुणाईशी निगडीत असल्यानं आधुनिक पद्धतीचं संगीत निर्माण करावं लागेल, हे ऐकल्यावर पत्कींनी आठल्येंना नकार दिला. तरीही आठल्येंच्या आग्रहाखातर पत्कींनी संगीत दिग्दर्शन जबाबदारी स्वीकारली.

या अनोख्या अनुभवाबाबत पत्की म्हणाले की, मी नेहमीप्रमाणं हार्मोनियमवर गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतरचनांना चाली लावल्या आणि संगीत संयोजक मणी यांना ऐकवल्या. पण, हे संगीत मणी यांच्याही आवाक्याबाहेरचं होतं. त्यामुळं मणी यांचे चिरंजीव सनी या नव्या दमाच्या डीजे स्टाईल संगीत संयोजकाकडून काम करून घेतलं. त्यानंतर मला स्वत:वरच विश्वास बसेना. माझ्या या नव्या प्रयोगावर ज्या पद्धतीनं संगीत संयोजन झालं ते पाहून आठल्येंसकट संपूर्ण टीम अवाक झाली. मी पहिल्यांदाच स्वत:ची चौकट मोडून एक आयटम साँग रचलं आहे. अशा बाजाची गाणी गाणी कधीच न केल्यानं ती करताना भलतंच टेन्शन आलं होतं.

‘बकाल’मधील एकूण पाच गाणी पत्कींनी संगीतबद्ध केली आहेत. नागपूरचे गीतकार सुरेंद्र मसराम आणि संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांनी मारबत विशेष गाणं रचलं आहे. यातील आयटम साँगचं मिक्सिंग यशराज स्टुडीयोच्या विजय दयाल यांनी केलं आहे. सिद्धार्थ महादेवन, अमेय दाते, जसराज जोशी, हृषिकेश रानडे, महालक्ष्मी अय्यर, आदर्श शिंदे, माधुरी करमरकर, जान्हवी अरोरा, कविता राम, प्राजक्ता रानडे, धनश्री देशपांडे, अमृता दहीवेलकर आदी नव्या दमाच्या गायकांनी या गीतांना स्वरसाज चढविला आहे. दिलीप मेस्त्री आणि दीपा मेस्त्री या नृत्य दिग्दर्शकांनी कोरिओग्राफी केली आहे.

या सिनेमाद्वारे चैतन्य मेस्त्री आणि जुई बेंडखळे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्यांच्या सोबत गणेश यादव, यतीन कार्येकर, पूजा नायक, मिलिंद गवळी आदी कलाकार आहेत. राजकुमार मेन्डा निर्मित शिव ओम व्हिज्युअल्स प्रा. लि. प्रस्तुत ‘बकाल’ ८ नोव्हेबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.हेही वाचा -

तेजस्विनीमागोमाग कश्मिराची नवरात्र रूपं पाहिली का?

स्वराज्यातील स्त्रीशक्ती शत्रूला देणार 'फत्तेशिकस्त'
संबंधित विषय
Advertisement