Advertisement

'आनंदी गोपाळ'मध्ये भेटणार भारतातील पहिल्या महिला डॉक्टर


'आनंदी गोपाळ'मध्ये भेटणार भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
SHARES

आजच्या बायोपीकच्या युगात आणखी एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हे एेतिहासिक व्यक्तिमत्व आहे भारतातील पहिल्या महिला डाॅक्टर आनंदी जोशी यांचं. 'आनंदी गोपाळ' या सिनेमाच्या माध्यमातून आनंदी जोशी यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. अशा या 'आनंदी गोपाळ' सिनेमाचा संगीत प्रकाश सोहळा नुकताच संपन्न झाला.


ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, पण इतिहास घडवणाऱ्या काही स्त्रियांच्या मागेही पुरुष खंबीरपणे उभे राहिल्याचं मागे वळून पाहिल्यावर लक्षात येतं. प्रत्येक यशस्वी स्त्रीसोबत तिला प्रोत्साहन देणारा 'तो' असतोच! अशाच एका ध्येयवेड्या जोडप्याची गोष्ट 'आनंदी गोपाळ'मध्ये आहे. काही जोडपी आपल्या ध्येयपूर्तीसाठी वेगळी वाट निवडतात आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नवीन पाऊलवाट मोकळी करतात. 'आनंदी' आणि 'गोपाळ' हे देखील असंच एक जोडपं आहे. समीर विद्वांसच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमाची प्रस्तुती झी स्टुडिओज् करत आहे. या सिनेमाचं संगीत आता प्रेक्षकांसाठी खुलं झालं आहे.


भारावून टाकणारं संगीत

'आनंदी गोपाळ' चित्रपटामध्ये ऋषिकेश-सौरभ-जसराज या त्रिकूटाच्या संगीतानं सजलेली पाच गाणी आहेत 'रंग माळियेला...' हे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच गाजत आहे. याशिवाय 'आनंद घना...' आणि 'तू आहेस ना...' या गाण्यांचा गोडवाही रसिकांना भावणारा आहे. यातील सर्व गाणी वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केली आहेत, तर केतकी माटेगावकर, शरयू दाते, आनंदी जोशी, प्रियांका बर्वे, जसराज जोशी, ऋषिकेश रानडे, राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, रोहित राऊत, पं. संजीव अभ्यंकर यांनी गायली आहेत.


पतीची खंबीर साथ

१८८२ साली जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणं समाजमान्य नव्हतं. तेव्हा वयाच्या केवळ अठराव्या वर्षी सातासमुद्रापार बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री म्हणजे आनंदी गोपाळ जोशी. फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत तिने मोठ्या जिद्दीनं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. पती गोपाळराव यांनी आनंदीबाईंच्या मागे उभं राहून खंबीर साथ दिली. समाजाचा रोष पत्कारून गोपाळरावांच्या सोबतीने आनंदीबाई फक्त शिकल्याच नाहीत तर आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.


ही जोडी साकारणार आनंदी-गोपाळ

झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी, नम: पिक्चर्सचे किशोर अरोरा आणि शारीन मंत्री केडिया व फ्रेश लाईमचे अरुणवा जॉय सेनगुप्ता आणि आकाश चावला यांनी चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. या चित्रपटात गोपाळ आणि आनंदी यांच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद ही जोडी बघायला मिळणार आहे. याशिवाय गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, बाल कलाकार अंकिता गोस्वामी आणि अथर्व फडणीस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा करण शर्मा यांची असून, संवाद इरावती कर्णिक यांचे आहेत.



हेही वाचा -

वरुण धवन पंजाबमध्ये करतोय काय?

'माय नेम इज लखन' म्हणत टीव्हीकडे वळला श्रेयस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा