व्हॅलेंटाईन डेला तरी बोलेल का सलीलचा 'पक्या'?

मागील काही दिवसांपासून 'पक्या'ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'पक्या बोलणार तरी कधी?', 'बोल पक्या बोल' अशा आशयाच्या पोस्टमुळे हा पक्या नेमका कोण आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे.

  • व्हॅलेंटाईन डेला तरी बोलेल का सलीलचा 'पक्या'?
SHARE

मागील काही दिवसांपासून 'पक्या'ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'पक्या बोलणार तरी कधी?', 'बोल पक्या बोल' अशा आशयाच्या पोस्टमुळे हा पक्या नेमका कोण आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे. आता या पक्याच्या रहस्यावरून पडदा उठला आहे. हा पक्या आहे सलील कुलकर्णींच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'वेडिंगचा शिनेमा' या सिनेमातील. हा पक्या व्हॅलेंटाईन डेला तरी बोलेल का? असा प्रश्न सोशल मीडियावर फिरत असताना या सिनेमातील एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे.


बोल पक्या बोल...

पक्याबद्दल सांगायचं तर हा 'वेडिंगचा शिनेमा' या सिनेमातील ही मुख्य व्यक्तिरेखा आहे. गायक-संगीतकार सलील कुलकर्णी आता दिग्दर्शक बनले असून, त्यांनी दिग्दर्शित केलेला 'वेडिंगचा शिनेमा' हा पहिला मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच दिली आहे. आता व्हॅलेंटाईन डेचं औचित्य साधत 'बोल पक्या बोल...' हे या सिनेमातील गाणं प्रकाशित करण्यात आलं आहे.


पक्या करणार प्रपोज !

व्हॅलेंटाईन डे जवळ आला असताना 'वेडिंगचा शिनेमा'चा हिरो पक्याही त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची तयारी करतो आहे. त्याचे मित्र त्याच्या या प्रयत्नात मदत करण्यासाठी सरसावले आहेत. अशावेळी पक्या हे पाऊल उचलण्याचं धाडस करेल का? हे पाहायचं आहे. पक्या त्याचा मित्र परिवार त्याच्या प्रेमाच्या कबुलीची तयारी कशी करतो आहे, हे लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे. पक्याच्या मनस्थितीचं यथोचित दर्शन घडवणारं आणि जल्लोषपूर्ण गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं.शिवराज-ऋचाची जोडी

या चित्रपटाच्या माध्यमातून शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. 'बोल बोल पक्या, काहीतरी बोल पक्या...' अशा आशयाच्या या गाण्यात त्याच्या आजूबाजूचे सर्वच त्याला त्याच्या प्रेयेसीला प्रपोज करण्याची गळ घालत आहेत. पक्याला मात्र परीला 'माझं तुझ्यावर प्रेम आहे', हे सांगण्याची हिंमत होत नाही. शिवराज वायचळ, ऋचा इनामदार आणि प्रवीण तराडे यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं अवधूत गुप्तेने गायलं आहे.


'वेडिंगचा शिनेमा' १२ एप्रिलला

सलील यांच्या 'वेडिंगचा शिनेमा' मध्ये मुक्ता बर्वे, शिवराज वायचळ, ऋचा इनामदार, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे इत्यादी कलाकारांच्या भूमिका आहेत. 'वेडिंगचा शिनेमा' जरी १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असला तरी सध्या या सिनेमाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात आधार घेण्यात येत आहे.हेही वाचा -

मांडूगडावरील निसर्गसौंदर्यात जावेदचं ‘व्हॅलेंटाइन साँग’

‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’चं स्वच्छता अभियान!संबंधित विषय
ताज्या बातम्या