Advertisement

‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’चं स्वच्छता अभियान!

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी नुकतंच ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये आठ वर्षांच्या कान्हूच्या स्वप्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’चं स्वच्छता अभियान!
SHARES

काही दिग्दर्शक नेहमीच प्रवाहापेक्षा वेगळं काम करत सर्वांचं लक्ष वेधून घेतात. राकेश ओमप्रकाश मेहरा हे नावही अशाच दिग्दर्शकांपैकी एक आहे. मेहरांचा ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात ते स्वच्छतेचे धडे देणार आहेत.


'मेरी अर्जी सुन लो जरा'

मेहरांनी नुकतंच ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये आठ वर्षांच्या कान्हूच्या स्वप्नांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. ट्रेलर लाँच पूर्वीच हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत मेहरांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या पोस्टरवर मुख्य भूमिकेतील कान्हू म्हणजेच ओम कनोजिया आणि सरगम अर्थात अंजली पाटील काहीशा मिश्कील पोझमध्ये पाहायला मिळतात. ‘मेरी अर्जी सुन लो जरा’ ही लाईन सिनेमातील आशय सांगण्यासाठी पुरेशी आहे.


ट्रेलर १० फेब्रुवारीला

पोस्टर रिव्हील करताना मेहरांनी ट्वीट केलं आहे की, गांधीनगरमधील कान्हूला आपलं एक विशेष स्वप्न साकार करायचं आहे. यासाठी त्याला पंतप्रधानांच्या मदतीची आवश्यकता आहे. अधिक माहितीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करा असं मेहरा म्हणाले आहेत. १० फेब्रुवारीला या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आता ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’च्या ट्रेलरच्या प्रतिक्षेत आहेत.



स्वच्छतेवर आधारित सिनेमा

या सिनेमाची कथा स्वच्छतेवर आधारित आहे. देशामध्ये उघड्यावर शौचाला जाण्यास मनाई आहे. हा सिनेमा याच मुद्द्यावर प्रकाश टाकत स्वच्छता अभियानाकडे लक्ष वेधणारा आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या एका लहान मुलाच्या माध्यमातून मेहरांनी शौचालयाचा मुद्दा मांडला आहे. या मुलाला आपल्या आईसाठी शौचालय बनवायचं आहे. या सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री अंजली पाटील, मकरंद देशपांडे, रसिका अगाशे, सोनिया अल्बिज़ुरी, ओम कनोजिया, नचिकेत पूर्णपात्रे इत्यादी कलाकारांच्या भूमिका आहेत.

१५ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासाठी ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी गीतलेखन केलं आहे. संगीतकार शंकर-एहसान-लाय यांनी या सिनेमातील गीतं संगीतबद्ध केली आहेत. डॉ. जयंतीलाल गडा (पेन) आणि पिव्हीआर सिनेमा या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.



हेही वाचा -

तौफिक कुरेशींनी ‘डोंबिवली रिटर्न’ला दाखवला हिरवा झेंडा

Movie Review : पुलंची 'भाई'गिरी अन् शब्द-सूरांची मैफल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा