तौफिक कुरेशींनी ‘डोंबिवली रिटर्न’ला दाखवला हिरवा झेंडा

‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमानं केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं होतं. आता या सिनेमाचा पुढील भाग ‘डोंबिवली रिटर्न’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

  • तौफिक कुरेशींनी ‘डोंबिवली रिटर्न’ला दाखवला हिरवा झेंडा
SHARE

२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमानं केवळ बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर प्रेक्षकांच्या मनावरही अधिराज्य गाजवलं होतं. आता या सिनेमाचा पुढील भाग ‘डोंबिवली रिटर्न’ या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तौफिक कुरेशी यांनी हिरवा झेंडा दाखवत या सिनेमाचं संगीत प्रकाशित केलं.


२० लाखांहून अधिक व्ह्यू

सर्वसामान्य मुंबईकराच्या जगण्याचा वेध घेणाऱ्या ‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटाच्या ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केवळ चार दिवसांतच ट्रेलरला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. नुकताच या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार आणि पर्क्यूसिस्टिस्ट तौफिक कुरेशी यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळीही उपस्थित होती.


एकूण चार गाणी

या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. कथानकाला साजेशी ही वेगवेगळ्या पठडीतील गाणी गीतकार चंद्रशेखर सानेकर आणि मुकुंद सोनावणे यांनी लिहिली आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेता संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी या गाण्यांना स्वरसाज चढवला असून पार्श्वसंगीतही त्यांनीच दिलं आहे. सोनू कक्कर, प्रवीण कुवर, प्रसन्नजीत कोसंबी, विवेक नाईक यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.


हृदयाला भिडणारी गाणी

संगीत प्रकाशन सोहळ्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना कुरेशी म्हणाले की, या चित्रपटाची गाणी मी पाहिली आहेत. मूळात या गाण्यांमधील शब्द खूप चांगले आणि अर्थपूर्ण असल्यानं ती थेट हृदयापर्यंत पोहोचतात. या शिवाय सर्वच गाणी परिस्थितीनुरूप असल्यानं सिनेमाच्या कथेशी एकरूपही होतात. कुठल्याही चित्रपटात संगीताला खूप महत्व असतं असं म्हणत तौफिक यांनी "मला मिळेल ना सिनेमाचं तिकीट?", असा मिश्किल प्रश्नही विचारला.


आणि निर्माता व्हायचं ठरवलं

अभिनेता संदिप कुलकर्णीने ‘डोंबिवली रिटर्न’मध्ये प्रमुख भूमिका साकारली असून निर्मातीही केली आहे. याबाबत ते म्हणाले की, चित्रपट निर्मिती करावी असं मला खूप वर्षांपासून वाटत होतं. मी बऱ्याच चित्रपटांत काम केलं, तेव्हा जाणवलं की चित्रपट चांगला होण्यासाठी सर्व गोष्टी जुळून याव्या लागतात. अनेकदा सर्व कलाकारांनी जीव ओतून काम केलेलं असतं, पण ती कारणांमुळे कलाकृती काही लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे चांगला निर्माता असणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. माझा मित्र महेंद्र तेरेदेसाईंकडे एक गोष्ट होती, ती त्याने मला ऐकवली आणि मलाही ती आवडल्याने निर्माता व्हायचं ठरवल्याचं संदीप म्हणाला.

यात संदीपच्या जोडीला राजेश्वरी सचदेव, हृषिकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्निका शिंदे, सिया पाटील इत्यादी कलाकारांच्या भूमिका आहेत. २२ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र तेरेदेसाई यांनी केलं आहे. उदयसिंग मोहिते या सिनेमाचे डीओपी असून, योगेश गोगटे संकलक आहेत.हेही वाचा -

खुशखबर! शिवशाही 'शयनयान'च्या तिकीट दरात कपात

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, समाजशास्त्रात नाहीत नववीचे प्रश्नसंबंधित विषय
ताज्या बातम्या