Advertisement

मांडूगडावरील निसर्गसौंदर्यात जावेदचं ‘व्हॅलेंटाइन साँग’

नयनरम्य लोकेशनवर चित्रीत झालेलं कोणतंही प्रेमगीत लगेच रसिकांच्या मनाला भिडतं. यामुळेच बरेच दिग्दर्शक आपल्या सिनेमातील लव्ह साँगसाठी युनिक लोकेशनच्या शोधात असतात. आजच्या युगातील मेलडी किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या जावेद अलीनं गायलेलं एक व्हॅलेंटाइन स्पेशल गीत मांडूगडावर चित्रीत करण्यात आलं आहे.

मांडूगडावरील निसर्गसौंदर्यात जावेदचं ‘व्हॅलेंटाइन साँग’
SHARES

नयनरम्य लोकेशनवर चित्रीत झालेलं कोणतंही प्रेमगीत लगेच रसिकांच्या मनाला भिडतं. यामुळेच बरेच दिग्दर्शक आपल्या सिनेमातील लव्ह साँगसाठी युनिक लोकेशनच्या शोधात असतात. आजच्या युगातील मेलडी किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या जावेद अलीनं गायलेलं एक व्हॅलेंटाइन स्पेशल गीत मांडूगडावर चित्रीत करण्यात आलं आहे.


निसर्गप्रेमींना भुरळ पाडणार

‘व्हॉट्सॲप लव’ या आगामी मराठी सिनेमात रसिकांना जावेदनं गायलेलं हे गाणं पाहायला मिळेल. मराठमोळा अभिनेता राकेश बापट तसेच सारेह फर या इराणी अभिनेत्रीवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यातील मांडूगडावरील निसर्गसौंदर्य निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारं आहे. मध्य प्रदेशातील माण्डवगड म्हणजे मांडूगड हा राणी रूपमती आणि राजे बाजबहाद्दूर यांच्या काळजाला चटका लावून जाणाऱ्या आणि अकबर बादशहाला प्रायश्चित्त करायला लावणाऱ्या अजरामर प्रेमकहाणीचा साक्षीदार आहे.


'व्हॅलेन्टाईन स्पेशल'

याच ऐतिहासिक प्रेमकहाणीची साक्ष असलेल्या विंध्य पर्वतरांगांमधील काहिसा गूढ वाटणाऱ्या मांडू गडावरील जहाज महालात जावेदने गायलेलं गाणं शूट केलं गेलं आहे. ‘शोना रे…’ असे बोल असलेलं हे प्रेमगीत मराठी संगीतप्रेमींसाठी ‘व्हॅलेन्टाईन स्पेशल’ गिफ्ट ठरणार आहे. अजिता काळे यांचे बोल आणि नितीन शंकर यांचं संगीत या गीताला लाभलं आहे. विठ्ठल पाटील यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं असून, सिनेमॅटोग्राफी सुरेश सुवर्णा यांची आहे.


दोघे कलाप्रेमी

इंदोरपासून जवळपास १०० किमी अंतरावर विंध्य पर्वतराजीच्या कुशीत ३५ किमी परिसरात मांडूगड वसलेला आहे. सौंदर्यवती राणी रुपमतीच्या संगीतकलेवर राजा बाजबहाद्दूर भाळला. दोघे कलाप्रेमी असल्याने एकमेकांवर जीवापाड प्रेम करू लागले, पण दिल्लीचा बादशाह अकबर राजाने राणी रूपमतीचं प्रेम प्राप्त करण्यासाठी मांडूगडावर चाल केली. राजा बाजबहाद्दूरला बंदी केलं, पण राणी रुपमतीनं अकबराला शरण येण्यापेक्षा प्रेमविरहात विषप्राषन करून मृत्युला कवटाळलं. अकबर बादशाहला राणीचा मृत्यू जिव्हारी लागला. आपल्या कृत्याचा पश्चाताप करण्यासाठी त्याने राजा बाजबहाद्दूरला मुक्त केलं, पण राजानं राणीच्या कबरीवर डोकं आपटून जीव दिला.


अदभूत ठिकाणाचं दर्शन

अशा या हृदयस्पर्शी प्रेमकहाणीचा साक्षीदार असलेल्या मांडू गडावर ‘व्हॉट्सॲप लव’ चित्रपटातील प्रेमगीत चित्रीत करण्याची संकल्पना निर्माते-दिग्दर्शक हेमंतकुमार महालेंची यांची आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मनमोहक, रम्य पण काहिसा गूढ असल्याचा भास होणाऱ्या मांडूगडावर आजवर मराठी चित्रपटाचं चित्रीकरण झालं नसल्यानं प्रेक्षकांना ‘शोना रे…’ गाण्याच्या निमित्ताने एका अदभूत ठिकाणाचं दर्शन घडणार आहे.


५ एप्रिलला प्रदर्शित

मुघल साम्राज्यात अधिक सौंदर्य रूप धारण केलेल्या मांडूगडावरील जहाज महाल तत्कालिन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. मानव निर्मित दोन तलाव, विंध्य पर्वतराजीचं मनमोहक निसर्गसौंदर्य, बारा प्रवेशद्वार हे मांडूगडाचं वैशिष्ट्य आहे. अशा अद्वितीय निसर्गसौंदर्यात ‘शोना रे…’ गाण्याच्या चित्रीकरणाकरीता मध्य प्रदेश सरकार तसंच इतर स्थानिक प्रशासकीय संस्थांकडून सर्वतोपरी मदत करण्यात मिळाली. पिकल एंटरटेनमेन्टच्या समीर दिक्षीत आणि ऋषिकेष भिरंगी यांच्या मार्फत ५ एप्रिल रोजी ‘व्हॉट्सॲप लव’ हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे.





हेही वाचा -

तौफिक कुरेशींनी ‘डोंबिवली रिटर्न’ला दाखवला हिरवा झेंडा

‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’चं स्वच्छता अभियान!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा