Advertisement

EXCLUSIVE : कचरा डेपोमध्ये शूट होतोय मराठमोळा 'ब्लँकेट'

कथानकाला अचूक न्याय देण्यासाठी काही दिग्दर्शक कोणत्याच प्रकारची तडजोड करायला तयार नसतात. त्यापैकीच एक असलेला तरुण दिग्दर्शक राज गोरडे आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग चक्क कचरा डेपोमध्ये करत आहे.

EXCLUSIVE : कचरा डेपोमध्ये शूट होतोय मराठमोळा 'ब्लँकेट'
SHARES

कथानकाला अचूक न्याय देण्यासाठी काही दिग्दर्शक कोणत्याच प्रकारची तडजोड करायला तयार नसतात. त्यापैकीच एक असलेला तरुण दिग्दर्शक राज गोरडे आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिंग चक्क कचरा डेपोमध्ये करत आहे.

रंगभूमीवर अभिनय करता करता दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर 'घाट' या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक राज गोरडे सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे. 'घाट' या चित्रपटात ज्ञानेश्वर माऊलींच्या देवाची आळंदी येथील पवित्र इंद्रायणी नदीच्या घाटावर राहणाऱ्या लहान मुलांची कथा सादर केल्यानंतर राज सध्या एका कचरा डेपोमध्ये आपल्या आगामी चित्रपटाचं शूटिग करण्यात व्यग्र आहे. याबाबत 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह बातचित करत राजनं यामागील रहस्य उलगडलं.


स्त्रीच्या नीतीमूल्यांची कहाणी 

राजच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या 'ब्लँकेट' या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त काही दिवसांपूर्वीच करण्यात आला. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये या चित्रपटाचं शूटिंग वेगात सुरू आहे. चित्रपटाच्या शीर्षकासोबतच स्टोरी लाईनबद्दल राज म्हणाला की, मुद्दामच या चित्रपटाचं शीर्षक 'ब्लँकेट' असं ठेवण्यात आलं आहे. यामागचं रहस्य आता सांगून जमणार नाही. ते चित्रपटात पाहिल्यावरच अधिक प्रभावीपणे मनावर ठसेल. ब्लँकेट हे उबदार असतं, पण ही उब नेमकी कोणाची आहे? ते चित्रपट पाहिल्यावर समजेल. उच्च विद्याविभूषित स्त्रीच्या नीतीमूल्यांची ही कहाणी या चित्रपटात पहायला मिळेल.


कथा सत्य घटनेवर

या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. कथा-पटकथा राजनंच लिहिली असून याबाबत त्यानं सांगितलं की, जवळजवळ १० वर्षांपूर्वी म्हणजेच 'घाट' या माझ्या पहिल्या चित्रपटापूर्वी मला 'ब्लँकेट'ची कथा सुचली. पुण्यातील मोशीजवळ एका कचरा डेपोशेजारी बसलो असताना तिथलं निरीक्षण केल्यावर मला या चित्रपटाची संकल्पना सुचली. त्यामुळंच या चित्रपटाचं बरंचसं शूटिंग कचरा डेपोमध्येच करत आहे. अत्यंत हृदयस्पर्शी अशी ही कथा अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडेल. आज आपण स्वत:ला कितीही सुधारलेलो आहोत असं म्हणवत असलो तरी बौद्धिकदृष्ट्या किती मागासलेलो आहोत याची जाणीव हा चित्रपट करून देईल.


समाजातील कटू सत्य 

स्त्रीशिक्षणाची आणि सक्षमीकरणाची आपण कितीही टिमकी वाजवत असलो तरी आजही स्त्रियांना समाजात दुय्यम वागणूक दिली जाते हे कटू सत्य आहे. सक्षम असूनही स्त्रीच्या प्रत्येक निर्णयावर घरातील कर्त्या पुरुषाच्या संमतीची मोहोर उमटणं महत्त्वाचं मानलं जातं. स्त्रियांच्या आशा-आकांक्षाना पायदळी तुडविणाऱ्या समाजातील याच मानसिकतेवर 'ब्लँकेट'मध्ये भाष्य करत जगण्याचा एक वेगळा पैलू दाखवण्यात आला आहे.


महावीरच्या साऊंडची जादू

राष्ट्रीय पुरस्कार विजेता साऊंड रेकॅार्डिस्ट महावीर साबन्नावर यानं या चित्रपटाचा सिंक साऊंड केला आहे. 'ब्लँकेट'च्या निमित्तानं राज आणि महावीर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. महावीर खूप चांगला मित्र असल्याचं सांगत राज म्हणाला की, या चित्रपटात संवाद फार कमी आहेत. बऱ्याचशा दृश्यांमध्ये संगीत, अभिनय आणि भावना यांचा भाग खूप महत्त्वाचा आहे. साऊंड रेकॅार्डिंगच्या बाबतीत महावीरचा हातखंडा आहे. त्यानंच 'घाट'चंही साऊंड रेकॅार्डींग केलं आहे. त्यामुळं त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचंच नाव डोळ्यांसमोर नव्हतं. पुन्हा एकदा प्रेक्षकांना महावीरच्या साऊंड रेकॅार्डींगची जादू पहायला मिळेल.


सहा व्यक्तिरेखांभोवती कथा

'बँकेट'ची कथा केवळ सहा व्यक्तिरेखांभोवती फिरते. यात स्वत: राजनंही एक व्यक्तिरेखा साकारली असून, सुभाष यादव, शाश्वती खन्ना, सायली सुनील आणि बालकलाकार वैष्णवी शिंदे यांच्या भूमिका आहेत. यासोबतच मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाल्यानंतर पहिल्याच चित्रपटात कौतुकास पात्र ठरलेली अभिनेत्री 'ब्लँकेट'मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या अभिनेत्रीचं नाव सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात येत आहे. निर्माते आकाश शिंदे स्वत: पुढाकार घेऊन माय स्काय स्टार एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'ब्लँकेट'ची निर्मिती करत आहेत.

पार्श्वसंगीत गंधार यांचं असून, रोहित नागभिडे यांनी संगीत दिलं आहे. सिनेमॅटोग्राफर योगेश कोळी या चित्रपटाचं छायांकन करीत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावल्यानंतर डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्माता-दिग्दर्शकांचा विचार आहे.हेही वाचा -

नीलनं व्हील चेअरवर पूर्ण केला 'बायपास रोड'चा प्रवास!

'गल्‍ली लाइफ' सांगणार लोकप्रिय भारतीय रॅपर्सची कथासंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा