Advertisement

‘मिस यू मिस्टर’ म्हणत एकत्र आले सिद्धार्थ-मृण्मयी

सिद्धार्थ चांदेकर ‘जीवलगा’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केल्यानं सध्या चर्चेत आहे, तर मृण्मयी देशपांडे दिग्दर्शनाकडं वळल्यानं… अशातच दोघंही एकाच चित्रपटात एकत्र झळकणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच ठरणार आहे.

‘मिस यू मिस्टर’ म्हणत एकत्र आले सिद्धार्थ-मृण्मयी
SHARES

काही कलाकार एकांकिकां किंवा नाटकांमध्ये एकत्र काम करतात, पण चित्रपटात कधीच त्यांची जोडी जुळत नाहीत. असंच काहीसं घडलेले सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.


चाहत्यांसाठी पर्वणीच

सिद्धार्थ चांदेकर ‘जीवलगा’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पुनरागमन केल्यानं सध्या चर्चेत आहे, तर मृण्मयी देशपांडे दिग्दर्शनाकडं वळल्यानं… अशातच दोघंही एकाच चित्रपटात एकत्र झळकणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी जणू पर्वणीच ठरणार आहे. ‘बस स्टॉप’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटांसोबत ‘बे दुणे दहा’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या मालिकांचं दिग्दर्शन करणाऱ्या समीर जोशी यांनी सिद्धार्थ-मृण्मयीला एकत्र आणण्याची किमया साधली आहे. जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचं लेखनही केलं आहे.


प्लस पाॅइंट

'मिस यू मिस्टर'बाबत बोलताना मृण्मयी म्हणाली की, या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक समीर जोशींसोबतचा हा माझा दूसरा चित्रपट आहे. यापूर्वी मी त्यांच्या 'मामाच्या गावाला जाऊया'मध्ये काम केलं आहे. 'मिस यू मिस्टर'मध्ये मी कावेरी नावच्या तरुणीच्या भूमिकेत आहे, आजच्या काळातील बरीच दाम्पत्य कामानिमित्त एकमेकांपासून दूर राहतात आणि फक्त सुट्टीच्याच दिवशी एकमेकांना भेटतात. या चित्रपटाची कथाही त्यावरच आधारित आहे. सिद्धार्थसोबत काम करण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी या चित्रपटातील सर्वात मोठा प्लस पाॅइंट आहे.


केमिस्ट्री प्रभावशाली

या चित्रपटाच्या निमित्तानं मृण्मयीसोबत काम करण्याबाबत सिद्धार्थ म्हणाला की, मृण्मयी आणि मी कॉलेजमध्ये असताना एकांकिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. मृण्मयी खूप चांगली अभिनेत्री असल्यामुळं तिच्यासोबत काम करताना एक वेगळाच अनुभव आला. आमच्या दोघांमध्ये खूप चांगलं गिव्ह अँड टेक झालं आहे. त्यामुळं आमचं केमिस्ट्री प्रभावशाली ठरेल. या चित्रपटामध्ये मी वरूण नावाच्या तरुणाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी आम्हाला काम करण्याचं पूर्ण स्वतंत्र दिलं होतं. त्यामुळं खूप दर्जेदार चित्रपट बनू शकला.


२१ जून रोजी प्रदर्शित

हा चित्रपट कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट असल्याचं दिग्दर्शक समीर जोशी म्हणाले. २१ जून रोजी प्रदर्शित होणारा ‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट असून, नातेसंबंधांवर आधारित आहे. या चित्रपटात सिद्धार्थ-मृण्मयीसोबत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे. या चित्रपटचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रकाशित करण्यात आलं आहे.हेही वाचा-

EXCLUSIVE : ४७ वर्षांनी रंगभूमीवर अवतरणार ‘हिमालयाची सावली’
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा