मराठी रंगभूमीपासून चित्रपट आणि मालिकांमध्ये कायम सक्रीय असणाऱ्या अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेल्या 'विजेता' या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर गोव्यात सुरू असलेल्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात करण्यात आलं आहे.
बॅालिवुडमध्ये शो मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांची पावलं पुन्हा मराठी चित्रपटसृष्टीकडं वळली आहेत. यापूर्वी 'सनई चौघडे', 'वळू' आणि 'समिता' या ३ मराठी चित्रपटांनंतर घईंच्या मुक्ता आर्ट्स लि. या बॅनरखाली 'विजेता' या मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. घईंची निर्मिती असलेल्या 'समिता' या चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्कारावरही आपली मोहोर उमटवली असल्यानं 'विजेता' या चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. गोवा येथे सुरू असलेल्या मराठी चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.
गोव्याचे सांस्कृतिक आणि कला मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते 'विजेता'चं पोस्टर लाँच करण्यात आलं. खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर उत्सुकता वाढविणारं असल्याचं जाणवतं. कारण या पोस्टवर केवळ सुबोधचा मोठा चेहरा असून, विविध खेळांचा सराव करणारे इतर कलाकार पहायला मिळतात. या चित्रपटात सुबोधसोबत पूजा सावंत, नेहा महाजन, पूजा बिश्त, माधव देवचके, देवेंद्र चौगुले, गौरीश शिपुरकर, सुशांत शेलार, मानसी कुलकर्णी, कृतिका तुळसकर, ललित सावंत आणि दिप्ती धोत्रे या कलावंतांचा समावेश आहे.
आँगस्ट महिन्यापासून 'विजेता' शूटिंग सुरू होत असून, पुढील वर्षी २४ जानेवारीला प्रदर्शित करण्याची योजना सुभाष घईंनी आखली आहे. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन अमोल शेटगे यांनी केलं आहे. निर्माते राहुल पुरी, सहनिर्माते सुरेश पै, छायालेखक उदयसिंह मोहिते, संगीतकार रोहन-रोहन आणि संकलक आशिष म्हात्रे आहेत. या चित्रपटाच्या निमित्तानं घईंनी पुन्हा मराठीची कास धरली आहे हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे.
हेही वाचा -
अभिनय देवचा 'दूसरा' सांगणार भारत बदलणाऱ्या क्रिकेटची कथा
Movie Review : दुराव्यामुळं दुरावलेल्या नात्याची कथा