Movie Review : दुराव्यामुळं दुरावलेल्या नात्याची कथा

पती-पत्नी जेव्हा एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा काय होऊ शकतं? त्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

  • Movie Review : दुराव्यामुळं दुरावलेल्या नात्याची कथा
  • Movie Review : दुराव्यामुळं दुरावलेल्या नात्याची कथा
  • Movie Review : दुराव्यामुळं दुरावलेल्या नात्याची कथा
  • Movie Review : दुराव्यामुळं दुरावलेल्या नात्याची कथा
  • Movie Review : दुराव्यामुळं दुरावलेल्या नात्याची कथा
SHARE

आजचं जीवन खूप धकाधकीचं आणि स्पर्धेचं आहे. यात स्वत:ला टिकवून ठेवून स्वप्नं साकार करण्यासाठी बऱ्याच जणांना आपल्या जवळच्या व्यक्तींपासून दूर जावं लागतं, पण पती-पत्नी जेव्हा एकमेकांपासून दूर जातात, तेव्हा काय होऊ शकतं? त्याची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. आज बऱ्याच दाम्पत्यांना कामामुळं एकमेकांपासून दूर रहावं लागतं. त्यांच्यातील याच लाँग डिस्टन्स रिलेशनशीपवर दिग्दर्शक समीर जोशी यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

अप्रतिम अभिनय

चित्रपटाचा विषय नावीन्यपूर्ण आहे. मुख्य व्यक्तिरेखेसाठी निवडलेल्या कलाकारांनी अप्रतिम अभिनय केला आहे. वातावरण निर्मिती, राहणीमान, निर्मितीमूल्ये या सर्वच बाबतीत चित्रपट उजवा असला तरी गतीमान नसल्याचा फटका 'मिस यू मिस्टर'ला बसणार असल्याचं जाणवतं. चित्रपटाची वनलाईन खूप सुरेख असल्यानं उत्सुकता वाढते, पण समोरचं चित्र पाहिल्यावर निराश व्हायला होतं. पटकथेवर आणखी काम करण्याची गरज होती असं जाणवतं. चित्रपट जरी आजच्या पिढीचा असला तरी तो सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी पाहण्याजोगा आहे.

मिस मॅच

वरुण (सिद्धार्थ चांदेकर) आणि कावेरी (मृण्मयी देशपांडे) या जोडप्याची ही कथा आहे. आपलं स्वत:चं आॅफिस असावं हे स्वप्न उराशी बाळगून नुकतंच लग्न होऊनही वरुण अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतो. तिथं पैसे कमवून आॅफिस ताब्यात घ्यायचं आणि वडीलांची टेबल-खुर्ची तिथं न्यायची हे वरुणसोबतच कावेरीचंही स्वप्न. यासाठी ते १८ महिने एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतात. दूर गेल्यानंतर सुरुवातीला स्काईप, व्हॅाट्सअप आणि फोनच्या माध्यमातून गप्पा सुरू असतात, पण त्यानंतर दोघेही आपापल्या कामात इतके बिझी होतात की एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. दोघांच्या वेळा मिस मॅच होतात. त्यातून गैरसमज, भांडणं आणि वादविवाद होऊ लागतात. वरुणचं बोलणं कावेरी मनावर घेतल्यानं तिला एकटं फिल होत असतानाच अचानक वरुण येतो, पण कंपनीला आपलं काम आवडल्यानं आणखी दोन वर्षांचं कॅान्ट्रॅक्ट वाढवलं आहे हे तो कावेरीला सांगत नाही. यापेक्षा तो आपल्या दुरावलेल्या मित्रमंडळींसह नातेवाईकांना भेटण्यातच रममाण होतो. त्याचा परिणाम काय होतो ते चित्रपटात पहायला मिळतं.

जोडप्याची कथा

कामानिमित्त दूर राहणाऱ्या जोडप्याची कथा ही वनलाईन खूप सुरेख आहे, पण त्यावर तितकीच उत्कंठावर्धक पटकथा लिहिण्याची गरज होती. संवादलेखन आजच्या पिढीला साजेसं आणि अर्थपूर्ण आहे. चित्रपट सुरू झाल्यापासूनच कथानक अतिशय संथ गतीनं पुढे सरकतं. पडद्यावरील चित्र हलत राहतात, पण घडत मात्र काहीच नाही. त्यामुळं पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता वाढण्याऐवजी मध्यंतर कधी होणार याचेच वेध लागतात. मनात कुतूहल निर्माण करणाऱ्या घटनांची गुंफण न केल्यानं आणि मनोरंजक क्षणांची कमतरता असल्यानं चित्रपट फारसा प्रभावी वाटत नाही.

लाँग डिस्टन्स रिलेशनशीप

मध्यंतरानंतर दोघांमध्ये वाद निर्माण होऊ लागतात आणि लाँग डिस्टन्स रिलेशनशीप हा मुद्दा मागे पडून ते सर्वसामान्य पती-पत्नीप्रमाणे भांडू लागतात. आपण पुन्हा जाण्यासाठी आलो आहोत हे कावेरीला वरुण का सांगत नाही? हे समजत नाही. तिला दुसरीकडून कळल्यावर तिचा त्रागा होणं सहाजिक आहे. त्यामुळं चित्रपटाचा मुख्य विषयाला बगल दिल्यासारखी होते. सुखी कुटुंबाच्या चौकटीत बसणारं या चित्रपटातील कुटुंब पाहिल्यावर समाधान मिळतं. आई-वडीलांप्रमाणे प्रेम करणारे सासू-सासरे, सुनेला खुश करण्यासाठी तत्पर असलेली सासू, शांत स्वभावाचे सासरे हे सर्व पाहिल्यावर घरोघरी अशीच माणसं असतील तर कोणालाच कशाचाही त्रास होणार नाही हा विचार मनात नक्की येतो.

सशक्त पटकथेची उणीव

चित्रपटाची मांडणी चांगली केली असली तरी संथ गतीचा फटका बसला आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सक्षम आहे. 'तुझी आठवण...' या आनंदी जोशी आणि आलाप देसाईंनी गायलेल्या गाण्यासोबतच 'येशील तू...' हे सोनू निगमनं गायलेलं गाणंही चांगलं झालं आहे. पार्श्वसंगीत, कलादिग्दर्शन, छायांकनही चांगलं आहे. सर्व गोष्टी चांगल्या जुळून आल्या असल्या तरी त्यासाठी एका सशक्त पटकथेची उणीव मात्र जाणवते.

झकास केमिस्ट्री

मृण्मयी देशपांडेनं पुन्हा एकदा जबरदस्त अभिनय केला आहे. संवादफेक करतानाचे तिच्या डोळ्यातील भाव मनाला स्पर्श करतात. सिद्धार्थनं साकारलेला वरुणही सुरेख झाला आहे. विशेष म्हणजे दोघांची झकास केमिस्ट्री या चित्रपटात पहायला मिळते. सविता प्रभुणे या चित्रपटात एका वेगळ्याच रंगात दिसतात. त्यांनी साकारलेली काहीशी विनोदी सासू स्मरणात राहणारी आहे. राजन भिसे यांनी त्यांना चांगली साथ दिली आहे. अविनाश नारकर, राधिका विद्यासागर, दीप्ती लेले यांनीनी चांगलं काम केलं आहे. पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ऋषिकेश जोशीनं नेहमीच्या शैलीत काम केलं आहे.

पटकथेची बांधणी

आज बऱ्याच दाम्पत्यांना भेडसावणाऱ्या महत्त्वपूर्ण समस्येवर हा चित्रपट बेतला आहे. पटकथेची बांधणी आणखी घट्ट असती तर आणखी मजा आली असती, पण मृण्मयी-सिद्धार्थ यांच्या अभिनयासाठी हा चित्रपट पहायला हरकत नाही.


दर्जा : **1/2

................................

निर्माता : दीपा त्रासी, सुरेश म्हात्रे

कथा, पटकथा आणि संवाद : समीर हेमंत जोशी

दिग्दर्शक : समीर हेमंत जोशी

कलाकार : मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकर, सविता प्रभुणे, राजन भिसे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर, दीप्ती लेले, ऋषीकेश जोशीहेही वाचा -

मराठा आरक्षण कुणाच्याही ताटातून काढून दिलेलं नाही- उद्धव ठाकरे

'असं' आहे अकरावीचं सुधारीत वेळापत्रक, ४ जुलैपर्यंत करता येईल अर्जसंबंधित विषय
ताज्या बातम्या