Advertisement

मराठा आरक्षण कुणाच्याही ताटातून काढून दिलेलं नाही- उद्धव ठाकरे

कुणाच्या ताटातलं काढून कुणाला दिलेलं नाहीय. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं आहे. जे दिलं ते त्यांच्या हक्काचं आहे. त्यामुळे कुणीही सर्वोच्च न्यायालयात जाऊन मराठा आरक्षणाच्या आड येऊ नये, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठा आरक्षण कुणाच्याही ताटातून काढून दिलेलं नाही- उद्धव ठाकरे
SHARES

कुणाच्या ताटातलं काढून कुणाला दिलेलं नाहीय. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं आहे. जे दिलं ते त्यांच्या हक्काचं आहे. त्यामुळे कुणीही सर्वोच्च न्यायालयात जाऊन मराठा आरक्षणाच्या आड येऊ नये. उगाच लढायचं म्हणून लढू नका. तसं जर कुणी आरक्षणाच्या आड आलं, तर शिवसेना पूर्ण ताकदीने मराठा समाजाच्या पाठिशी उभी राहील. मराठा, मराठेतर अशा वादात न पडता आपण सगळे शिवरायांचे मावळे म्हणून एकत्र आल्यास जगात वेगळी ताकद निर्माण होऊ शकेल, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शनिवारी दुपारी उद्धव यांची भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.

आरक्षण वैध 

राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं आहे. त्यानंतर मराठा समाजाला या लढ्यात दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानण्यासाठी मराठा आरक्षणाच्या बाजूने याचिका दाखल करणारे विनोद पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेन पाटील आणि या लढ्यात सहभागी झालेल्या वकिलांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव यांची भेट घेतली.

अडथळे नकोत

या भेटीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या आरक्षणाला विरोध करणारे काहीजण या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी करत आहे. पण त्यांनी लक्षात घ्यावं की मराठा समाजाला आरक्षण देताना कुणाचाही हक्क हिरावून घेण्यात आलेला नाही. कुणाच्याही ताटातलं काढून मराठा समाजाला देण्यात आलेलं नाही. त्यामुळे उगाच सर्वोच्च न्यायालयात जाऊन या वादात रमू नका आणि मराठा आरक्षणाला अडथळा निर्माण करू नका.  

सगळे शिवरायांचे मावळे  

मराठा आरक्षणाला विरोध करून मराठा- मराठेतर असा वाद निर्माण करू नका. उलट आपण सगळे शिवरायांचे मावळे म्हणून एकत्र आल्यास जगात वेगळी ताकद निर्माण होऊ शकेल. मराठा आरक्षणाला विरोध झाल्यास शिवसेना संपूर्ण ताकदीने मराठा समाजाच्या पाठीमागे उभी राहील. दिल्लीत जी काही मदत लागेल ती शिवसेना पुरवेल. मराठा आरक्षणाचं श्रेय घेण्यासारखं आम्हीही काहीही केलेलं नाही. 

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची आमची आजही इच्छा आहे. उरलेल्या ३ टक्के आरक्षणाबाबत लवकरच मार्ग निघेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. 



हेही वाचा-

'असं' आहे अकरावीचं सुधारीत वेळापत्रक, ४ जुलैपर्यंत करता येईल अर्ज

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा