Advertisement

कोळीगीतात रंगली मेनकारूपी पौर्णिमा


कोळीगीतात रंगली मेनकारूपी पौर्णिमा
SHARES

प्रत्येक कलाकार कोणत्या ना कोणत्या तरी भूमिकेत आपला वेगळा ठसा उमटवत असतो. ‘विठू माऊली’ या मालिकेत अभिनेत्री पौर्णिमा शिंदे साकारत असलेली मेनका सध्या चांगलीच गाजत आहे. आता हीच मेनकारूपी पौर्णिमा कोळीगीतात रंगली आहे.

कधी कोणाला, कुठे आणि कसा ब्रेक मिळेल हे सांगता येत नाही. पौर्णिमाच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. हाती येणारं चांगलं काम मन लावून करत ती आज छोट्या पडद्यावर पॅाप्युलर झाली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या ‘विठू माऊली’ या मालिकेत ती मेनकेच्या रूपात झळकत आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या पहिल्या सिंगलमध्ये ती कोळीगीताच्या तालावर परफॅार्म करताना दिसत आहे. या सिंगलच्या निमित्ताने पौर्णिमाने ‘मुंबई लाइव्ह’शी संवाद साधला. 



अँकरिंगने दिली अभिनयाची संधी

पौर्णिमाने आपल्या करिअरची सुरुवात सह्याद्री वाहिनीवर अँकरच्या रूपात केली. ‘सखी सह्याद्री’ आणि ‘योग संजीवनी’साठी अँकरींग करताना तिला मालिकांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर’ या मालिकेसोबतच तिने ‘गुलमोहर’ आणि ‘हम तो तेरे आशिक है’ या मालिकांमध्येही काम केलं आहे. सध्या ‘विठू माऊली’मध्ये तिचा मेनकाचा ट्रॅक सुरू आहे.


अभिनयाची पार्श्वभूमी नाही

अभिनयाचा कोणताही वारसा नसतानाही पौर्णिमाने छोट्या पडद्यावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळवलं आहे. एम. डी. कॅालेजमध्ये शिकलेल्या पौर्णिमाचे वडील व्यवसायाने डॅाक्टर आहेत, तर आई वकील आहे. पण बालपणापासून अभिनयाचा छंद आणि आई-वडीलांच्या प्रोत्साहनामुळे ती इथवर पोहोचू शकली.


बालनाट्याने लावली अभिनयाची गोडी

मला जरी अभिनयाची पार्श्वभूमी नसली तरी आई बालपणी मला बालनाट्यासाठी घेऊन जायची. तिथेच खऱ्या अर्थाने अभिनयाची गोडी लागली. बालनाट्यासोबतच मी किषुपाल यांच्या भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं. त्यामुळे माझा नृत्याचा बेस पक्का झाला. अकरावीला असताना अभिनयापासून दूर गेले.  पण कृपासिंधूने माझ्या करियरला कलाटणी दिली.


चिकना मासा

‘माझ्या जाल्यान हेरलाय चिकना मासा...’ हे पौर्णिमाचं सिंगल कोळीगीत रिलीज झालं आहे. यात ती कोळीणीच्या भूमिकेत आहे. समुद्रकिनारी ही मुलगी एका मुलाला पाहते आणि त्याच्या प्रेमात पडते. मनोमन त्याच्यावर प्रेम करू लागते. त्याच्यासोबत लग्न करण्याची स्वप्न पाहू लागते, पण घडतं काही वेगळंच. त्यावेळी तिच्या मनात दाटून आलेल्या भावना या कोळीगीताच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आल्या आहेत.




प्रथमच केलं कोळीगीत

कोळीगीत हा लोकगीताचा प्रकार बऱ्याच कलाकारांचा आवडतो. प्रत्येकाने स्ट्रगलच्या काळात कधी ना कधी कोळीगीतावर परफॅार्म केलेलं असतं. पण पौर्णिमाचं हे पहिलं कोळीगीत आहे. भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं असलं तरी ती बॅालिवूड डान्समध्येही पारंगत आहे.  पण अद्याप तिने कधीच कोळीगीतावर परफॅार्म केलं नव्हतं.


टिमवर्कमुळे जमलं

प्रथमच कोळीगीतावर परफॅार्म करण्याचं श्रेय पौर्णिमाने या सिंगलच्या टिमला दिलं आहे. सुयोग मीडिया वर्क्सची निर्मिती असलेल्या या सिंगलमध्ये पौर्णिमासोबत गणेशा बुक्कानूर मुख्य भूमिकेत आहे. विनोद पाटील भारोंडीकर यांनी लिहिलेल्या गीताला संगीतकार सुनील श्रीपत यांनी स्वरसाज चढवला आहे. अमृता गढवी यांनी गायलेल्या या गीताची कोरिओग्राफी गणेश कांबळे यांनी केली आहे.


मनाजोगत्या भूमिकांच्या प्रतिक्षेत

पौर्णिमाला आता मोठ्या पडद्याचे वेध लागले आहेत. पण चांगली भूमिका मिळाली तरच ती सिनेमाची आॅफर स्वीकारणार आहे. जी भूमिका साकारल्यानंतर मानसिक समाधान लाभेल तिच करेन असं ती म्हणते. करियरच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरतील अशाच भूमिका तिला साकारायच्या आहेत.


नाटकही करायचं आहे

पौर्णिमाने रंगभूमीवरही काम केलं आहे. राजेश देशपांडे यांच्या एकांकिकेसाठी तिला पुरस्कारही मिळाला आहे. बोलीभाषा एकांकिका स्पर्धेसाठी कोकणी भाषेत या एकांकिकेचा प्रयोग करण्यात आला होता. ‘झो, केलान काम बराबर’ असं शीर्षक असलेली ही एकांकिका नाटकाच्या रूपात रंगभूमीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कदाचित हेच पौर्णिमाचं पहिलं नाटक ठरेल.



हेही वाचा -

‘बिग बॅास’मध्ये नंदकिशोर बनणार हुकुमशाह

बाळासाहेबांची भूमिका 'लार्जर दॅन लाइफ'- नवाजुद्दीन सिद्दीकी


 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा