Advertisement

आशाताईंना तोड नाही, ८६ व्या वर्षी गायलं रोमँटीक साँग


आशाताईंना तोड नाही, ८६ व्या वर्षी गायलं रोमँटीक साँग
SHARES

वयाच्या दहाव्या वर्षापासून भारतीय संगीतविश्वात सुरांची उधळण करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८६ व्या वर्षीही आपल्या आवाजाची जादू दाखवत एक मदमस्त गाणं गायलं. 

‘व्हॉट्सॲप लव्ह’ साठी गायलं गाणं

शास्त्रीय, सुगम, लोकगीत, कॅब्रे असो वा सुफी, संगीतातील सर्व प्रकार आशाताईंनी आपल्या गायकीने सजवले आहेत. क्लब साँग गाण्यात आशाताईंना दुसरा पर्याय नव्हता आणि नाही. त्याकाळी चित्रपट संगीतात नुरजहाँ, लतादीदी यांच्या सारख्या मातब्बर गायिकांचा बोलबाला असतानाही आशाताईंनी आवाजातील मदहोश नजाकतींनी स्वत:चं स्थान कायम ठेवलं आहे. ते आजतागायत अढळ आहे. आशाताईंच्या गायकीतील हीच खासियत असलेली अदा संगीत रसिकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. वयाची ८६ उलटलेली असतानाही आपल्या चिरतरूण मस्तीभऱ्या अंदाजाने आशाताईंनी ‘व्हॉट्सॲप लव्ह’ या मराठी चित्रपटासाठी एक क्लब साँग गायलं आहे.   


तात्काळ होकार

अजिता काळे आणि साहील सुल्तानपुरी या गीतकारांची रचना असलेल्या ‘रात सुहानी सी...झाले दिवानी मी’ या नशिल्या आणि मदहोशभऱ्या गाण्याला आशाताईंनी स्वरसाज चढवला आहे. बॉलिवूमधील अनेक दिग्गज संगितकारांकडे संगीत संयोजन करणारे नितीन शंकर यांनी या गीताचा बाज ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर केवळ आशाताई आल्या. त्यांनी निर्माता-दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांना ही गोष्ट सांगितली आणि हेमंतकुमार यांनीही लगेच होकार दिला.


मराठीत क्लब साँग

आशाताईंना जेव्हा हे गाणं ऐकवलं तेव्हा त्यांची प्रतिक्रीया फारच उत्साही होती. “क्लब साँग आणि तेही मराठीत...अरे वा! खूप वर्षांनी हे गायला मजा येईल. कधी करायचं रेकॉर्डिंग?”असं विचारून त्यांनी तिथल्या तिथंच गाण्याची चाल ऐकून गुणगुणायला सुरूवात केली. ह्यावेळी त्यांचा मुलगा, सून आणि नात तिथं उपस्थित होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी आशाताईंचा एक वेगळाच मूड पाहायला मिळाल्याचे आणि त्यापेक्षाही जास्त रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये त्यांचा मूड बहरल्याचं त्यांचे निकटवर्तीय आणि संगीतकार नितीन शंकर यांनी सांगितलं.


 यु ट्यूब वर गाणं

आशाताईंनी गाणं गायलं असल्याने त्याचं चित्रीकरणही तशाच ढंगात व्हायला हवं, म्हणून एका आलिशान क्लबमध्ये अभिनेता राकेश बापट व नवतारका पल्लवी शेट्टी यांच्यावर या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. आशाताईंच्या जादुई सुरांचा स्पेशल टच लाभलेलं आणि ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुरेश सुवर्णा यांच्या कलात्मक दृष्टीतून साकारलेले हे गाणं पडद्यावर पाहणं एक विलक्षण अनुभव असणार आहे. नानुभाई सिंघानिया यांच्या व्हिडिओ पॅलेस या यु ट्यूब चॅनेलवर हे गाणं आपल्याला पाहता येईल.



हेही वाचा -

पहिल्या सहामाहीत मराठी चित्रपटसृष्टी पास की नापास?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा