SHARE

सांताक्रुझच्या कलिनातल्या विद्यानगर संकुल इथं 18, 19, 20 ऑक्टोबरला परंपरा महोत्सव आणि लोककथा गायनावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय परिषद इंडियन फोकलोअर काँग्रेसच्या सहयोगाने आयोजित करण्यात आली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शाहिरी कलाकारीने रान पेटवणाऱ्या शाहीर अमरशेख यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारोपाचे औचित्य साधून महोत्सव आणि परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत देशाच्या अन्य राज्यांतील 50 अभ्यासक सहभागी होणार आहेत. 18 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. यानंतर इंडियन फोकलोअर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकसाहित्य अभ्यासक डॉ. जवाहरलाल हांडू यांचे भाषण होईल.

19 ऑक्टोबरला परंपरा महोत्सवात भरतदान गढवी यांचे डायरो गायन, आदिनाथ विभूते यांचे पोवाडा गायन, नेक मोहम्मद निजाम खाँ यांचे लंगा गायन (राजस्थानी लोक संगीत), पद्मश्री भारती बंधू यांचे कबीर गायन, शांती चलक यांचे पंडवानी गायन सादर होईल.

20 ऑक्टोबरला शाहीर अमरशेख यांच्या जन्म शताब्दी वर्ष समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख भूषवतील. प्रमुख पाहूणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उच्च व तंत्र शिक्षण तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या