Advertisement

मराठीतला पहिलाच प्रयोग, ३० हून अधिक कलाकारांनी गायलं 'स्माईल प्लीज'चं अँथम साँग

पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीतील ३० हून अधिक नावाजलेले कलाकार या गाण्यासाठी एकत्र आले आहेत. हिंदीनंतर मराठी गाण्यात होणारा बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा.

मराठीतला पहिलाच प्रयोग, ३० हून अधिक कलाकारांनी गायलं 'स्माईल प्लीज'चं अँथम साँग
SHARES

मराठीमधील बहुचर्चित अशा 'स्माईल प्लीज' या चित्रपटाचं अँथम साँग नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'चल पुढे चाल तू' असे या गाण्याचे बोल असून हे गाणं प्रेक्षकांसाठी सुखद अनुभव देणारं ठरणार आहे. या गाण्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीतील ३० हून अधिक नावाजलेले कलाकार या गाण्यासाठी एकत्र आले आहेत. हिंदीनंतर मराठी गाण्यात होणारा बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा.  


जगण्याची प्रेरणा

'चल पुढे चाल तू वाट ही आपली' असं म्हणत सर्वच कलाकार प्रेक्षकांना जगण्याची एक नवी ऊर्जा देत आहेत. जीवन जगताना सर्वांसमोर रोज एक नवीन आव्हान उभं असतं, असं असलं तरी आपण आपलं जगणं सोडत नाही.  कधी आव्हानांवर यशस्वीरित्या मात करून तर कधी अपयशी होऊन आपण जगतच असतो. अशाच आपल्या जगण्याला एक नवीन प्रेरणा, नवीन उमेद  देणारं हे गाणं आहे.  


कलाकारांची झलक

या गाण्यात उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकर, भूषण प्रधान, चिन्मय मांडलेकर, चिन्मयी सुमीत, रेणुका शहाणे, हर्षदा खानविलकर, शरद केळकर, मेघा धाडे, सिद्धार्थ चांदेकर, मृणाल कुलकर्णी, मृन्मयी गोडबोले, प्रार्थना बेहेरे, प्रिया बापट, उमेश कामत, पुष्कर श्रोत्री, सचिन पिळगावकर, सई लोकूर, मिताली मयेकर, सागरिका घाटगे, श्रिया पिळगावकर, सोनाली खरे, स्पृहा जोशी, तेजस्विनी पंडित, मानसी नाईक, वैभव तत्ववादी यांच्यासोबतच मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, आदिती गोवित्रीकर, बॉस्को - सिझर, रोहन गोखले, रोहन प्रधान आणि विक्रम फडणीस या सर्व कलाकारांची झलक दिसणार आहे.


कलाकारांचा सपोर्ट

हे गाणं चित्रित करणं तितकेसं सोपं नव्हतं. कारण या गाण्याला एका दिवसातच चित्रित करायचं होतं. विक्रम फडणीस यांनी या गाण्याची कल्पना जेव्हा इंडस्ट्रीतील कलाकारांना सांगितली, तेव्हा एका झटक्यात सगळ्यांनी होकार दिला. सगळ्या कलाकारांनी होकार तर दिला, पण विक्रम फडणीस यांना सर्व कलाकार एकाच दिवशी त्यांच्या तारखा देतील का? असं वाटत असतानाच शक्य तितक्या सर्व कलाकारांनी उत्तमरित्या सहकार्य केलं. हे स्पेशल गाणं चित्रपटाच्या टीमने जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना समर्पित केलं आहे. 


 १९ जुलै रोजी प्रदर्शित

हे गाणं मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलं असून रोहन - रोहन यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं आहे. नृत्यदिग्दर्शक बॉस्को-सिझर यांनी या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, आदिती गोवित्रीकर यांच्या प्रमुख भूमिका असून तृप्ती खामकर, सतीश आळेकरसुद्धा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'स्माईल प्लीज' हा चित्रपट उद्याचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस मनमुराद जगायला शिकवणारा आहे.. विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' हा चित्रपट १९ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.


LINK : - https://www.youtube.com/watch?v=T3CnzmpBWXc&feature=youtu.be



हेही वाचा -

पहिल्या सहामाहीत मराठी चित्रपटसृष्टी पास की नापास?




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा