Advertisement

'सोनु तुझा मायावर...' गाणं गाणारा अवलिया!


'सोनु तुझा मायावर...' गाणं गाणारा अवलिया!
SHARES

'सोनु तुला मायावर भरोसा नाय काय?' प्रत्येकाच्या ओठी फक्त हेच गाणं आहे. महाराष्ट्रात या गाण्यानं प्रचंड लोकप्रियता कमवली आहे. गाण्याच्या व्हीडिओनं यूट्युबवर लाखोंचा टप्पा पार केलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर या गाण्यानं धुमाकूळ घातलाय. प्रत्येक जण या गाण्यावर ग्रुपनं डबस्मॅश करताना दिसतोय. लोकांना याड लावलेल्या गाण्याचा नेमका उगम काय? हे गाणं कुणाचं? कुणी गायलंय? याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? क्वचितच लोकांना या गाण्याचा रचेता कोण आहे हे माहिती असावं. पण आज आम्ही तुम्हाला हे गाणं तयार करणाऱ्या अवलियाची गाठ घालून देणार आहोत.

२६ वर्षीय अजय क्षीरसागर यांनी 'सोनु तुझा मायावर भरोसा नाय काय?' हे गाणं तयार केलं. या गाण्याला आवाज दिला तो अजय क्षीरसागर यांच्या पत्नी भाग्यशाली क्षीरसागर यांनी. तर या गाण्याचे संगीतकार आहेत चंदन क्षीरसागर.

अजय हे सध्या पुण्यात राहतात. पण ते मूळचे आहेत सोलापूरच्या कुरुडवाडी इथले. गेल्या १൦ वर्षांपासून अजय संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक गाणी अजय क्षीरसागर यांनी गायली आहेत. 'मी तुझा परश्या, तू माझी आर्ची', 'बानू बानू' ही त्यांनीच लिहलेली गाणी आहेत. आजही ही गाणी कोणत्या उत्सव किंवा समारंभात लागली की, आपोआप पाय थिरकायला लागतात.  


मुंबई लाइव्हनं अजय क्षीरसागर यांच्याशी बातचित केलीय. त्यांना या गाण्याची कल्पना कशी सुचली? त्यांचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? हे जाणून घेऊयात अजय क्षीरसागर यांच्याकडूनच.



तुम्हाला या गाण्याची संकल्पना कशी सुचली?

मी १५ वर्षांचा असल्यापासून गाणं संगीतबद्ध करत आहे. मी सोनु ही कविता वाचली. या कवितेवरून मला सोनु या पात्रावर गाणं लिहिण्याची कल्पना सुचली. त्यानुसार गेल्यावर्षी मी हे गाणं लिहलं आणि माझी पत्नी भाग्यशालीनं हे गाणं गायलं आहे. खरंतर माझी बायको मला प्रेमानं सोनु या नावानं आवाज देते. सोनु तुला मायावर भरोसा नाय काय? हे ती मला बोलायची. याच लाईनवर मी गाणं तयार केलं.


तुम्ही केव्हापासून लोकगीतं गात आहात?

गेली १൦ वर्ष मी संगीत क्षेत्रात आहे. मी सुरुवातीला भक्तीगीतं गात होतो. पण २-३ वर्षांपूर्वी मी लोकगीतांकडे वळलो. 'मी तुझा परश्या, तु माझी आरची' हे गाणं सुद्धा मी तयार केलं आहे. हे गाणं देखील महाराष्ट्रात चांगलंच गाजलं.  


तुम्हाला तुमच्या गाण्याबद्दल काय वाटतं?

गेल्या वर्षी 'सोनु..' गाणं लिहिलं आणि सुमीत म्युझिक कंपनीनं ते प्रदर्शित केलं. मला किंचितही अंदाज नव्हता की हे गाणं हिट होईल. पण जेव्हा मला कळलं की, माझी गाणी हिट ठरत आहेत, तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. अनेकांनी सोनु गाण्याचे डबस्मॅश केले आहेत. रेडिओ स्टेशन्सनीही सोनु हे गाणं उचलून धरलं. त्यामुळे मला खूप आनंद वाटत आहे. आता कुठे गेलं की, लोकांना माझं गाणं ऐकायला आवडतं. ते मला आवर्जून हे गाणं गायला सांगतात.  


तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत?

सध्या मी दोन गाण्यांवरच काम करत आहे. 'मनीषाच्या लग्नाला वाजतोय नाशिक बाजा' आणि 'बघत बसतोय तुला गं, जानू बघत बसतोय तुला' ही दोन गाणी तुम्हाला लवकरच ऐकायला मिळतील. मला खात्री आहे की ही दोन गाणी देखील तुम्हाला आवडतील. शिवाय गणपतीमध्ये आम्ही 'सोनु' या गाण्याचं व्हीडिओ शूट करणार आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा