Advertisement

राज ठाकरेंचा 49 वा वाढदिवस, राज्यभरातून कार्यकर्त्यांची कृष्णकुंजवर गर्दी


SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दादर येथील 'कृष्णकुंज' निवासस्थानी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी 9 वाजल्यापासूनच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अनेकांनी पारंपरिक पद्धतीने मनसे अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यासह सामान्य नागरिकांनी देखील राज ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकार देखील आहेत, ही बाब लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना पेंटिंग्सही भेट दिली. यावेळी राज ठाकरेंच्या 49व्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी 49 किलो वजनाचा केक भेट म्हणून दिला.

शुभेच्छांसाठी मनसे दिंडी

मनसे अध्यक्षांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या. मीरा-भाईंदर मतदार संघातल्या कार्यकर्त्यांनी तर चक्क दिंडीच काढली. थेट मिरा-भाईंदरहून आलेली ही दिंडी यावेळी सर्वांचं लक्ष आकर्षित करत होती. यामध्ये अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

49 किलोचा खास केक

कांदिवली विधानसभेतील मनसे नगरसेविका अश्विनी माटेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 49 किलोचा केक भेट दिला. यावेळी बोलताना त्यांचे पती अशोक माटेकर म्हणाले, राज ठाकरे जेवढ्या वर्षांचे होतात तेवढ्या वजनाचा केक आम्ही दरवर्षी त्यांना भेट म्हणून देतो.

कार्यकर्त्यांचे प्रेम, रक्ताने रेखाटले राज ठाकरेंचे चित्र

प्रेम व्यक्त करण्यासाठी कोण काय करेल याचा अनेकदा अंदाजच लावता येत नाही. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील असेच एक अचंबित करणारे दृश्य उपस्थितांना पहायला मिळाले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अहमदनगरचे शहराध्यक्ष परेश प्रवीण पुरोहित यांनी आपल्या रक्ताने चित्रकार नंदकुमार यानम यांच्याकडून राज ठाकरेंचे चित्र रेखाटून भेट दिले.


हेही वाचा

शिशिर शिंदे ‘राज’कारण सोडणार?

शिशिर शिंदेही पोहोचले शुभेच्छा द्यायला!

गेल्या काही दिवसांपासून मनसेचे नेते शिशिर शिंदे पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर 'आपल्याला नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे' अशी विनंती करणारे पत्र शिशिर शिंदे यांनी राज ठाकरेंना लिहिले होते. भांडुप परिसरातले नगरसेवकपदाचे उमेदवार निवडताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचेही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना मान्य केले होते. मात्र राज्यभरातल्या तमाम कार्यकर्त्यांसोबतच शिशिर शिंदेही राज ठाकरेंना शुभेच्छा द्यायला आलेले पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा