घोडेबाजारावर गाढवांनी बोलू नये - उद्धव


SHARE

मुंबई महापालिकेतील सत्तेच्या घोडेबाजारात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक फोडून शिवसेनेने आपलं संख्याबळ ८४ वरून थेट ९० वर नेलं आहे. मनसेच्या ७ पैकी ६ नगरसेवकांना खेचून शिवसेनेने भाजपाचं सत्तास्थापनेचं आव्हान मोडीत काढून मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरील स्पर्धक मनसेचा महापालिकेत सुपडा साफ केलाय. एका अर्थानं शिवसेनेने एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. 

या ६ नगरसेवकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे जाऊन आपला पाठिंबा शिवसेनेला देऊ नये म्हणून भाजपासह मनसेने शुक्रवार संध्याकाळपर्यंत जोरदार प्रयत्न केले. पण या प्रयत्नांना हाणून पाडत शिवसेनेने सहाही नगरसेवकांना थेट मातोश्रीवर नेऊन प्रसिद्धी माध्यमांपुढे आणलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शेवटपर्यंत अंधारात ठेवून जय महाराष्ट्र करणाऱ्या नगरसेवकांमध्ये मनसेचे महापालिकेतील गटप्रमुख दिलीप लांडे यांच्यासह अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, अश्विनी माटेकर, हर्षिला मोरे आणि दत्ता नरवणकर यांचा समावेश आहे.


शिवसेनेत घरवापसी 

हे फोडाफोडीचं राजकारण नाही. तर पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत परतलेत. ही घरवापसी आहे. हे सहाही नगरसेवक यापुढं शिवसेनेचे नगरसेवक म्हणून महापालिकेत काम करतील, असं प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

काही जण आम्ही घोडेबाजार केल्याचं म्हणत आहे. पण घोडेबाजारावर गाढवांनी बोलू नये, असं मला वाटतं. तुम्ही करता ती खुद्दारी आणि आम्ही करतो ती गद्दारी? भाजपानं स्वत: कुठेकुठे घोडेबाजार केला आहे, हे आठवावं. एका दिवसात शिवसेना एवढी जमवाजमव करत असेल, तर शिवसेनेची ताकद सर्वांना समजलीच असेल. 

मोदी लाट गेली आहे. तसं नसतं तर भाजपाला दुसऱ्या पक्षातून आयते नगरसेवक घेऊन निवडणूक लढवावी लागली नसती. भांडुपची निवडणूक या लोटवर नाही, तर सहानुभूतीवर त्यांनी जिंकली. भाजपाला आम्ही मित्र वाटत असू तर त्यांनी आमच्या आनंदात सहभागी व्हावं, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.


मराठी माणसासाठी

मुंबई शहरात आमचा महापौर बसवणार, असा इशारा देणाऱ्या भाजपाला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून शिवसेनेत जाण्याचा भावनिक निर्णय घेतला. मराठी माणूस गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबई महापालिकेत बसलाय. भाजपाचा इशारा मराठी हिताच्या आड येणार होता. त्याला संपवण्यासाठी आम्ही एकत्र आलोय. मराठी माणसाची, शिवसेनेची सत्ता कायम मुंबई महापालिकेत रहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
- दिलीप लांडे, नगरसेवकडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय