वाद 'भावोजीं'च्या अध्यक्षपदाचा

 Prabhadevi
वाद 'भावोजीं'च्या अध्यक्षपदाचा

'होम मिनिस्टर' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले सर्वांचे लाडके 'भावोजी' म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र त्यांच्या या निवडीनंतर आता एक नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते निलेश राणे यांनी आदेश बांदेकर यांच्या निवडीवर आक्षेप घेत आदेश बांदेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी बांदेकर यांची झालेली निवड तात्काळ रद्द करावी अशा आशयाचे पत्रच निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे....म्हणून आदेश बांदेकर यांची निवड रद्द करा

आदेश बांदेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत. नेमकी हीच बाब निलेश राणे यांना खटकली आहे. राजकीय पक्षाच्या सचिवपदी कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या निवडीमुळे त्या पक्षाशी संबंधित असलेल्या लोकांना या ट्रस्टचा लाभ होऊ शकतो. यातून अन्य गरजूंवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे कारण देत बांदेकर यांचे अध्यक्षपद तत्काळ रद्द करावे, अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे. नेहमीप्रमाणे निलेश राणे याखेपेसही ट्विटरचाच आधार घेतला आहे.

सिद्धीविनायक ट्रस्टची स्थापना ही समाजातील गोरगरीब जनतेच्या आर्थिक मदतीसाठी, गरीब रुग्णांच्या सेवेसाठी झाली आहे. सामाजिक स्तरावर कार्य करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदावर अशा व्यक्तीची निवड करण्यात आली आहे की, त्या व्यक्तीला या अगोदर कोणत्याही प्रकारचा शासकीय कार्याचा अनुभव नाही.

निलेश राणे, काँग्रेस नेते

दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात आदेश बांदेकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र आता सिद्धीविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे बाप्पाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला हा वाद आता किती दिवस चालतोय हे  त्या सिद्धिविनायकालाच ठाऊक.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments