Advertisement

शिवसेनेतील प्रवेशाबाबत उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेतली.

शिवसेनेतील प्रवेशाबाबत उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
SHARES

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची भेट घेतली. या भेटीनंतर उज्ज्वल निकम शिवसेनेत (shiv sena) जाणार या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.

जळगाव दौऱ्यावर असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास १५ ते २० मिनिटं उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु होती. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी ही भेट असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. 

याआधी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी देखील जळगाव दौऱ्यावर असताना उज्ज्वल निकम यांची भेट घेतली होती. शिवसेनेकडून उज्ज्वल निकम यांना पक्षात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा- आपण काय बोलतोय याचं भान ठेवावं, शिवसेनेने पटोलेंना सुनावलं

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर पाठवण्याची ऑफर दिली होती. मात्र उज्ज्वल निकम यांनी दोन वेळा हा प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर आता शिवसेनेकडून उज्ज्वल निकम यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.  

या सगळ्या चर्चांवर उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी अद्याप राजकारणात येण्याचा विचार केलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील सांगता येणार नाही. याआधी मी शरद पवार (sharad pawar) यांचा प्रस्तावही नाकारला होता. खासदार संजय राऊत आणि माझी गेल्या महिन्यातील भेट ही केवळ सदिच्छा भेट होती. माझे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते घरी येत असतात, असंही उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलं. 

उज्ज्वल निकम यासंबंधी काय निर्णय घेतात किंवा शिवसेनेकडून यावर कुठली घोषणा करण्यात येते, यानंतरच पुढच्या गोष्टी स्पष्ट होतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा